आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना विषाणू:चीनने दबावातून विषाणूची खरी बातमी दडपली; 17 हजारहून अधिक लोकांना अटक केली

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक वर्षापूर्वी वुहानमधून जगभरात पसरलेल्या महामारीबद्दल आता कोणाला आठवतही नाही

ली युआन
गेल्या वर्षी याच आठवड्यात चीनचा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष अनेक दशकांतील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत होता. वुहान शहराला कोरोनाने हादरवून टाकले होते. थोड्याच दिवसांत महामारी लपवण्याचे सरकारचे प्रयत्न उघडकीस आले. ऑनलाइन माध्यमांतून जनतेचा रोष उफाळला. उदारमतवादी आणि खुल्या विचारांच्या चिनी लोकांना आशा होती की ही शोकांतिका सरकारविरुद्ध चिनींना एकत्र करील. बहुधा जगातील सर्वात शक्तिशाली प्रचार यंत्रणा कोसळण्याची ही वेळ होती. तथापि, असे झाले नाही. मागील वर्षाच्या आठवणी धूसर झाल्या आहेत. महामारीसंदर्भात खऱ्या बातम्या देणारे लेखक, पत्रकार आणि ब्लॉगर यांना तुरुंगात पाठवण्यात आले. अनेक लोक बेपत्ता आहेत. पोलिसांनी १७ हजारहून अधिक लोकांना अटक केली.

चीनने लोकांच्या ऐकण्याच्या, पाहण्याच्या आणि विचार करण्याच्या क्षमतेवर नियंत्रण मिळवले असल्याचे या शोकांतिकेतून दिसते. चीन सरकारने दाखवून दिले की अगदी वाईट स्थितीतही ते जनतेला सोबत घेऊ शकतात. या आजाराच्या प्रादुर्भावाशी संबंधित मोठ्या संख्येने पोस्ट, लेख, फोटो आणि व्हिडिओ चीनच्या सोशल मीडियावरून काढले गेले आहेत. विषाणू प्रादुर्भावाचा इशारा देणाऱ्या डॉ. वेन लियांग यांच्या मृत्यूनंतर अनेक चिनींनी ऑनलाइन बंड पुकारले होते. त्या वेळी एका मध्यमवयीन चिनी विचारवंताने ऑनलाइन सांगितले की, त्याच्या अंदाजानुसार आता उदारमतवादी व स्वतंत्र चिनी लोकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ५ ते १०% वरून ३० ते ४०%पर्यंत वाढेल. त्याच वेळी एक राजकीय वैज्ञानिक म्हणाला की, स्वतंत्र चिनी इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या कमी होईल. कम्युनिस्ट सरकारच्या नेतृत्वात चिनी जनता ३ महिन्यांनी या आजारावरील नेत्रदीपक विजयाचा आनंद साजरा करील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता.

अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वात सरकार अधिक असहिष्णु झाले आहे. २०२० मध्ये वुहानच्या महिला लेखक फेंग ​​फेंग यांच्यावर चिनी इंटरनेटवर सर्वाधिक आसूड ओढले गेले. लॉकडाऊनचे अनुभव ऑनलाइन डायरीत लिहिले, हा त्यांचा दोष होता. ट्रोल्सनी त्यांना लबाड, गद्दार, खलनायक आणि साम्राज्यवादी श्वान असेही म्हटले. अमेरिकेत त्यांच्या डायरीचा इंग्रजी अनुवाद झाल्यानंतर त्यांच्यावर सरकार आणि चिनी जनतेची बदनामी केल्याचा आरोप झाला. चीनमधील कोणताही प्रकाशक त्यांची पुस्तके छापण्यासाठी तयार नाही. वुहानच्या स्वयंसेवक गटामधील यी म्हणतात की, मोठ्या संख्येने लोक मरण पावले, पण कोणाचीही जबाबदारी निश्चित केली गेली नाही.

सरकार नेहमीच आपल्या गंभीर चुकांवर पडदा टाकते
बातम्या आणि माहिती सक्तीने दडपली नाही तर देश चालवणे कठीण होईल, असे चीनच्या कम्युनिस्ट सरकारने लोकांना शिकवले. सरकारने आपल्या गंभीर चुका काटेकोरपणे लपवल्या आहेत. ग्रेट लीफ फॉरवर्ड, सांस्कृतिक क्रांतीसारखी मोहीम आणि तियानमेन चौक ही त्याची उदाहरणे आहेत. त्या वेळी यामध्ये मोठ्या संख्येने लोकांनी जीव गमावला होता. सांस्कृतिक क्रांतीच्या वेळी पीडितांनी कादंबऱ्यांतून आपल्या आठवणी लिहिल्या होत्या. सरकारने तत्काळ या पुस्तकांवर बंदी घातली.

खरे चित्र लपवण्यासाठी प्रत्येक स्तरावर लादली कठोर सेन्सॉरशिप
महामारीच्या सुरुवातीच्या काळात चिनी सरकारने स्थानिक पातळीवरही कडक सेन्सॉरशिप लावली. लोकांची प्रत्येक पोस्ट वाचली आणि ऐकली गेली. असंतोष व्यक्त करणाऱ्यांना गप्प केले. पोलिसांनी १७ हजारहून अधिक लोकांना अटक केली. या लोकांवर साथीच्या संदर्भात बनावट आणि खोट्या बातम्या पसरवण्याचा आरोप होता. वुहानमध्ये ११ आठवड्यांनी लॉकडाऊन संपला. जगातील अनेक वेबसाइट्सवर वुहानच्या गर्दी असलेल्या जलतरण तलावांचे फोटो दिसू लागले. विषाणूची लागण आणि मृत्यूंवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रकरणात चीन यशस्वी उदाहरण म्हणून समोर आला. दुसरीकडे अमेरिकेसह इतर देशांमध्ये मृत्यू आणि संसर्गाची आकडेवारी गगनाला भिडणारी होती.

बातम्या आणखी आहेत...