आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जो बायडेन अमेरिकेचे सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांचे वय ७८ वर्षे आहे. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गापासून वाचवणे हे त्यांच्या प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. या पृष्ठभूमीवर व्हाइट हाऊसच्या (राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान) कामकाजाच्या पद्धतीत अनेक बदल करण्यात आले आहेत. सुमारे ५० टक्के अधिकाऱ्यांना-कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. निवडक उच्च अधिकाऱ्यांच्या छोट्या समूहाला व्हाइट हाऊसमधून काम करण्यासाठी बोलावले जात आहे. तथापि, त्यांनाही कोरोनाशी संबंधित नियम-अटींचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यात मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे यांचा समावेश आहे.
व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव जेन साकी यांनी सांगितले की, कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची रोज कोरोना चाचणी करण्यात येईल. व्हाइट हाऊसचे व्यवस्थापन संचालक जेफ्री व्हेक्सलर यांच्यावर कोरोनाशी संबंधित सुरक्षेच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनात व्हाइट हाऊसमध्ये तीन वेळा कोरोनाचा संसर्ग झाला, स्वत: ट्रम्प यांनाही कोरोना झाला होता त्यामुळे विशेष काळजी घेतली जात आहे. अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडमध्ये आता कोरोना चाचणी रिस्ट बँडचाही समावेश करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्षांच्या सर्व कार्यक्रमांत फिजिकल डिस्टन्सिंगची विशेष व्यवस्था राहील. एवढेच नाही तर उपाध्यक्ष कमला हॅरिसही बायडेन यांच्यापासून सुरक्षित अंतरावरच राहतील.
या उपाययोजना कशासाठी? : कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका वयोवृद्धांना आहे. त्यामुळे व्हाइट हाऊस विशेष काळजी घेत आहे. बायडेन यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला असला तरी कुठलीही जोखीम घेण्याची प्रशासनाची इच्छा नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.