आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचे वडील आणि प्रख्यात वकील विल्यम हेन्री गेट्स-II (गेट्स सीनियर) यांचे सोमवारी वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. ते अल्झायमरने ग्रस्त होते. बिल गेट्स यांनी वडिलांच्या स्मरणार्थ लिहिलेल्या ब्लॉगमध्ये म्हटले की, माझे वडील खरे बिल गेट्स होते. मी नेहमी त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न केला. ते माझ्या कायम स्मरणात असतील. त्यांच्याशिवाय मेलिंडा अँड बिल गेट्स फाउंडेशन अस्तित्वात येणे अशक्य होते. या फाउंडेशनची कल्पना त्यांचीच होती. समाजाप्रति असलेल्या जबाबदारीबाबत ते नेहमी जागृत असत आणि माझ्याकडूनही हीच अपेक्षा ते करत. वाचा ब्लॉगमधील संपादित भाग...
जोखमीतही वडिलांनी साथ दिली, अपयशी झालो तरी ते सोबत राहतील ही खात्री होती
आयुष्यात मोठी जोखीम पत्करताना नेहमी वडिलांनी साथ दिली. अपयशानंतरही ते माझ्यासोबत असतील असा विश्वास मला कायम होता. माझ्या वडिलांचे आमच्यातून निघून जाणे अपेक्षित होते. कारण वयाेमानानुसार ते दिवसेंदिवस अशक्त होत होते. त्यांनी शेवटचा श्वास आमच्या उपस्थितीत घेतला. त्यांनी आम्हाला नेहमीच प्रेरित केले. मी कॉलेजमध्ये असताना शिक्षण सोडून मायक्रोसॉफ्ट सुरू करण्याच्या तयारीत असताना मला पाठिंबा देणारी पहिली व्यक्ती तेच होते. मी जेव्हाही मोठी जोखीम पत्करायचो, तेव्हा ते नेहमी प्रोत्साहन द्यायचे. मायक्रोसॉफ्ट सुरू करण्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी त्यांच्याकडे कायदेशीर सल्ला घेण्यासाठी जायचो. ते पुराणमतवादी आणि मुलांवर आपला निर्णय लादणारे मुळीच नव्हते. ते कायम म्हणायचे की, जीवनात नेहमी नवीन गोष्टी अमलात आणाव्यात. यामुळे जीवनाचा मार्ग सुकर होईल. त्यांनी नैतिकतेला सर्वोच्च स्थान दिले. वेळेचे मूल्य जाणणे आणि विशेषणाचा योग्य उपयोग करणे ही त्यांचीच शिकवण. मेलिंडा अँड बिल गेट्स फाउंडेशनचे अस्तित्व त्यांच्यामुळेच आहे. याच्या कामकाजात गत दोन दशकांपासून त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका निभावली. फाउंडेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते खास असल्याची जाणीव करून द्यायचे. खरे सांगायचे झाल्यास, माझ्या कामावर, पद्धतींवर आणि जीवन जगण्याच्या दृष्टिकोनावर माझ्या वडिलांचाच प्रभाव आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.