आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे पर्व:अमेरिकेस रेड-ब्लू नव्हे, युनायटेड स्टेट्सच्या रूपाने पाहतो : बायडेन

विलमिंग्टन9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रम्प समर्थक दु:खी, पण आपण शत्रू नाहीत, भावी राष्ट्राध्यक्षांची सभेतून भूमिका

अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर पहिल्यांदाच देशातील जनतेशी संवाद साधला. मूळ राज्य डेलावेयरमध्ये त्यांनी शनिवारी रात्री एका जाहीर सभेला मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपराष्ट्राध्यक्षपदावर निवडून आलेल्या कमला हॅरिसदेखील उपस्थित होत्या. बायडेन व हॅरिस यांनी आपल्या भाषणात संपूर्ण अमेरिकेला सोबत घेऊन वाटचाल करण्याचा संदेश दिला. ४८ वर्षांपूर्वी बायडेन याच राज्यातून सिनेटर बनले होते. राजकीय कारकीर्दीतील त्यांचा हा पहिला विजय होता. बायडेन यांनी आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, ट्रम्प समर्थक कशा प्रकारे निराश झाले ही गोष्ट मी समजू शकतो. मीदेखील अनेक निराश वेळा झालोय. परंतु आपण परस्परांना संधी दिली पाहिजे. आपसातील मतभेद दूर सारून सोबत काम केले पाहिजे. आपण प्रतिस्पर्धी आहोत, शत्रू नाहीत. आम्ही अमेरिकेला रेड व ब्लू स्टेट्स म्हणून नव्हे, तर युनायटेड स्टेट्सच्या रूपात पाहतो, असे बायडेन यांनी स्पष्ट केले. अमेरिकेत रेड म्हणजे रिपब्लिकनचा रंग, तर ब्लू म्हणजे डेमोक्रॅट्सचा रंग मानला जातो.

या देशातील जनतेने उत्तर दिले आहे. त्यांनी आम्हाला एक स्पष्ट असा विजय दिला आहे. हा समाधानकारक विजय आहे. अमेरिकेतील लोक व जगभरातील लोकांत कशा प्रकारचा आनंद आहे हे आम्ही पाहू शकतो. लोकांमध्ये विभाजन नव्हे, तर एकजूट निर्माण करणारा अध्यक्ष बनून दाखवेन. आता आपल्या जखमांना भरून काढण्याचे काम केले पाहिजे, अशी ही वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल बायडेन : अध्यापन सुरूच ठेवणार
राष्ट्राध्यक्षांची पत्नी कोणत्याही देशात फर्स्ट लेडी म्हणून आेळखल्या जातात. अमेरिकेत हा मान आता जिल बायडेन (६९) यांना मिळणार आहे. जिल पेशाने शिक्षक आहेत. त्यांच्याकडे चार पदव्या आहेत. प्रथम महिला झाल्यानंतरही अध्यापनाचे कार्य सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रथम महिला असून व्हाइट हाऊसच्या बाहेर काम करून वेतन मिळवणाऱ्या त्या अमेरिकी इतिहासातील पहिल्या महिला ठरणार आहेत. जिल बायडेन नॉर्दन व्हर्जिनिया कम्युनिटी काॅलेजमध्ये इंग्लिश विषयाच्या प्रोफेसर आहेत. लोकांनी शिक्षकांचा सन्मान करावा, असे मला वाटते. त्यांचे योगदान समजून घ्यावे, असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.

११ भारतीयांकडे जबाबदारी शक्य
जाे बायडेन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष असतील हे आता निश्चित झाले आहे. बायडेन-हॅरिस यांच्या विजयाचे शिल्पकार असलेल्या लाेकांवर आता लक्ष केंद्रित हाेत आहे. बायडेन प्रशासनात त्यापैकी अनेक लाेकांना महत्त्वाची भूमिका मिळू शकते. त्यात ११ भारतीय-अमेरिकींना महत्त्वाची भूमिका मिळेल, ही बाब भारताच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. बायडेन याच भारतवंशीय सहकाऱ्यांकडून अर्थव्यवस्थेपासून काेराेना महामारीच्या उपाययाेजनांपर्यंतचे सल्ले घेतात. अशा निवडक व्यक्तींविषयी जाणून घेऊया..

डॉक्टर विवेक मूर्ती ः आरोग्य सल्लागार
अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष डाॅ. मूर्ती यांच्यावर काेराेना महामारीसंबंधी टास्क फाेर्सची जबाबदारी साेपवू शकतात. महामारीच्या मुद्यावर डाॅ. मूर्ती सातत्याने बायडेन यांच्या टीमच्या संपर्कात राहिले.

राज चेट्टी ः अर्थविषयक सल्ला
भारतवंशीय राज चेट्टी हे बायडेन यांच्या िनकटवर्तीयांपैकी. अर्थविषयक अडचणी व समस्येवर बायडेन चेट्टी यांच्याशी सल्लामसलत करतात. गेल्या काही आठवड्यांपासून चेट्टी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत बायडेन यांना इनपुट देण्याचे काम केले आहे.

विनय रेड्डी : बायडेन यांचे भाषण लिहितात
बायडेन यांच्या विजयाच्या शिल्पकारांत यांचाही समावेश आहे. विनय रेड्डी बायडेन यांच्यासाठी भाषण लिहितात. वनिता गुप्ता,श्रेया पाणिग्रही यांनाही बायडेन प्रशासनात महत्त्वाची भूमिका मिळू शकते.

अमित जानी ः माेदी समर्थक म्हणून आेळख
आशियन-अमेरिकन व पॅसिफिक आयलँडरचे प्रमुख अमित जानी यांना बायडेनने या आधी मुस्लिम अमेरिकन समुदायाशी चर्चा करणाऱ्या चमूचे प्रतिनिधित्व दिले हाेते. जानी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे समर्थक मानले जातात.

बातम्या आणखी आहेत...