आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत ख्रिसमसमध्ये जेव्हा मुले सुट्यांचा आनंद घेत होती तेव्हा दुसरीत शिकणारा डिलन आपले पुस्तक लिहिण्यात व्यग्र होता. शीर्षक होते,‘अॅडव्हेंचर्स ऑफ डिलन हेलबिग्स ख्रिसमस.’ आपले पुस्तक इतरांनीही वाचावे अशी ८ वर्षीय डिलनची इच्छा होती, पण त्याला पर्याय सुचत नव्हता. त्यामुळे त्याने स्वत:च पुस्तकाचा प्रचार करण्याचे ठरवले. आजीसोबत लायब्ररीत गेला असता डिलनने पुस्तकावर सही करून ते गुपचूप शेल्फमध्ये ठेवले. काही दिवसांनी पालकांना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी पुस्तक परत घेण्यासाठी लायब्ररीत कॉल केला. तेव्हा डिलनचे पुस्तक हिट झाल्याचे त्यांना कळले.
पुस्तकासाठी ५६ लोकांची प्रतीक्षा यादी आहे. प्रत्येक वाचकाने ४ आठवडे पुस्तक ठेवले तर शेवटच्या व्यक्तीचा क्रमांक दोन वर्षांनंतर येईल. पुस्तकात स्पेलिंगच्या खूप चुका असल्या तरीही ते लोकांना आवडत आहे. सुरुवातच रंजक पद्धतीने केली आहे...‘हिवाळ्याचे दिवस होते, ख्रिसमस आला. मी पाच ख्रिसमस ट्री डेकोरेट करत होतो, तेव्हा एका ट्रीमधील चांदणीत स्फोट होतो. बहुधा सांताक्लॉज प्रकट होतो. यात एक ट्री वेब पोर्टलप्रमाणे दिसते. या पोर्टलद्वारे सांता मला टाइम ट्रॅव्हलद्वारे भूतकाळात घेऊन जातो. तो १६२१ मध्ये पोहोचतो. तेव्हा पहिला थँक्स गिव्हिंग डे साजरा झाला होता.’
पुढील प्रकरणात उत्तर ध्रुव दिसतो. शेवटी डिलनने ख्रिसमस न आवडणाऱ्या ग्रिंचचा (काल्पनिक पात्र) उल्लेखही केला आहे. डिलनने या पुस्तकाचा पुढील भाग आणि नवीन पुस्तक ‘जॅकेट-ईटिंग क्लोजेट’ वर काम सुरू केले आहे. डिलन सांगतो,‘केजीत असताना मी मधल्या सुटीत जॅकेट काढून ठेवत होतो. परत आल्यावर ते मिळायचे नाही. अनेक जॅकेट हरवले आहेत. त्यावरच ही कथा आहे.’ एवढ्या कमी वयात अशी कल्पनाशक्ती पाहून स्थानिक लेखक क्रिस्टियन डेन यांनी डिलनसमोर मुलांसाठी लेखन कार्यशाळा घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
‘यंग नॉव्हेलिस्ट’ पुरस्कार मिळाला, पुस्तकाच्या झेरॉक्स काढत आहे लायब्ररी
या कादंबरीमुळे डिलन संपूर्ण देशभरात चर्चेत आहे. लेक हेजल ब्रँच लायब्ररीचे मॅनेजर हार्टमन यांनी सांगितले की, अनेक मुलांनी डिलनप्रमाणे पुस्तक लिहिण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हार्टमन यांच्या सहा वर्षांच्या मुलालाही हे पुस्तक आवडते. अनेक प्रकाशकांनी पुस्तक प्रकाशित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.