आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सहा वर्षांच्या कायानचे हास्य बघून कुणाचेही हृदय वितळेल. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या सरकारने कायानसह त्याच्या पूर्ण कुटुंबाला देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. याचे कारण म्हणजे कायानला सेरेब्रल पाल्सी नावाचा आजार आहे. हा एक न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर आहे, जो शारीरिक हालचाली, चालण्या-फिरण्याच्या क्षमतेला प्रभावित करतो. इमिग्रेशन विभागाने फेब्रुवारीत त्याच्या कुटुंबाने केलेल्या शेवटचा अर्ज फेटाळत देश सोडण्याचे आदेश दिले. कायानचे वडील वरुण कात्याल १२ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात विद्यार्थी व्हिसावर आले होते. २०१२ मध्ये लग्न झाले आणि २०१५ मध्ये कायानचा जन्म झाला. जन्मापासूनच कायानला सेरेब्रल पाल्सी आजार झाला. ऑस्ट्रेलियाने २०१८ मध्ये कुटुंबाला कायम रहिवासी व्हिसा देण्यास नकार दिला. त्यांना कायमचा रहिवासी व्हिसा दिल्यास कायानच्या उपचारांचा ऑस्ट्रेलियातील करदात्यांवर भार पडेल, असा युक्तिवाद केला.
ऑस्ट्रेलियात कायमचे रहिवासी आणि नागरिकांसाठी वैद्यकीय सुविधा मोफत आहेत. मेलबर्नमध्ये शेफ वरुण यांनी सांगितले की, मुलाच्या उपचारांचा खर्च स्वत: करणार असल्याचे त्यांनी इमिग्रेशन विभागाला सांगितले. यावर विभागाने पुढील दहा वर्षांत उपचारांवर होणाऱ्या खर्चाची ६ कोटी रुपयांची बचत दाखवण्याचे सांगितले. मात्र, एवढी मोठी रक्कम आमच्याकडे नव्हती. व्हिसासाठीच्या अर्जावरही त्यांनी २० लाख खर्च केले आहेत. वरुण आणि त्यांच्या पत्नीने अॅडमिनिस्ट्रेटिव्ह अपील ट्रिब्यूनलमध्ये याचिका केली आहे, तर कायानची याचिका फेडरल न्यायालयात प्रलंबित आहे. वरुणने मदतीसाठी एक ऑनलाइन याचिका सुरू केली आहे. अनेक खासदार, कलावंतांनी कायानला पाठिंबा दिला आहे.
अशाच प्रकरणात इमिग्रेशन मंत्र्यांनी आयरिश कुटुंबाला दिला होता दिलासा
ऑस्ट्रेलियातील मायग्रेशन कायद्यानुसार इमिग्रेशन मंत्र्यांजवळ विशेषाधिकार आहेत, ज्यांच्या आधारे अशा प्रकरणात व्हिसाची परवानगी देऊ शकतात. मात्र, हे सर्व त्यांच्या विवेकावर अवलंबून असते. २०१९ मध्ये ३ वर्षांच्या आयरिश मुलाच्या प्रकरणात इमिग्रेशन मंत्र्यांनी विशेषाधिकाराचा वापर करून कुटुंबाला राहण्याची परवानगी दिली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.