आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाग्लादेशची राजधानी ढाका लगतच्या शीतालक्ष्या नदीत रविवारी 2 जहाजांची भीषण टक्कर झाली. त्यात 5 जण ठार, तर अनेक जण बेपत्ता झालेत. या घटनेत रुपोशी-9 कार्गो जहाजाने प्रवाशी वाहतूक करणाऱ्या के एम व्ही अफसरुद्दीन नामक एका छोट्या जहाजाला धडक दिली. अपघातावेळी रुपोशी-9 वेगाने किनाऱ्याकडे येत होते. अफसरुद्दीन त्याच्या समोरच्या भागात अडकले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, के एम व्ही अफसरुद्दीन रविवारी दुपारी 2.20 च्या सुमारास मुशीगंजकडे जात होते. पण, सय्यदपूर अल अमीन नगर भागात एम व्ही रुपोशी-9 ने त्याला जोराची धडक दिली. त्यात त्याला जलसमाधी मिळाली. अपघातावेळी 60 हून अधिक लोक त्यात प्रवास करत होते. यातील 5 जणांचा मृत्यू झाला. तर 22 जणांनी पोहून आपले प्राण वाचवले.
धडक होताना ओरडत होते लोक
या प्रकरणी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत टक्कर झाल्यानंतर लोक ओरडताना दिसून येत आहेत. स्थानिक पोलीस प्रमुख शाह जमान यांनी 1 पुरुष, 3 महिला व एका मुलासह 5 जणांचे मृतदेह आढळल्याचे सांगितले आहे.
दरवर्षी होतात जहाजांना अपघात
बांग्लादेशात जहाज अपघाताच्या घटना नव्या नाहीत. देखभालीकडे दुर्लक्ष, वाईट सुरक्षा मापदंड, मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक आदी कारणांमुळे अशा घटना घडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गतवर्षी जून महिन्यातही ढाक्यात 2 जहाजांची टक्कर झाली होती. त्यात एका जहाजाला जलसमाधी मिळून 32 जणांचा बळी गेला होता. अधिकृत रिपोर्टनुसार, 1991 पासून 2020 पर्यंत बांग्लादेशात एकूण 550 जहाज दुर्घटना झाल्या. त्यात 3600 हून अधिक जण ठार, तर 500 जण बेपत्ता झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.