आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मायकेल डी शीयर / पीटर बेकर
अमेरिकेतील नवनिर्वाचित अध्यक्ष जाे बायडेन २० जानेवारीला राष्ट्राध्यक्ष कार्यालय व्हाइट हाऊसची सूत्रे हाती घेतील. त्यांच्या प्रशासनाला वारशात संकटांचा पेटारा मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्या दहा दिवसांत ट्रम्प यांच्या कार्यकाळातील वादग्रस्त निर्णय बदलून नवी अमेरिका उभी करण्याच्या अनेक प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवण्याची तयारी केली आहे. व्हाइट हाऊसचे नवे चीफ आॅफ स्टाफ राेन क्लीन म्हणाले, बायडेन कार्यकाळाच्या पहिल्या दिवशी देशासमाेर चार माेठी आव्हाने आहेत. काेराेना महामारी, आर्थिक संकट, पर्यावरणासंबंधी संकट व वंशभेदाशी ताेंड देण्यासाठी सुमारे एक डझन प्रस्तावांवर स्वाक्षरी करतील. अमेरिकेला पुन्हा पॅरिस करारामध्ये समाविष्ट करणे, सात इस्लामिक राष्ट्रांवरील प्रवास निर्बंधांना रद्द करणे हे प्रस्ताव असतील.
कडक कारवाई : जाहिरातींवर बंदी
एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने संपूर्ण देशात सशस्त्र, सामान, सुरक्षात्मक उपकरणांच्या जाहिरातींवर तत्काळ बंदी लागू केली आहे. हे निर्बंध बायडेन यांच्या शपथ समारंभाच्या दाेन दिवसांनंतरही लागू राहतील. आम्ही आधीपासूनच शस्त्र, दारूगाेळा इत्यादी जाहिरातींवर निर्बंध लागू केले आहेत. आता आम्ही शस्त्रांच्या सहायक उपकरणांच्या जाहिरातींवर बंदी घालणार आहाेत, असे या सोशल मीडियाने सांगितले.
तयारी : हिंसक निदर्शनांची भीती, ५० राज्यांत अलर्ट
बुधवारी वाॅशिंग्टन डीसीमध्ये बायडेन यांच्या शपथ समारंभात सशस्त्र लाेक हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे, असा इशारा एफबीआयने दिला आहे. त्याला ताेंड देण्यासाठी राजधानीचे रूपांतर छावणीत करण्यात आले. २५ हजारांहून जास्त नॅशनल गार्ड्सची तैनाती करण्यात आली आहे. कॅपिटल हिल्सवरील हिंसाचारानंतर सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली. शपथ समारंभाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहिल्या दिवसाच्या अजेंड्यावर हे मुद्देही
- महामारीमुळे आर्थिक तंगीचा विचार करून सामान्य तसेच विद्यार्थी यांच्या कर्जफेडीची मुदत वाढवण्यात येणार आहे.
- सार्वजनिक ठिकाणी व आंतरराज्य प्रवासादरम्यान मास्क अनिवार्य करणे.
- घुसखाेरीमुळे वेगळे झालेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांची भेट घालून देणे.
- १.९ लाख काेटी डाॅलरच्या (१३८ लाख काेटी रुपये) पॅकेजला मंजुरी मिळवणे. छाेट्या व्यावसायिकांना दिलासा देणारी घोषणा.
परंपरा तुटण्याची भीती : मेलानिया चहापान टाळणे शक्य
ट्रम्प व बायडेन यांच्यातील वादाचा परिणाम अमेरिकेच्या प्रथम महिला म्हणून हाेणाऱ्या स्वागत परंपरेवरही हाेण्याची शक्यता आहे. १९५२ पासून एक परंपरा चालत आली आहे. त्यात विद्यमान अध्यक्षांची पत्नी नूतन अध्यक्षांच्या पत्नीला चहापानाचे निमंत्रण देते व आपल्या उपाधीचे (फर्स्ट लेडी) हस्तांतरण करते. या निमंत्रणाला टी अँड टूर म्हटले जाते. मेलानिया यांनी बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन यांच्याशी संपर्क साधलेला नाही. टी अँड टूरची परंपरा खंडित हाेण्याची शक्यता आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.