आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीजिंग:चीन तालिबानच्या वळचणीला, रसद बंद झाल्याने विकासात योगदानाची अपेक्षा

बीजिंग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेने अफगाणिस्तानचा निधी फ्रीझ केला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही आर्थिक साहाय्य थांबवले आहे. त्यामुळे बंदूक व गोळीची भाषा समजणाऱ्या तालिबानने चीनकडे मदतीची मागणी केली आहे. चीनने आतापर्यंत अफगाणिस्तानमध्ये शांतता व सामंजस्याला प्रोत्साहन देण्यासाठी रचनात्मक भूमिका घेतली आहे. म्हणूनच चीनने देशाच्या विकासातही योगदान द्यावे. आम्ही चीनचे स्वागत करू, असे तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीनने म्हटले आहे.

चीनच्या मीडियाला संबोधित करताना शाहीन म्हणाला, चीनची अर्थव्यवस्था मोठी असून हा मोठ्या क्षमतेचा देश आहे. अफगाणिस्तानच्या उभारणीत चीनने मोठी भूमिका घ्यायला हवी. रशिया व अमेरिकेने या भागात लढाई केली आहे. परंतु तालिबानशी सौदेबाजीद्वारे वेगाने शक्तिशाली होणारा चीन या गोष्टीचा लाभ घेऊ शकेल. कारण चीनने येथे लढाईत सहभाग घेतला नव्हता. वास्तविक पश्चिम शिनजियांग भागातील धार्मिक कट्टरवादी ही अस्थिर अशी शक्ती असल्याचे चीनला वाटत आले आहे. त्याचबरोबर तालिबानच्या वर्चस्वाखालील क्षेत्राचा वापर फुटीरवादी शक्तींना आश्रय देण्यासाठी केला जाऊ शकतो, याची चीनला धास्ती वाटते. हे लक्षात घेऊनच चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी व तालिबान प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीत शाहीनने अफगाणिस्तान उदारमतवादी इस्लामिक धोरण स्वीकारू शकते. त्यामुळे दोन्ही देशांत सहमती होईल, अशी शक्यता वर्तवली होती. कारण आता चीन तालिबानच्या वळचणीला गेला आहे.

अफगाणिस्तानात सर्वात मोठी परदेशी गुंतवणूक चीनची
तालिबान अफू, हेरॉइनमधून कमाई करतो. २०१० मधील अमेरिकी सैन्यातील तज्ज्ञ व भूविज्ञानतज्ज्ञांनी दिलेल्या अहवालात अफगाणिस्तानातील खनिज संपत्तीची माहिती देण्यात आली. लोखंड, तांबे, लिथियम, सोने, कोबाल्ट, इतर दुर्मिळ खनिजांची खाण अफगाणिस्तानात आढळते. या खनिज संपदेची किंमत सुमारे २५ लाख कोटी रुपये (३ लाख कोटी डॉलर) सांगितली जाते. तालिबान चीनच्या मदतीने हा खजिना काढू शकतो. या खनिजांच्या साह्याने इलेक्ट्रिक कार, मोबाइल फोन, टीव्ही-संगणक, लेझर, बॅटरीची निर्मिती होऊ शकते. इलेक्ट्रिक कार, स्मार्टफोन, लॅपटॉपच्या बॅटरीमध्ये लिथियमची मागणी जगभरात अचानक वाढली. त्याची मागणी दरवर्षी २० टक्क्यांनी वाढत आहे. पश्चिमेकडील देशांनी तालिबानसोबत काम करणार नाही, असे म्हटले असले तरी चीन, रशिया, पाकिस्तानसोबत काम करण्यास ते इच्छुक आहेत. अफगाणिस्तानात सर्वाधिक गुंतवणूक करणारा चीन या स्पर्धेत पुढे निघून जाऊ शकतो. एवढेच नव्हे तर चीन-तालिबान परस्परांचा लाभ होईल असा सौदा करू शकतात. काही दिवसांत तालिबानचे मनसुबे आणखी स्पष्ट होतील. चीनला आपल्या प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी तालिबानसोबत जाणे गरजेचे ठरणार आहे.

तालिबानकडे तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने ‘ड्रॅगन’ संधी साधणार
संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्यानुसार तालिबानने २०२० मध्ये वार्षिक १२ हजार कोटी रुपयांची कमाई केली होती. ३ हजार ४८० कोटी रुपये खनिजाच्या बेकायदा उत्खननातून कमावण्यात आले होते. अफगाणिस्तानातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या मूल्याच्या तुलनेत ही कमाई काहीही नाही. चीन दुर्मिळ खनिजांच्या शोधात जगात अग्रेसर मानला जातो. तालिबानकडे ही संपदा काढण्यासाठी तंत्रज्ञान नाही. त्याचबरोबर संघटनेला परदेशातून मदतही मिळणे शक्य नाही.

महिला पत्रकारांनी काम करण्याचा अधिकार मागितला
अफगाणिस्तानच्या महिला पत्रकारांनी तालिबानकडे काम करण्याचा अधिकार मागितला आहे. प्रसिद्ध अँकर शबनम खान व पत्रकार खदीजा म्हणाल्या, आम्हाला कामावर परतायचे आहे. परंतु परवानगी दिली जात नाही. खदीजा म्हणाल्या, तालिबानने नव्या संचालकांची नियुक्ती केली आहे. आम्ही त्यांच्याशी देखील चर्चा केली. परंतु ती निष्फळ ठरली.

बातम्या आणखी आहेत...