आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मेंदूचा पेसमेकर रोखेल नैराश्य निर्माण करणारे घटनाक्रम, अमेरिकी संशोधकांनी तयार केले नावीन्यपूर्ण उपकरण

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘ही दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी कार्यालयातून घरी जात होते...संपूर्ण प्रवासात मी रडतच होते. कार एखाद्या दरीत ढकलून देऊन किंवा दलदलीत नेऊन स्वत:ला संपवावे, असा विचार मनात येत होता. मी कशीतरी घरी पोहोचले. मित्रांनी मला डॉक्टरकडे नेले. मी त्यांना माझी समस्या सांगताच डॉक्टरने मला त्वरित आई-वडिलांकडे जाण्याचा सल्ला दिला. अखेर मला नोकरी सोडून त्यांच्याकडे जावे लागले...’ ही कहाणी आहे उत्तर कॅलिफोर्नियातील ३८ वर्षीय साराची. ती दीर्घ काळापासून नैराश्याशी झुंजत होती. तथापि, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यानंतर तिचे आयुष्य बदलले. आता तिच्या मनात आत्महत्येचे विचारही येत नाहीत. नैराश्यही खूप कमी झाले आहे. आता ती डेटा अॅनालिसिसचे वर्ग घेत आहे. जगाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोनच बदलला आहे.

हे शक्य झाले ते साराच्या मेंदूत रोपण केलेल्या न्यूरोपेस आरएनएस सिस्टिम या उपकरणामुळे. आगपेटीएवढ्या या उपकरणाला ‘ब्रेन पेसमेकर’ म्हटले जाते. सारा युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅनफ्रान्सिस्कोच्या (यूसीएसएफ) प्रयोगात्मक उपचाराची पहिली सहभागी ठरली होती. हे उपकरण सक्रिय झाल्यानंतर १२ दिवसांनीच साराचा डिप्रेशन स्कोअर ३३ वरून घटून १४ झाला आणि काही महिन्यांत तो १० पर्यंत पोहोचला. या अभ्यासाच्या लेखिका आणि यूसीएसएफमधील मनोवैज्ञानिक डॉ. कॅथरीन स्कॅनगोस यांनी सांगितले की, सारासाठी जी पद्धती वापरण्यात आली, ती कथितरीत्या डीप ब्रेन स्टिम्युलेशनचा (डीबीएस) एक प्रकार आहे. मेंदूला उत्तेजित करण्यासाठी त्यात रोपण केलेल्या इलेक्ट्रोडचा किंवा पातळ इन्सुलेटेट तारांचा वापर केला जातो. त्याआधी कधीही वैयक्तिक थेरपी करण्यात आली नाही. तिचा परिणामही चांगला झाला.

उपचाराच्या प्रचलित पद्धतींत चार ते आठ आठवड्यांनंतर प्रभाव किती झाला हे कळते, पण या पद्धतीत ते लगेच कळते. स्कॅनगोस म्हणाल्या की, एका व्यक्तीचे नैराश्य दुसऱ्या निराशाग्रस्त व्यक्तीपेक्षा खूप वेगळे असू शकते. हेच लक्षात घेऊन सारासाठी वैयक्तिक थेरपीचा अवलंब करण्यात आला.

नैराश्याचा पॅटर्न दिसताच ६ सेकंदांचे स्टिम्युलेशन देते हे उपकरण
हे उपकरण लावण्याआधी साराने २० प्रकारची औषधे, अनेक महिने रुग्णालयात राहणे, ईसीटी (शॉक थेरपी) यांसारख्या प्रचलित पद्धतींची मदत घेतली होती, पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. या प्रयोगादरम्यान तज्ज्ञांनी साराच्या मेंदूत नैराश्याशी संबंधित पॅटर्न ओळखण्यासाठी सतत १० दिवस इलेक्ट्रोड्स लावून तपासणी केली. वेगवेगळ्या ठिकाणी स्टिम्युलेशन दिल्यानंतर साराला तिच्या भावनांबाबत विचारण्यात आले. नैराश्याचा पॅटर्न दिसताच हे उपकरण फक्त ६ सेकंद स्टिम्युलेशन द्यावे, असे ते सेट करण्यात आले. त्यामुळे नैराश्य निर्माण करणारे घटनाक्रम बाधित होतात.

बातम्या आणखी आहेत...