आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढाकार:जगभरातील प्रत्येक व्यक्तीस 18 महिन्यांत लस देऊ : बोरिस जॉन्सन; जी-7 देशांच्या बैठकीत लसीकरणावर सहमतीसाठी प्रयत्न

लंडन15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी भारतीयांच्या अर्जात 13 टक्क्यांनी वाढ
  • तिसरी लाट रोखण्यासाठी नियमांत बदल करण्याची सूचना

जगातील प्रत्येक व्यक्तीला १८ महिन्यांत काेराेनामुक्त करण्यासाठी लस दिली जावी. २०२२ अखेरीस जगात प्रत्येकाला लस दिली जावी, असे आम्हाला वाटते. त्यासाठी पुढील आठवड्यात (११ जून) जी-७ देशांच्या बैठकीत लसीच्या मुद्द्यावर सहमती बनवण्याचा प्रयत्न केला जाेईल. सर्व देशांनी परस्परांना सहकार्य करून महामारीचे उच्चाटन करण्याची शपथ घ्यावी, असे ब्रिटनचे पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्राच्या लसीकरण कार्यक्रमाला सहकार्य करत नसल्याचा आराेप ब्रिटनवर असतानादेखील जाॅन्सन यांनी हे विधान केले आहे. गेल्या आठवड्यात संसदेने जाॅन्सन यांना पत्र पाठवले हाेते. जर्मनी व फ्रान्ससारख्या देशांनी वर्षाखेरीस काेवॅक्समध्ये १० काेटी डाेस देण्याची बांधिलकी दर्शवली हाेती. परंतु नंतर भविष्यात अतिरिक्त डाेस देण्याचे आश्वासन देऊन मूळ मुद्द्याला बगल दिली हाेती.

फेब्रुवारीत डाेस देऊ असे सांगण्यात आले हाेते. परंतु आमच्याकडे अतिरिक्त लसी उपलब्ध नाहीत, असे आराेग्यमंत्री मॅट हॅनकाॅक यांनी सांगितले. अनलाॅकनंतर काेराेनाचे विक्रमी रुग्ण आढळून येत आहेत. त्यावरून तज्ञांनी तिसऱ्या लाटेचे संकेत दिले आहेत. ब्रिटनमध्ये शुक्रवारी अडीच महिन्यांनंतर ६२०० हून जास्त रुग्ण आढळले हाेते.

शाळा, महाविद्यालये बंद ठेवावीत
बॅथ विद्यापीठाचे प्राेफेसर डाॅ. किट येट्स म्हणाले, सध्या तरी शाळा बंद करून संसर्गवाढीला राेखले जाऊ शकते. त्यांनी इंग्लंडच्या सार्वजनिक आराेग्य विभागाच्या आकडेवारीचादेखील हवाला दिला आहे. २६ एप्रिल ते ३० मेदरम्यान शाळा-महाविद्यालयांत काेराेनाचा वेगाने संसर्ग झाला. म्हणूनच शाळा-महाविद्यालयांना तूर्त सुरू केले जाऊ शकत नाही.

कार्यालयातून नव्हे, घरातूनच काम करा
लिड्स विद्यापीठाचे व्हायराेलाॅजिस्ट स्टीफन ग्रिफिन म्हणाले, ब्रिटन भलेही अनलाॅक झालेले असेल, परंतु लाेकांनी तूर्त तरी कार्यालयात जाता कामा नये. लाेकांनी घरातूनच कार्यालयाचे काम करायला हवे. अशा नियमांचे पालन केले तरच संसर्गाला पराभूत करता येऊ शकेल.रुग्णालये, वाहतूक, सुपरमार्केटचे कर्मचारी इत्यादी व्यवसायातील लाेक अशा गाेष्टींचे पालन करू शकत नाहीत.

मास्क आणि शारीरिक अंतर बाळगा
ब्रिटनमध्ये सध्या १८ वर्षांहून कमी वयाच्या समुदायासाठी लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जात नाही. म्हणूनच मास्क परिधान करणे आणि शारीरिक अंतर राखले पाहिजे. साेबतच वेळाेवेळी सॅनिटाइझ करत राहावे. त्याशिवाय गर्दीच्या ठिकाणी जाता कामा नये, अशा सूचना तज्ञांनी दिल्या आहेत.

दाेन डाेसमधील अंतर कमी करावे
ब्रिटनची लाेकसंख्या सुमारे ६.७३ काेटी आहे. त्यापैकी ४०.८ टक्के लाेकसंख्येला लसीचे दाेन डाेस देण्यात आले आहेत. येथे लसीच्या दाेन डाेसमध्ये ८ ते १२ आठवड्यांचे अंतर राखण्यात येते. त्याबद्दल प्राेफेसर पाॅल हंटर म्हणाले, काेराेनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी अंतर कमी केले पाहिजे.

ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी भारतीयांच्या अर्जात १३ टक्क्यांनी वाढ
ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी भारतीयांच्या व्हिसा अर्जात १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्च २०२१ पर्यंत ६३९१ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व्हिसासाठी अर्ज दाखल केला आहे. लाॅकडाऊनमधील शिथिलतेनंतर विद्यापीठात परतता येईल, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. देशातील १४६ विद्यापीठांचे प्रतिनिधीत्व करणारी यूयूकेआयचे संचालक व्ही स्टर्न म्हणाले, विद्यार्थी शिक्षणासाठी पुन्हा येत अाहेत.

काेराेनातून बाहेर पडण्याच्या दिशेने ही एक माेठी कामगिरी मानली पाहिजे. प्रतिकूल काळातही अनेकांनी धैर्य व अविश्वसनीय कार्य केले. त्याबद्दल आम्ही त्यांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करताे. विद्यापीठांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण केले. त्यांनी महामारीच्या काळात आॅनलाइन शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांचे अध्यापन सुरूच ठेवले आणि त्यांचे आराेग्य, सुरक्षा व हित लक्षात घेतले.

बातम्या आणखी आहेत...