आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेश:मंडप-मंदिरांवरील हल्ल्यानंतर आता समाजकंटकांनी जाळली हिंदूंची घरे

ढाका/नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हल्ल्यांविरोधात ढाक्यात धार्मिक संघटनांसह विद्यार्थी रस्त्यावर

बांगलादेशात दुर्गापूजेदरम्यान ढाक्यासह अन्य शहरांत पूजा मंडप, हिंदू मंदिरे आणि भाविकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यांविरोधात सोमवारी अल्पसंख्य नागरिकांनी संताप व्यक्त केला. ढाक्यात स्वामीबाग आश्रम इस्कॉनच्या नेतृत्वाखाली हिंदू, धार्मिक संघटनांच्या सदस्यांसोबत ढाका युनिव्हर्सिटीच्या शेकडो विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येत महिलांसोबत २००० पेक्षा जास्त लोक सहभागी होते. आंदोलकांनी शाहबाग इंटरसेक्शन जाम केला आणि घोषणाबाजी केली. यादरम्यान सरकारसमोर १२ मागण्या ठेवल्या. याआधी हिंदूंच्या घरांना आग लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. रंगपूर जिल्ह्यात पीरगंज उपजिल्ह्यात एका सोशल मीडिया पोस्टवरून काही लोकांनी हिंदू समुदायाच्या घरांना आग लावली होती. यामध्ये २० घरांची राख झाली. पीरगंजमध्ये रामनाथपूर युनियनमध्ये रविवारी सायंकाळी ही घटना घडली. युनियन परिषदेचे चेअरमन मोहंमद सदीकुल इस्लाम यांनी सांगितले की, समाजकंटकांनी ६५ घरांना आग लावली होती. पोलिसांनुसार, एका समुदायाशी संबंधित व्यक्तीने फेसबुकवर धर्माबाबत अवमानकारक पोस्ट केली होती. यानंतर धार्मिक हिंसाचार उसळू लागला.

घरे जाळताहेत अन् हसीना बासरी वाजतात : तस्लिमा
बांगलादेशच्या निर्वासित लेखिका तस्लिमा नसरीन यांनी पंतप्रधान शेख हसिना यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, रंगपूरच्या पीरगंजमध्ये जिहादी हिंदूंचे गाव जाळत होते. दुसरीकडे पंतप्रधान शेख हसिना बासरी वाजवत होत्या. हिंदूंविरुद्ध अत्याचाराविरोधात हिंदू आणि धर्मनिरपेक्ष लोक चितगावच्या रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

गेल्या आठ वर्षांत अल्पसंख्याक हिंदूंवर ३,६७९ हल्ले
बांगलादेशचा प्रमुख अधिकारी समूह एन ओ सलीश केंद्राच्या अहवालानुसार, जानेवारी २०१३ पासून या वर्षी सप्टेंबरपर्यंत अल्पसंख्याक हिंदू समाजावर ३,६७९ हल्ले झाले. हिंदू मंदिरे, मूर्ती आणि प्रार्थनास्थळांची तोडफोड आणि आग लावल्याच्या कमीत कमी १,६७८ घटना समोर आल्या आहेत. यादरम्यान ११ हिंदूंचे प्राण गेले, तर ८६२ जखमी झाले.

हल्ले न थांबल्यास आक्रमण करा : भाजप खासदार
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, बांगलादेशातील हल्ल्याचे सत्र न थांबल्यास भारताने आक्रमण केले पाहिजे. बांगलादेशात सोशल मीडियावर कुराणच्या कथित अवमानाची अफवा पसरली होती. यानंतर मंदिरांवर १३ ऑक्टोबरपासून हल्ले झाले. इस्कॉन मंदिराला निशाणा केले. आतापर्यंत ६ लोक मारले गेले आहेत.

हल्ले पूर्वनियोजित, सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न : बांगलादेशचे गृहमंत्री
बांगलादेशचे गृहमंत्री असद्दुजमन खान म्हणाले, मंडपांवरील हल्ले पूर्वनियोजित आणि कटाअंतर्गत केले होते. त्यांनी सांगितले की, कट रचणाऱ्यांचा उद्देश देशात धार्मिक सौहार्द नष्ट करण्याचा आहे. सर्वात आधी बुधवारी कोमिलामध्ये हिंदू मंदिरात भाविकांवर हल्ला करण्यात आला. यानंतर अन्य ठिकाणी हल्ले झाले. माहिती व प्रसारण राज्यमंत्री मुराद हसन म्हणाले, बांगलादेश धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. बांगलादेश धार्मिक कट्टरपंथीयांना आश्रय देऊ शकत नाही. इस्लाम देशाचा धर्म आहे, असे मला वाटत नाही.

बातम्या आणखी आहेत...