आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानमधील शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडी मोठ्या संकटात आहे. देशात लवकरच निवडणूक घ्यावी लागेल, अशी स्थिती आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, सर्वोच्च न्यायालयाच्या अभूतपूर्व निकालानंतर पंजाब प्रांत हातातून गेल्याने या सरकारचे आता मोजकेच दिवस उरले आहेत. त्यासोबतच लष्कराच्या ‘तटस्थ’ भूमिकेमुळे सरकारला स्वत:च्याच भविष्याबद्दल शंका निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्याशिवाय सत्तारूढ पीएमएल-एनमध्ये अंतर्गत संघर्ष एवढा विकोपाला गेला आहे की, आता तो लपवणे शक्य नाही. एवढेच नव्हे तर, पीएमएल-एनचे सर्वोच्च नेते आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लष्कराने घेतलेल्या भूमिकेवर चुप्पी तोडली आहे.
लष्कराच्या सांगण्यावरून पाकिस्तानच्या स्थैर्यासाठी उचललेल्या कठोर पावलांवर (पेट्रोलच्या किमतीत वाढ आणि कठोर आर्थिक निर्णय) त्यांनी टीकास्त्र सोडले आहे. पंजाबमधील पराभवानंतर सहकारी पक्षांच्या बैठकीत व्हिडिओ लिंकद्वारे जोडले गेलेले नवाज शरीफ म्हणाले की, “मी पहिल्या दिवसापासूनच सरकार स्थापन करण्याच्या बाजूने नव्हतो. लाडक्याची (इम्रान खान) ४ वर्षांची घाण आमच्या अंगावर टाकण्यात आली.” त्यांनी ‘समेटा’चे धोरण सोडण्याचा सल्ला देत म्हटले की, ‘आपल्याला राजकीय भवितव्य सुरक्षित करावयाचे असेल तर एक स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल.’ या बैठकीला नवाज शरीफ यांचे भाऊ आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ, पीडीएम प्रमुख मौलाना फजल-उर रहमान आणि सहकारी पक्षांचे इतर नेते हजर होते.
पीएमएल-एनच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मते, सरकारला लष्कर-न्यायपालिकेकडून पाठिंबा मिळत नाही. अशा स्थितीत समस्या वाढू शकतात. लष्कराने तटस्थतेच्या नावावर आपल्याशी डबल गेम केला, असे पक्षाचे मत झाले आहे. राजकीय विश्लेषक तलहट हुसैन यांनी सांगितले की, सध्याची समीकरणे पाहिली तर पीएमएल-एन पराभूत झालेला पक्ष आहे हे स्पष्ट होते. अनेक विश्लेषकांच्या मते, गंभीर आर्थिक स्थितीत पीएमएल-एनला लोकविरोधी कठोर निर्णय घेण्यासाठी सत्तेत आणण्यात आले आणि इम्रान खान यांना लष्करविरोधी प्रतिमेसह रिलाँच करण्यात आले. पीएमएल-एनचे नेते मोहसीन शहनवाज रांझा यांनी ‘दैनिक भास्कर’ला सांगितले की, ‘आता चुप्पी तोडण्याची आणि नवाज शरीफ यांच्या अजेंड्याचे समर्थन करण्याची वेळ आली आहे. लष्कराचे नाव न घेता ते म्हणाले की, आम्ही भीत-भीत बोललो तर कोणीही आमच्याशी बोलणार नाही.’ पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार नजम सेठी यांच्या मते, पंजाब जिंकल्यानंतर इम्रान खान यांनी निवडणूक घेण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. लष्करालाही निवडणूक हवी आहे आणि त्याने सरकारला आपली इच्छा बोलून दाखवली आहे. लष्कराने ट्विस्टसह खेला होबे केला आणि पीएमएल-एनला त्याचा अंदाज आला नाही.
कर्जासाठी अमेरिकेसमोर पसरले हात
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी देशाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी मोर्चा सांभाळला आहे. आयएमएफडून कर्ज देण्यासाठी आणि जुन्या कर्जाची अंतिम मुदत वाढवण्यासाठी मदत करा, अशी विनंती त्यांनी अमेरिकेकडे केली आहे. एका वृत्तानुसार,कर्जफेड न केल्याने थकबाकीदार होण्याचा धोका पाकिस्तानवर आहे. १.२ अब्ज डॉलरचे मदत पॅकेज जारी करण्यासाठी आयएमएफवर दबाव आणावा, अशी विनंती बाजवा यांनी अमेरिकेला केली आहे. आर्थिक मुद्द्यावर सरकारऐवजी थेट बाजवांनी हस्तक्षेप केल्याने लष्कर-सरकारमध्ये सर्वकाही ठीक नाही, हे स्पष्ट होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.