आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन:राजघराणे सोडल्यानंतर आता नोकरी करताहेत युवराज हॅरी, हेल्थ टेक कंपनीत सीआयओ; मानसिक आरोग्य प्रकल्पाची निगराणी करणार

लंडन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनचे राजघराणे सोडून सामान्य आयुष्य व्यतीत करत असलेले ड्युक ऑफ ससेक्स युवराज हॅरी यांनी सॅन फ्रान्सिस्कोत एका प्रशिक्षण कंपनीत चीफ इम्पॅक्ट ऑफिसरची (सीआयओ) नोकरी सुरू केली आहे. ‘बेटरअप’ नावाच्या स्टार्टअपमध्ये हॅरी आता एक सामान्य कर्मचारी म्हणून काम करताना दिसतील. बेटरअप २०१३ मध्ये स्थापन झालेली हेल्थ-टेक कंपनी आहे, ती व्यावसायिक आणि मानसिक आरोग्याचे प्रशिक्षण देते. कंपनीने हॅरी यांच्या वेतनाबाबत माहिती दिली नाही, पण त्यांचे प्रोफाइल सांगितले आहे. हॅरी कंपनीत मानसिक आरोग्य प्रकल्पाची निगराणी करतील.त्याशिवाय हॅरी आणखी एक सामाजिक भूमिकाही बजावतील. त्याअंतर्गत ते रूपर्ट मर्डोक यांची सून कॅथरीन यांच्या अॅस्पिन इन्स्टिट्यूटमध्ये मानद आयुक्त म्हणून चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्याचे कामही करतील.

सीआयओपदी नियुक्ती झाल्यानंतर हॅरी म्हणाले,‘मी कंपनीच्या मानसिक आरोग्य प्रकल्पात काम करणार आहे. आपल्या मानसिक तंदुरुस्तीला प्राधान्य दिल्यास आपल्याला माहीत नसलेल्या संधी उपलब्ध होतात असे मला वाटते. शाही नौदल कमांडोही असे म्हणतात की, ही मनाची स्थिती असते आणि ती आपणा सर्वांत असते. हेच सेल्फ-ऑप्टिमायझेशन आहे. त्याचा अर्थ आपल्यात असलेल्या सर्वोत्तम क्षमतांचा वापर करणे हा आहे. लोकांना ते शक्य व्हावे असे वातावरण तयार करण्यात मी माझे योगदान देणार आहे.’

हॅरी यांच्या नियुक्तीबाबत कंपनीचे सीईओ अॅलेक्सी रॉबिचॉक्स म्हणाले की, ‘बेटरअप चमूचा एक सदस्य म्हणून हॅरी जगभरात मानवी क्षमता वाढवण्यावर भर देतील. त्यांचा अनुभव आम्ही कंपनीच्या सर्व मंचांवर शेअर करणार आहोत.’ बेटरअप कंपनी अॅप आधारित प्रशिक्षण, सल्लामसलत या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मानली जाते. हॅरी यांनी याआधी नेटफ्लिक्स, स्पॉटिफाय यांसारख्या प्लॅटफॉर्मवर पॉडकास्ट आणि कार्यक्रम सादर केलेले आहेत.

बेटरअपची नेटवर्थ १२,५५६ कोटी रुपये, नासासारख्या कंपन्या घेतात सेवा
बेटरअप १२,५५६ कोटी रुपयांची नेटवर्थ असलेली हेल्थ टेक कंपनी आहे. कंपनीत २७० कर्मचाऱ्यांसह दोन हजार प्रशिक्षक आहेत. ते मानसिक आरोग्याचे प्रशिक्षण देतात. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा, शेव्हरॉन, मार्स, वाॅर्नर मीडिया यांसारख्या दिग्गज कंपन्या तिची सेवा घेतात. सीईओ म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या विकासाबाबतच्या प्रशिक्षणाची मागणी गेल्या एक वर्षात खूप वाढली आहे. आम्ही सुमारे ९०० कोटी रुपये कमावले आहेत.

बातम्या आणखी आहेत...