आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या 10 डाऊनिंग स्ट्रीट येथील निवासस्थान व कार्यालयाच्या मुख्य गेटला गुरुवारी एका कारने धडक दिली. या घटनेवेळी सुनक आपल्या निवास्थानी हजर होते. पोलिसांनी वेळीच धाव घेत डाऊनिंग स्ट्रीटकडे जाणारा व्हाईटहॉल मार्ग तातडीने बंद केला.
पोलिसांनी या प्रकरणी आरोपी कार चालकाला अटक केली आहे. आरोपीने हे कृत्य जाणिवपूर्वक केला किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण पोलिसांनी कार जप्त करून पुढील तपासणीसाठी पाठवली आहे. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.
आरोपीवर दहशतवादाचा आरोप नव्हता
या धडकेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात पांढऱ्या रंगाची कार डाऊनिंग स्ट्रीटच्या गेटला धडकताना दिसत आहे. काही वेळातच पोलिसांची अनेक वाहने तिथे पोहोचतात. त्यांच्यासोबत स्निफर डॉग व बॉम्बशोधक पथकही हजर होते. फॉरेन्सिक तज्ञांची टीम कारची तपासणी करत आहे.
तपासणीनंतर रस्ता पुन्हा सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. आरोपीवर सध्या गुन्हेगारी, नुकसान व धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याच्यावर दहशतवादाशी संबंधित कोणताही आरोप ठेवण्यात आला नाही.
पाहा घटनेचे इतर काही फोटो...
2017 मध्ये PM कॅमेरून यांच्या सुरक्षेत चूक, व्यक्ती थेट PM ना धडकला होता
10 डाउनिंग स्ट्रीट ही लंडनमधील वेस्टमिन्स्टर शहरातील एक इमारत आहे. यापूर्वी 2017 मध्ये ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळली होती. तेव्हा एक 28 वर्षीय तरुण धावत असताना त्यांना धडकला. त्यानंतर ब्रिटनमध्ये पंतप्रधानांची सुरक्षा वाढवण्याची मागणी करण्यात आली होती.
4 दिवसांपूर्वी व्हाईट हाऊसच्या अडथळ्यांना ट्रक धडकला, आरोपी भारतीय वंशाचा
4 दिवसांपूर्वी एका व्यक्तीने अमेरिकेतील व्हाईट हाऊसजवळील सुरक्षा अडथळ्यावर ट्रकने धडक दिली. आरोपी 19 वर्षीय वर्षित कंदुला हा हिटलर समर्थक आहे. चौकशीत त्याने सांगितले की, त्याला व्हाईट हाऊस ताब्यात घेऊन बायडेन यांना ठार मारायचे होते. त्यासाठी तो गत 6 महिन्यांपासून नियोजन करत होता. आरोपींकडून नाझी ध्वजही जप्त करण्यात आला आहे. मात्र, त्याच्या ट्रकमध्ये कोणतेही शस्त्र किंवा स्फोटक सामग्री आढळली नव्हती.
व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जीन पियरे यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी राष्ट्राध्यक्ष बायडेन व्हाइट हाऊसमध्ये होते. आरोपीवर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला जीवे मारण्याची धमकी देणे, अपहरण करणे आणि इजा पोहोचवणे असे आरोप ठेवण्यात आलेत. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आरोपी भारतीय वंशाचा होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.