आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूयॉर्कच्या मतदान केंद्रावरून ग्राउंड रिपोर्ट:7 अंश तापमानात 5 तासांची प्रतीक्षा परवडलीपण ट्रम्पराज नकाे; सामान्य मतदारांची भावना

न्यूयॉर्क : मोहंमद अलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • न्यूयॉर्कला रिपब्लिकन नेते नाहीत पसंत

दुपारची वेळ. आकाशात ढगांची दाटी. काही वेळातच वरुणराजाचे आगमन होईल, अशी चिन्हे आहेत. ऑक्टोबरचा शेवटचा दिवस. न्यूयॉर्कमधील ऋतूमान बदलू लागलेय. तापमान ७ अंशांवर आहे. मॅनहॅटनच्या मतदान केंद्राबाहेर मतदारांची लांबच लांब रांग लागलेली आहे. हे सगळे राष्ट्राध्यक्ष, वरिष्ठ व कनिष्ठ सभागृहातील प्रतिनिधींची निवड करण्यासाठी आलेले आहेत. न्यूयॉर्क स्टेटमध्ये पहिल्यांदाच इलेक्शन डे (३ नोव्हेंबर) आधीच मतदान सुरूही झाले. तसे तर लवकर मतदान ही परंपरा अमेरिकेतील अनेक राज्यांत आधीपासून आहे. यंदा कोरोनामुळे गर्दी कमी करण्यासाठी अनेक राज्यांनी मतदान नऊ दिवस आधी सुरू केले. ३८ वर्षीय वॉरडे खताब एक फिजिओथेरपिस्ट म्हणून न्यूयॉर्कच्या एका प्रसिद्ध विद्यापीठात कार्यरत आहेत. त्या म्हणाल्या, ‘आणखी दोन तास रांगेत उभे राहावे लागले तरी हरकत नाही. परंतु, मतदान केल्याविना जाणार नाही’.

ट्रम्प यांच्या पोस्टरकडे इशारा करत म्हणाल्या, ‘हा फॅसिस्ट माणूस आमचा अध्यक्ष होण्याच्या लायक नाही. आम्ही आमचा विरोध नोंदवणार आहोत.’ वॉरडे यांच्याशी संवाद सुरू असताना दहा मिनिटे आधी रांग संपेल, असे वाटले होते. परंतु, रांग किती लांब आहे, हे तूर्त सांगता येणार नाही. मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगसह लोक उभे आहेत. अनेक भिंतीला टेकून वृत्तपत्र वाचनात मग्न आहेत. काही फोनमध्ये व्यग्र दिसले. प्रत्येक रंग, वंश, धर्म, लिंगाचे लोक याच रांगेत होते. कृष्णवर्णीय, गोरे, भारतीय, हिस्पॅनिक, इटालियन इत्यादी. लोकांमध्ये खूप उत्साह दिसला. परंतु, या उत्साहामागे ट्रम्प यांच्या विरोधातील प्रचंड संताप दिसला. सोनिया २५ वर्षांची आहे. ती न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदा मतदान करेल. आधी ती कोलोराडोमध्ये हक्क बजावत. ती म्हणाली, ‘मतदानासाठी लांब रांग असेल, याची मला कल्पना होती. परंतु, एवढी लांब रांग लागेल, असे वाटले नव्हते. २ तास ४५ मिनिटांनंतर माझा क्रमांक येईल. तसे तर मी दहा वाजताच आले आहे. मला काेरोना विषाणूच्या विरोधात मतदान करायचे आहे. अमेरिकेच्या सत्तेत विषाणू घुसला आहे. त्याला बाहेर काढायचेय. त्यासाठी ५ तास प्रतीक्षा करू शकते. साेनिया सांगते. रांग लांब होत चाललीये. गर्दी व लांब रांग कमी करण्यासाठी न्यूयॉर्क निवडणूक आयोगाला मतदान केंद्र बदलावे लागत आहेत. मतदानाची वेळही वाढवावी लागत आहे. रांग बघून लोकांना कोरोनाची भीती वाटते, असे मुळीच वाटत नाही. बहुधा ट्रम्प यांच्यावरील संताप विषाणूच्या भीतीवर स्वार झाला असावा.

२०१६ मध्ये ट्रम्प यांना मतदान करणारेही काही लोक मतदारांच्या रांगेत भेटले. ६५ वर्षीय चेरियन जॉन त्यापैकीच. ते म्हणाले, मेक्सिकोहून न्यूयॉर्कला ७० च्या दशकात आलो होतो. २०१६ मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदावर एखादा मर्द माणूस असावा असे वाटले होते. म्हणून हिलरींना निवडले नव्हते. परंतु, कोरोनाने हा व्यक्ती नेतृत्वाच्या लायक नसल्याचे सिद्ध झाले आहे. कोरोनाने माझा सर्वात चांगला मित्र मी गमावला, असे सांगून जॉन यांनी संतापाच्या स्वरात अध्यक्षांची जणू हजेरी घेतली, असे वाटत होते. संशोधक तसेच ट्रम्प यांचे मंत्री देखील देशात विषाणू येईल, असे म्हणत होते. परंतु, हा माणूस अगदी वेडाय. त्याने कोणाचीही पर्वा केली नाही. ट्रम्प यांना कोरोना झाला. तेव्हा त्यांच्याकडे जगभरातील उत्कृष्ट उपचार उपलब्ध होते. परंतु, सर्व अमेरिकींचे नशीब ट्रम्प यांच्यासारखे नाही. याच एका व्यक्तीच्या बेजबाबदारपणामुळे दोन लाख लोकांचा मृत्यू झाला. न्यूयॉर्कमध्ये ३३ हजारांवर लोक मृत्युमुखी पडले, असे जॉन सांगतात. जॉन यांच्याप्रमाणेच न्यूयॉर्क सिटीतील ४७ लाख मतदार यंदा हक्क बजावणार आहेत. लोक परस्परांना मतदानासाठी प्रोत्साहन देत आहेत. एवढेच नव्हे तर पबमधील वेटर देखील मद्य सर्व्ह करण्यापूर्वी तुम्ही मतदान केलेय काय? असे विचारू लागलेत. न्यूयॉर्कमध्ये तीन वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरील रांगेत उभ्या डझनावर लोकांशी संवाद साधला. त्यापैकी अनेक लोक दबक्या स्वरात देखील ट्रम्प यांच्या बाजूने बोलत नाहीत. कोरोनाकाळात लांबच लांब रांग हे ट्रम्प यांच्या विरोधातील संतापाचे चित्र आहे, असे ते सांगू लागतात.

न्यूयॉर्कला रिपब्लिकन नेते नाहीत पसंत
रोनाल्ड रिगन यांच्यानंतर १९८४ पासून न्यूयॉर्कने फारशा रिपब्लिकन नेत्याची अध्यक्षपदासाठी निवड केली नाही. न्यूयॉर्कमध्ये २९ इलेक्टोरल मते आहेत. तिसरे मोठे इलेक्टोरल कॉलेज स्टेट्स आहे. २०१६ मध्ये ट्रम्प यांना न्यूयाॅर्कमधून १९ टक्के मते मिळाली होती. आता येथे कोरोनामुळे ट्रम्प यांना आणखी कमी मते पडतील, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. २०१६ मध्ये न्यूयॉर्कमध्ये ६२ टक्के लोकांनी मतदान केले होते. यंदा ९ दिवसांतच हा टक्का गाठला गेला. अमेरिकेत ३० ऑक्टोबरपर्यंत ८.५ कोटी मतदारांनी हक्क बजावला. सर्वाधिक कॅलिफोर्नियात ९१ लाख, टेक्सासमध्ये ९० लाख तर फ्लोरिडात ७८ लाखांवर मतदान झाले.