आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये विषाणू परतला:वुहानमध्ये नवे सात रुग्ण; 1.10 कोटी लाेकांची तपासणी होणार, पहिल्या कोरोना केंद्रात 13 महिन्यांनंतर रुग्ण दिसले

वुहान2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र वुहानचे आहे. येथे निर्बंध, लॉकडाऊनमुळे लाेकांनी सामान खरेदीचा सपाटा लावला आहे. - Divya Marathi
छायाचित्र वुहानचे आहे. येथे निर्बंध, लॉकडाऊनमुळे लाेकांनी सामान खरेदीचा सपाटा लावला आहे.

चीनच्या वुहान शहरात जून २०२० नंतर पहिल्यांदाच नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर सरकारने मंगळवारी एक घोषणा केली. शहरातील सर्व १.१० कोटी लोकांची कोरोना तपासणी केली जाणार आहे. याबरोबरच वुहानमधील शाळा, कोचिंग क्लासेस, काही मेट्रो रेल्वेस्टेशन बंद करण्यात आले. मास्क लावण्याची सूचना देण्यात आली आहे. प्रशासनाने शिक्षण संस्थांच्या परिसरातील आरोग्यासंबंधी निगराणीत वाढ केली आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे. खरे तर जगभरात वुहानमधून कोरोनाचा फैलाव झाल्याचे मानले जाते. वुहान हुबेईची राजधानी आहे. वुहानमध्ये सोमवारी सात रुग्ण आढळून आले. त्यानंतर प्रशासन दक्षता बाळगत आहे. यापूर्वी हुनानमधील झांगजियानी व झुझोऊ या शहरांत काही बाधित आढळले होते. तेव्हा २० लाख लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. आता चीनच्या १८ प्रांतांतील अनेक शहरांत नवे रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी संपूर्ण चीनमध्ये ६१ नवे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली.

अमेरिकेत ४ राज्यांत मुलांमध्ये आरएसव्हीचा संसर्ग
अमेरिकेत कोरोनाव्यतिरिक्त रेस्पिरेटरी सेन्सिशयल व्हायरसच्या (आरएसव्ही) रुग्णांत वेगाने वाढ झाली आहे. या विषाणूमुळे श्वसनासंबंधी समस्या निर्माण होतात. त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर दिसून येतो. नाक वाहणे, सर्दी, खोकला, ताप अशी त्याची लक्षणे आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटसोबतच आरएसव्हीबाबतही चिंता व्यक्त केली आहे.

इस्रायल, ब्रिटननंतर जर्मनीही देणार बूस्टर डोस
जर्मनी सप्टेंबरपासून कोरोना लसीचे बूस्टर डोस देण्यास सुरुवात करणार आहे. अधिकारी म्हणाले, हे डोस कमकुवत आरोग्य असलेल्या व वृद्धांना दिले जातील. युरोपीय संघाचे अधिकारी बूस्टर डोसला विरोध करत आहेत. कमी लसीकरण झालेल्या देशांत आधी लस पाठवली पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. गेल्या आठवड्यापासून इस्रायलमध्ये वृद्धांना लसीचा बूस्टर डोस दिला जात आहे.

जपान : अमेरिकी व रशियन प्रवाशांसाठी नियम कडक
जपानने अमेरिका, रशिया व फिनलंडसह अनेक देशांतून येणाऱ्या नागरिकांसाठी प्रवेशाचे नियम आणखी कडक केले आहेत. कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन अशा नागरिकांना जपानमध्ये आल्यावर तीन दिवस सरकारी केंद्रात राहावे लागते. त्यानंतर कोरोना तपासणी केली जाईल. बाधित आढळल्यास प्रवेश नसेल. हा आदेश गुरुवारपासून लागू होईल. जपानमध्ये दररोज ९ हजार रुग्ण आढळत आहेत.

बातम्या आणखी आहेत...