आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात पुढाकार; 70 हजार मशिदींत अजानच्या लाऊडस्पीकरचा आवाज कमी केला

जकार्ता3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोक करत होते चिडचिडेपणा-अनिद्रेची तक्रार, इंडोनेशियाच्या मुस्लिम परिषदेकडून दिलासा

मुस्लिमांची सर्वाधिक २१ कोटी लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात अजानच्या लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला आहे. मोठ्या आवाजामुळे त्रस्त लोकांना दिलासा देण्यासाठी इंडोनेशिया मशीद परिषदेने हा पुढाकार घेतला आहे. परिषदेचे अध्यक्ष युसूफ काल्ला यांनी सांगितले की, देशातील ७.५ लाखांपेक्षा जास्त मशिदींपैकी बहुतांश मशिदींची ध्वनियंत्रणा ठीक नाही. अजानचा आवाज मोठा येतो. त्यामुळे परिषदेने ७ हजार तंत्रज्ञांकडे काम सोपवून देशातील सुमारे ७० हजार मशिदींच्या लाऊडस्पीकरचा आवाज कमी केला आहे. त्यासाठी समितीही स्थापन केली आहे. परिषदेचे समन्वयक अजीस यांच्या मते, आवाज दूरपर्यंत जावा यासाठी अजानचा आवाज मोठा असावा, ही इस्लामिक परंपरा आहे.

जकार्ताच्या अल-इकवान मशिदीचे अध्यक्ष अहमद तौफिक म्हणाले की, लाऊडस्पीकरचा आवाज कमी करणे पूर्णपणे ऐच्छिक आहे, सामाजिक सौहार्द राखण्याची आमची इच्छा आहे. मशीद परिषदेच्या पुढाकारानंतर आता हजारो मशिदींमधील लाऊडस्पीकरचा आवाज कमी झाला आहे. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचीही आता तक्रार नाही. काही दिवसांपासून देशात अजानच्या लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजाला विरोध सुरू झाला होता. ऑनलाइन तक्रारींची संख्याही वाढली. लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजामुळे आमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे; नैराश्य, चिडचिडेपणा, अनिद्रा अशा समस्या जाणवत आहेत, असे लोकांचे म्हणणे होते. हा मुद्दा संवेदनशील असल्याने लोक खुलेपणाने विरोध करत नव्हते.

ईशनिंदा कायद्याचीही भीती : देशात ईशनिंदेच्या कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद आहे. अजानच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्याने एका महिलेला दीड वर्षाची शिक्षा झाली आहे. जकार्तात काही लोकांनी मोठ्या आवाजाविरोधात तक्रार केली तेव्हा हजारो लोकांच्या जमावाने त्यांच्या अपार्टमेंटलाच घेराव घातला होता. तेव्हा लष्कराला बोलवावे लागले होते.

जर्मनीच्या कोलोन शहरात मशिदीत लाऊडस्पीकरवरून अजानला विरोध
जर्मनीतही लाऊडस्पीकरवरून अजानला विरोध होत आहे. देशातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या कोलोनच्या महापौरांनी शुक्रवारी मशिदीत लाउडस्पीकरवरून अजानला मंजुरी दिली होती. त्यांच्या या निर्णयावर देशातील कट्टर उजव्या विचारसरणीच्या एएफडी पक्षाने तीव्र टीका केली आहे. पक्षाचे उप प्रवक्ता मॅथियस बुशग्स म्हणाले की, जर्मनीचे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. या निर्णयामुळे आमचा देश ख्रिश्चन नव्हे, तर इस्लामिक असल्याची प्रतिमा निर्माण होत आहे. कोलोनमध्ये १.२ लाख मुस्लिम राहतात, ही संख्या शहराच्या लोकसंख्येच्या १२% आहे.

बातम्या आणखी आहेत...