आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेट क्राइम:गोळीबारातील 8 मृतांत 4 शीख; भारतीय शोकमग्न, अमेरिकेच्या इंडियाना पोलिसमधील घटनेमुळे भारतीय शीख चिंतेत

न्यूयॉर्क / मोहंमद अली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शीख समुदाय म्हणाला - ही धक्कादायक घटना, वंशद्वेषी शेरे-भेदभाव नवीन बाब नाही

अमेरिकेच्या इंडियाना पोलिस शहरात शुक्रवारी फेडएक्स परिसरातील गोळीबारात ठार झालेल्या ८ जणांत ४ शीख समुदायातील आहेत. घटनेनंतर येथील शीख समुदायात भय व अनिश्चिततेचे वातावरण आहे. बहुतांश लोक म्हणाले, हा गोळीबार भयचकित करणारा आहे. मात्र भारतीय व विशेषकरून शीख समुदायासाठी वंशद्वेषी छळ, शेरेबाजी व भेदभाव नवीन बाब नाही.

स्थानिक संघटना शीख कोएलिशनने म्हटले की, अमेरिकी नागरिकांच्या तुलनेत शिखांना भेदभाव व वंशद्वेषी छळाला जास्त सामोरे जावे लागते. शुक्रवारच्या घटनेत अमरजित कौर जोहल (६६), जसविंदर कौर (६४), जसविंदर सिंह (६८) व अमरजित सेखों (४८) यांचा मृत्यू झाला. गोळीबार करणारा १९ वर्षांचा गौरवर्णीय अमेरिकी ब्रँडन स्कॉट होल फेडएक्सचा माजी कर्मचारी आहे. नंतर त्यांनी कथितरीत्या आत्महत्या केली. मृत अमरजित कौर जोहल यांची नात कोमल चौहान इंडियानापोलिस येथे राहते. त्यांनी दै. भास्करला सांगितले की, आम्ही या धक्क्यातून कधीही सावरू शकणार नाहीत. घटनेत कोण कोण जखमी झाले हे आताच कळाले आहे. कुटुंबातील अनेक सदस्य त्याच परिसरात काम करतात. कोमल म्हणाल्या, कुटुंबाला कार्यालये, पूजास्थळी जाण्याची भीती वाटू नये. आम्ही आधीच खूप तणाव सोसलेला आहे. ४० वर्षीय परमिंदर घटनेच्या काही वेळेनंतर फेडएक्स बिल्डिंगमधून निघाले. परत येतेवेळी ही घटना घडली. ते म्हणाले, आधी वाटले की एखादा अपघात झाला असावा. मग एकाला रायफल घेऊन आत जाताना पाहिले.

मी लोकांना इशारा देण्याचा प्रयत्न केला. येथील अनेक भारतीय अमेरिकी लोकांचे मत आहे की, ही घटना आशियाई वंशांचे लोक व स्थलांतरितांविरुद्ध गौरवर्णीय अमेरिकी नागरिकांच्या द्वेषाचा परिणाम आहे. कोरोनानंतर वर्णद्वेषी शेरेबाजी व भेदभाव खूप वाढला आहे. बहुतांश लोकांना तक्रारी करणेही सोडले आहे. इंडियानापोलिसचे डेप्युटी पोलिस चीफ क्रेग मॅक्कार्ट म्हणतात, कारमधून उतरताच हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. शीख कोएलिशनने हेट क्राइमच्या शंकांचा तपास करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. संघटनेच्या कार्यकारी संचालक सतजित कौर म्हणाल्या अद्याप घटनेमागील कारणांचा तपास लागलेला नाही. मात्र हल्लेखोराने बहुतांश शीख कर्मचारी असलेला परिसरच गोळीबारासाठी निवडला होता. इंडियानापोलिसमध्ये ५० वर्षांपूर्वी शीख समुदाय स्थायिक झाला. दोन दशकांत येथील शिखांची संख्या १० हजारांवर गेली आहे.

बातम्या आणखी आहेत...