आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानात शनिवारी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. माजी पंतप्रधान इम्रान खान लाहोरमधील जमान पार्कस्थित आपल्या घरातून तोशाखाना प्रकरणाच्या सुनावणीसाठी इस्लामाबाद कोर्टाकडे रवाना झाले. याचदरम्यान पंजाब पोलिसांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. लोखंडी गेट उघडण्यासाठी बुलडोझर चालवले. समर्थकांना पांगवण्यासाठी कलम १४४ लागू केले. यानंतर सायंकाळपर्यंत घराची झडती घेतली. इम्रान यांच्या घरातून पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा व गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी इम्रान यांच्या घरातून एके-४७ रायफली, ५ सबमशीन गन, काडतूस, पेट्रोल बॉम्ब, गुलेरद्वारे हल्ल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शेकडो गोट्या जप्त केल्या. पोलिसांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली ४० पीटीआय कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आली. दहशतवादविरोधी कोर्टाकडून परवानगी मिळाल्यानंतर पोलिसांनी इम्रान यांच्या घराची झडती घेतली.
सुनावणी ३० मार्चपर्यंत स्थगित दुसरीकडे इस्लामाबादकडे कूच करणाऱ्या इम्रान यांच्या ताफ्यातील ३ वाहने एकमेकांना धडकली. यात काही लोक जखमी झाले. तेथून इम्रान कोर्टात पोहोचले. कोर्टाबाहेर मोठ्या संख्येने समर्थक पोलिसांशी भिडले. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि एक वाहन पेटवून दिले. याचदरम्यान कोर्टाबाहेरील तणावपूर्ण वातावरण पाहता इम्रान यांचे अटक वॉरंट रद्द करण्यात आले आणि सुनावणी ३० मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली. कोर्टाने इम्रान यांना न्यायालयीन आवाराबाहेरूनच कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.