आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकीकडे कोरोनाचा कहर सुरू आहे. परंतु काही देशांत निर्बंधांना कडाडून विराेध केला जात आहे. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये कडक नियमांच्या विराेधात रविवारी संतप्त लाेक रस्त्यावर उतरले आहेत. ‘लसीचा कट्टरवाद मंजूर नाही, ‘मी नव-नाझी गुंड नाही,’ ‘स्वातंत्र्यासाठी लसीच्या विराेधात लढताेय,’ अशा आशयाचे फलक आंदाेलकांच्या हाती दिसून आले. व्हिएन्नामध्ये काही ठिकाणी जाळपाेळीचाही प्रयत्न झाला. तेव्हा निदर्शक व पाेलिस यांच्यात धुमश्चक्री उडाली. रविवारच्या निदर्शनासाठी सुमारे ४४ हजार लाेक रस्त्यावर उतरल्याचा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला. निदर्शनांमुळे ऑस्ट्रिया सरकारवर दबाव वाढला आहे. त्यामुळे सरकारने रविवारी तातडीने देशभरातील लाॅकडाऊन मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. सरकारच्या नव्या आदेशानुसार लस घेतली नसली तरी लाेकांना खरेदी किंवा व्यायामासाठी घराबाहेर पडता येईल.
परंतु घराबाहेर पडलेल्या अशा लाेकांना दाेन दिवसांत आपला निगेटिव्ह अहवाल सादर करावा लागेल. डाेस घेतलेल्या लाेकांसाठी जीवन सामान्य हाेत जाईल, असे सांगण्यात येते. सांगीतिक कार्यक्रमांच्या आयाेजनाला देखील हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. रेस्तराँ, संग्रहालय देखील खुले हाेणार आहेत. नाताळच्या बाजारात पुन्हा गर्दी दिसू लागेल. वीकेंडला निदर्शने हाेण्याची ही सलग चाैथी वेळ आहे.
१४ वर्षांहून जास्त वयाच्या सर्वांना लस अनिवार्य करणारा आॅस्ट्रिया युराेपातील पहिलाच देश आहे. फेब्रुवारीपासून या नियमांची सक्ती करण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना सरकारने ५० हजार रुपयांपासून ३ लाखांपर्यंतचा दंड लावला आहे. त्यामुळे लोक नाराज झाले होते.
लंडन : बोरिस जाॅन्सन यांची तुलना हिटलरशी
नव्या नियमांच्या विराेधात लंडनमध्येही लाेक संतप्त झाले. त्यांनी पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन यांची तुलना हुकूमशहा हिटलरशी केली. तसे फलक झळकावले. त्याचबराेबर भेदभाव मान्य नसल्याचा संदेश दिला. काेराेनामुळे सर्वाधिक हानी हाेत असलेल्या भागामध्ये युराेपचाही समावेश हाेताे. युराेपात आतापर्यंत ७.८ काेटी लाेक बाधित झाले.
ऑस्ट्रेलिया : सिडनी, मेलबर्नमध्ये निदर्शने
आॅस्ट्रेलियात लस अनिवार्य केल्याच्या विराेधात रविवारी निदर्शने करण्यात आली. मेलबर्नमध्ये चार हजारांवर लाेकांनी संसदेच्या बाहेर सरकारविराेधी घाेषणाबाजी केली. दाेन वर्षांनंतर आयाेजित मेलबर्न मॅरेथाॅनमध्ये अडसर आणण्याचाही प्रयत्न केला. सिडनीत लोकांनी रस्त्यावर मार्च काढला होता. त्यामुळे तणाव वाढला होता. प्रशासनासमोर आता आव्हान आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.