आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मी भारताची लेक असते तर हक्काने मायदेशी राहिले असते; अफगाणिस्तानहून नेदरलँडला पोहोचलेली उमायरा म्हणाली, दिल्लीतून परतताच देशाला तालिबानी कुलूप लागले

नेदरलँड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विमानात बसताच सर्वात आधी मी बुरखा काढून टाकला

उमायरा वादळांशी खेळत आली आहे. ९ वर्षांची होती तेव्हा मुलांसारखे केस कापण्याचे धाडस करताच तालिबानी अतिरेकी धडकले. जीव वाचवण्यासाठी तिने विहिरीत उडी घेतली. यातून बचावली. काळ बदलत गेला. तालिबानीही सत्तेतून गेले. उमायरा काबूलमधून ग्रॅज्युएशननंतर दिल्लीत आली. जेएनयूमधून मास्टर्स डिग्री घेतली. पीएचडी केली. लॉकडाऊननंतर ती काबूलला पोहोचली असतानाच तालिबान्यांनी सत्ता काबीज करत महिलांच्या विकासाचे मार्ग बंद केले. जीव वाचवण्यासाठी ितला अफगाणिस्तान सोडावे लागले. सध्या नेदरलँडमध्ये निर्वासित छावणीत आहे. अापबीती मांडताना तिने दैनिक भास्करच्या मुकेश कौशिक यांना सांगितले- मी भारताची लेक असते तर पूर्ण हक्काने आपल्या देशात राहिले असते.

विमानात बसताच सर्वात आधी मी बुरखा काढून टाकला, शपथ घेतली की आता कधीच प्रेत बनून राहणार नाही
काबूलमधील तो शेवटचा दिवस खूप कठीण होता. दारापासून ते एअरपोर्टपर्यंत दहशतवादी होते. आम्ही अखेरचे म्हणून घराकडे पाहिले. गरजेच्या वस्तू बांधून मी, आई आणि भाऊ निघालो. आईने केवळ एक उशी मागितली. यामुळे तिच्या कंबरेला आराम मिळतो. मी सहजच आईला विचारले, आई कुलूप लावायचे का? आई म्हणाले ‘कुलूप तर तालिबान्यांनी या देशाला लावले आहे. आता लोखंडी कुलपाने काय होणार?’ आईच्या उत्तराने माझ्यात साचलेला संयमाचा बांध फुटला. मी सावरण्याआधीच आईने घराच्या उंबऱ्यावर नमाज अदा करण्याच्या स्थितीत दोन्ही गुडघे टेकवले. मी भारतात स्वर्गाचा अनुभव घेतला आहे. पण आई पहिल्यांदाच काबूल सोडत होती. कदाचित कायमचे.. ती प्रार्थनेच्या सुरात काही तरी बडबडत होती. मी विचारले, अल्लाहकडे काय मागत आहेस? त्यावर ती चिडून म्हणाली, हा खोटा शरिया तुम्हा लोकांनाच शुभ ठरो. मी माझे इमान आणि माणुसकी घेऊन येथून चालली आहे. त्यानंतर आम्ही आमच्या घराकडे वळूनही पाहिले नाही.

काबूलच्या रस्त्यांवर दिल्लीसारखे लाल-हिरवे दिवे नाहीत. हे शहर नेहमीच ईश्वराच्या मर्जीवरच राहिले आहे. तालिबानी ताब्यानंतर सार्वजनिक आरोग्य सोडले तर सर्वच मंत्रालये बंद आहेत. पोलिस कोठेच दिसत नाहीत. कोरोना लॉकडाऊन लागल्यासारखे बाजार बंद आहेत. काबूलवर कब्जा करण्यास कमीत कमी दोन महिने वेळ लागेल, असे आम्हाला वाटत होते. पण वृत्त धडकले की, राष्ट्रपती अशरफ पळून गेले. प्रत्येक जण म्हणत होता की गनी यांनी देश विकला. दुसऱ्या दिवशी कळले की तालिबान्यांनी सत्ता काबीज केली. त्याच क्षणी सर्व अपेक्षा धुळीस मिळाल्या. टीव्ही चॅनलवरील संगीत बंद झाले. टोलो न्यूज इस्लामी कार्यक्रम दाखवू लागले.

जीव वाचवण्यासाठी डोक्यात सर्वात आधी दिल्लीचे नाव आले. जेएनयू कॅम्पसच्या आठवणी ताज्या होत्या. सरोजिनीनगरातील शॉपिंग आणि लजपतनगरातील छोल्यांची चव अजूनही जिभेवर होती. मनात आले की, जर मी भारताची लेक असते तर पूर्ण हक्काने आपल्या देशात राहिले असते. पण काबूलमध्ये भारतीय दूतावासाशी संपर्क होऊ शकला नाही. भारतातून परतल्यानंतर मी नेदरलँडच्या एका एनजीओसोबत काम सुरू केले होते. मग त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या दूतावासाची गाडी घरासमोर होती. बसण्यापूर्वी आईने ताकीद दिली ‘बुरखा घाल.’ पण माझ्या कानांत हे शब्द एखाद्या तप्त लोहरसासारखे शिरले. मी स्वत:ला त्या काळ्या ताबुतामध्ये स्वत:ला कैद केले. विमानात बसताच बुरखा काढून फेकला. शपथ घेतली की यानंतर आता प्रेत बनून जगणार नाही. पश्चिमी देश अफगाणींना आश्रय देत आहेत. ही कहाणी हाॅलीवूड फिल्म ‘शिंडलर्स लिस्ट’ सारखी आहे.

बातम्या आणखी आहेत...