आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • By Wrapping It, The Rock Will Be Visible Instead Of The Soldier, Thermal Detectors And Night Vision Equipment

दिव्य मराठी विशेष:माणसाला अदृश्य करणारी ही जाळी गुंडाळल्यास खडकासारखी दिसेल...मग थर्मल डिटेक्टर-नाइट व्हिजन उपकरणांच्या टप्प्यात येणार नाहीत सैनिक

तेल अवीव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • युद्ध मैदानात सैनिकांना शत्रूच्या नजरेपासून वाचवण्यासाठी इस्रायलचे इनोव्हेशन

हल्ल्याच्या वेळी व युद्धादरम्यान सैनिकांसमोर सर्वात मोठे आव्हान असते शत्रूच्या नजरेपासून स्वत:ला वाचवणे. तथापि, आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे कठीण झाले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने एक टेक इनोव्हेशन केले आहे. इस्रायलच्या लष्करासाठी अत्याधुनिक केमोफ्लेज नेट तयार करण्यात आली आहे. तिच्या दोन्ही बाजू अंगावर गुंडाळल्यानंतर सैनिक मोठ्या खडकासारखे दिसतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती गुंडाळल्यानंतर डोळ्यांनाच नव्हे, तर थर्मल डिटेक्टरद्वारेही पकडले जाऊ शकत नाही.

ही विशेष जाळी दोन्ही बाजूंनी विशेष प्रकारे डिझाइन करण्यात आली आहे. एक बाजू दाट हिरवळीच्या भागांच्या हिशेबाने तयार केली आहे, तर दुसरी बाजू शुष्क आणि वाळवंटी प्रदेशासाठी तयार केली आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाच्या आरअँडडी शाखेच्या सहभागाने हे इनोव्हेटिव्ह मटेरिअल तयार करणाऱ्या पोलारिस कंपनीचा दावा आहे की, सैनिकांना व्हर्च्युअली अदृश्य ठेवण्यासाठी आम्ही हे आवरण तयार केले आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयातील डिटेक्टर्स आणि इमेजिंग टेक्नाॅलॉजी शाखेचे प्रमुख गल हरारी यांनी सांगितले की, दुर्बिणीतून पाहिले तरी सैनिक ओळखू येत नाहीत, असे आम्हाला चाचणीच्या वेळी आढळले. पोलारिस सोल्युशन्सचे सीईओ आसफ पिकिओटो यांनी सांगितले की, त्याची प्रेरणा आम्हाला २०१६ मध्ये लेबनॉन युद्धादरम्यान मिळाली. युद्ध मैदानात उतरलेल्या सैनिकांना थर्मल आणि नाइट व्हिजन उपकरणांपासून वाचवण्याची अत्यंत गरज आहे, असे आम्हाला जाणवले. आम्हाला शत्रूपासून एक पाऊल पुढेच राहावे लागेल. त्यामुळे किट-३०० वर काम केले. आम्ही तिची चाचणी सुरक्षा दलांच्या अनेक युनिटमध्ये केली. ती पूर्णपणे प्रभावी आहे. किट-३०० थर्मल व्हिज्युअल कन्सीलर (टीव्हीसी) मटेरियलद्वारे बनवले आहे. ते मायक्रोफायबर, धातू आणि पॉलिमर यांचे मिश्रण करून तयार केले जाते. कंपनी ते लष्कराच्या वेगवेगळ्या गरजांच्या हिशेबाने कस्टमाइज करूनही देते.

पूर्णपणे वाॅटरप्रूफ, जखमी सैनिकांसाठी तिचा स्ट्रेचरप्रमाणे वापर शक्य
किट-३०० चे वजन फक्त ५०० ग्रॅम आहे, त्यामुळे युद्ध क्षेत्रात सैनिकांना ती गुंडाळून चालण्यास अडचण होत नाही. हलकी असल्याने तिला थ्रीडी आकार दिला जाऊ शकतो, त्यामुळे ती जखमी सैनिकांसाठी स्ट्रेचरचे काम करू शकते. किट-३०० पूर्णपणे वॉटरप्रूफ असून, २२५ किलोपर्यंत वजन तोलू शकते. सैनिक तिचा ब्लँकेटसारखाही वापर करू शकतात.

बातम्या आणखी आहेत...