आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका अंड्याची किंमत ३० रुपये. १०४ रुपये किलो साखर. ६० रुपये किलो गहू, तर एक हजार रुपये किलो अद्रक. हे दर एखाद्या हॉटेलमधील नसून शेजारी देश पाकिस्तानातील महागाईचे वास्तव आहे. नवा पाकिस्तान अशी घोषणा देणारे पंतप्रधान इम्रान खान यांनी साखरेचे दर कमी करू असे आश्वासन दिले आहे. त्यावरून स्वत:ची पाठ देखील थोपटली आहे. परंतु, प्रत्यक्षात पाकिस्तानात महागाईने सगळे विक्रम मोडीत काढले असून जनता हैराण आहे. ‘द डॉन’ च्या म्हणण्यानुसार देशातील बहुतांश भागात थंडीचा कडाका वाढल्याने अंड्याचे भाव ३५० पाकिस्तानी रुपये (सुमारे १६० रुपये) डझनपर्यंत गेले आहेत. किरकोळ बाजारात अंडे खरेदीसाठी गरीब जनतेची गर्दी असते. परंतु आता त्यांच्यावर नवे संकट आेढवले आहे. पाकिस्तानात २५ टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे.
ही लोकसंख्या भोजनात अंड्याचा मोठा वापर करते. दुसरीकडे पाकिस्तानला जानेवारी महिन्यात भीषण गॅसटंचाईला तोंड द्यावे लागेल. पाकिस्तानाला गॅसचा पुरवठा करणारी सुई नॉर्दन ५०० मिलियन स्टँडर्ड क्युबिक फीट प्रतिदिन गॅसचा तुटवडा जाणवणार आहे. या टंचाईला तोंड देताना कंपनीकडे वीज क्षेत्राचा गॅस पुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. इम्रान खान सरकारने वेळेवर गॅस खरेदी केला नाही. त्याचा फटका आता देशातील जनतेला सोसावा लागणार आहे. यंदा ऑक्टोबरपासूनच विक्रम मोडीत निघाले.पाकिस्तान पूर्वी जगभरात कांद्याची निर्यात करायचा. मात्र आता पाकिस्तानलाच कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी त्यास आयात करण्याची वेळ आली आहे. आटा व साखरेचे दर कमी करण्यासाठी इम्रान खान सातत्याने कॅबिनेट व अधिकाऱ्यांसोबत बैठकांवर बैठक घेत आहेत.
आधीच अन्नधान्याचा तुटवडा
पाकिस्तानात सध्या अन्नधान्याचा तुटवडा जाणवत आहे. पाकिस्तानात यंदा गव्हाच्या दराने विक्रम मोडीत काढले आहेत. इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक २४०० रुपये प्रति ४० किलो किंमत झाली आहे. म्हणजेच ६० रुपये प्रतिकिलो असे गव्हाचे दर आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये देशातील परिस्थिती अत्यंत वाईट होती. तेव्हा गहू प्रति ४० किलोसाठी २ हजार रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.