आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री गणेशाची पूजा भारताबाहेर इतर देशांतही केली जाते. मात्र असा एक देश आहे, जेथे पूर्ण शहरच विघ्नहर्त्याला समर्पित आहे. आम्ही सांगतोय थायलंडबद्दल. येथील चाचोएंगसाओ शहर ‘सिटी ऑफ गणेशा’ म्हणून ओळखले जाते. येथे गणेशाच्या अनेक अनोख्या मूर्ती आहेत. फ्रांग अकात येथे गणेशाची ४९ मीटर उंच मूर्ती आहे, तर जगातील सर्वात उंच ३९ मीटरची कांस्याची मूर्ती गणेश इंटरनॅशनल पार्कमध्ये आहे. हे शहर बँकॉकपासून ८० किमी अंतरावर आहे. म्हणूनच ते पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. थायलंडमध्ये गणेश ‘फ्ररा फिकानेत’ म्हणून पुजले जातात. त्यांना विघ्नहर्ता व यशाचे दैवत मानले जाते. नवीन व्यवसाय व लग्नानिमित्त त्यांची पूजा केली जाते. थम्मासेट विद्यापीठातील सोमचाई जारन सांगतात, गणेश आमच्या संस्कृतीचा भाग आहे. लोक गणपतीची प्रतिमा कार्यालय व दिवाणखान्यात लावतात. जेव्हा ते भारतात अलिगड मुस्लिम विद्यापीठात शिकायला आले तेव्हा राम, विष्णू व भगवान गणेश यांच्यात त्यांची आस्था आणखी वाढली. ते सांगतात, सामन रतनाराम मंदिरातील बाप्पाची आराम करणाऱ्या मुद्रेतील सर्वात मोठी मूर्ती आहे. दर्शनासाठी २० देशांतील नागरिक येतात.
थायलंड बौद्धबहुल लोकसंख्येचा देश. मात्र, लोक मोठ्या प्रमाणात गणेश चतुर्थी साजरी करतात. संस्कृतीवर गणपतीचा इतका प्रभाव आहे की, थायलंडच्या ललित कला विभागाच्या लोगोतही श्रीगणेश आहे. २०१६ पर्यंत ६० वर्षे सत्तेत असलेले राजा राम (नववे) भारतीय संस्कृतीला मानणारे होते. त्यांच्या कार्यकाळात विष्णू, शिव यांच्यासोबत श्रीगणेशातील आस्था वाढली. गणेश इंटरनॅशनल सेंटरही तेव्हाच झाले.
गणेश इंटरनॅशनल पार्कमध्ये बाप्पाची ३२ रूपे, ८५४ भाग जोडून बनली कांस्यमूर्ती
गणेश इंटरनॅशनल पार्कमध्ये गणपतीच्या ३२ रूपातील मूर्ती आहेत. सर्वात उंच मूर्ती बाल गणेशाची आहे, ज्यांच्या एका हातात फणस, दुसऱ्यात केळी, तिसऱ्यात ऊस तर चौथ्यात आंबा आहे. हे पृथ्वीच्या सुपीकतेचे प्रतीक आहेत. मस्तकावर कमळाचे फूल आणि त्याच्या मध्यभागी ‘ओम’ आहे. ही मूर्ती कांस्याचे ८५४ भाग एकत्र करून बनवली आहे. फ्रांग अकात मंदिरात श्री गणेश आशीर्वाद देताना दिसतात. समन वत्तानरम मंदिरात श्रीगणेशाची १६ मीटर उंच आणि २२ मीटर लांब मूर्ती आहे.
(शब्दांकन : रितेश शुक्ल)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.