आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्पेन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. देशात दररोज सुमारे २० हजार नवे रुग्ण सापडू लागले आहेत. ४०० वर मृत्यू होत आहेत. आतापर्यंत १४ लाख ८४ हजार ८६८ रुग्ण आढळून आले आहेत. ४० हजार ४६१ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणूनच सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याअंतर्गत अमेरिका, ब्रिटनसह ६५ देशांतून आलेल्या लोकांना ७२ तासांपूर्वीच्या सीआरपी चाचणीचा अहवाल दाखवणे अनिवार्य करण्यात आले आहे. रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास देशात प्रवेश मिळेल. हा आदेश २३ नोव्हेंबरपासून लागू होईल. बार्सिलोनाच्या सांता क्रू आय संत पाऊ हॉस्पिटलच्या सुपरवाइज नर्स आयरिस बउटिस्टा म्हणाल्या, रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. त्यामुळे रुग्णालयांची स्थिती अधिकच वाईट होत चालली आहे. आता आरोग्य कर्मचाऱ्यांत मार्चसारखा उत्साह व शक्ती शिल्लक राहिलेली नाही. ही वेळ भावनिकदृष्ट्या अत्यंत कठीण आहे. असे असूनही देशातील अनेक लोकांना त्याची पर्वा नाही.
या लोकांच्या दृष्टीने मीडिया कोरोनाची भीती घालू लागला आहे. माध्यमे अतिरंजित वृत्तांकन करू लागल्याचा आरोप एक गट करत आहे. सरकार लोकांचे स्वातंत्र्य व जीवन हिरावून घेऊ इच्छिते. स्पेनमध्ये अनेक प्रकारच्या अफवा दिसून येतात. इतर युरोपीय देशांप्रमाणेच फ्रान्समध्येही निर्बंधांच्या विरोधातील संताप रस्त्यावर दिसू लागला आहे. कॅटेलोनियाच्या चौकातील स्टोअर प्राइममार्क महामारीनंतर गेल्या महिन्यात सुरू झाले होते. परंतु लोकांनी ऑक्टोबरच्या अखेरच्या दिवशी या दुकानाची लूट केली. आता सुरक्षा यंत्रणेने या दुकानांना सील लावले आहे. सोशल मीडियात सक्रिय नियो-नाझी गट लोकांना चिथावणी देण्याचे काम करत आहे. स्पेनचे संविधान नागरिकांचे संरक्षण करू शकत नाही. हा आमचा देश आहे. काय करायचे ते आम्ही पाहू. लढा किंवा मरा, असे आवाहन या गटाने केले आहे. या गटाने केलेल्या चिथावणीला माद्रिद, लोगोनो, मलेगा, सांताडरसह डझनावर शहरांतून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या शहरांत निदर्शने झाली. या निदर्शनांत अनेक पोलिस जखमी झाले. स्टोअर लुटण्याच्या आरोपाखाली ५० हून जास्त लोकांना अटक करण्यात आली.
कोरोनामुळे जीवनमानात झाली सरासरी 0.9 वर्षे घट
कोरोना संकटामुळे स्पेनमध्ये डिसेंबर २०१९ ते जुलै २०२० पर्यंत सरासरी जीवनमानात ०.९ वर्षांनी घट झाली आहे. प्लॉस वन जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासाद्वारे हा दावा करण्यात आला आहे. सरासरी जीवनमानात झालेली घट महिला व पुरुषांत समान आहे. कॅटेलोनिया व अरागॉन शहरांत मोसमी कामगारांमुळे कोरोनाचा जास्त फैलाव हाेत आहे, असे स्पॅनिश व स्विस संशोधकांना वाटते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.