आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआफ्रिकेतील कांगोमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पुरासह भूस्खलनही झाले आहे. या महापुरात आतापर्यंत 170 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. रॉयटर्सनुसार दक्षिण किव्हू प्रांतात कालेहे भागात 4 मे रोजी एका नदीची पाणी पातळी वाढल्याने पूर आला. या पुराचे पाणी बुशुशु आणि न्यामुकुबी गावात शिरले.
पुरामुळे संपूर्ण गाव उध्वस्त झाल्याचे न्यामुकुबीतील रहिवासी मुपेंडा यांनी सांगितले. पुरात त्यांच्या आईसह 11 मुले वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. तर पुरामुळे उध्वस्त झालेल्या घरांच्या ढिगाऱ्यात आम्ही स्वकियांचा शोध घेत असल्याचे दुसऱ्या एका रहिवाशाने सांगितले. पुराच्या थैमानात घरे-दारे वाहून गेल्याने नागरिकांना उघड्यावरच रहावे लागत आहे.
कांगोतील पुराचे काही फोटो पाहा...
मृतांचा आकडा वाढू शकतो
किव्हू प्रांताच्या गव्हर्नरनी सांगितले की, इथली अनेक घरे पूर्णपणे बुडाली आहेत. शाळा, महाविद्यालये पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. पिण्याचे पाणी वीज पुरवठाही बंद झाला आहे. आतापर्यंत 176 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढूही शकतो. 100 हून अधिक जण अद्याप बेपत्ता आहेत.
तथापि, स्थानिक नागरी सोसायटीच्या सदस्यांनी दावा केला आहे की, 226 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
मदत कार्यात अडथळे
अनेक ठिकाणी मदतकार्य सुरू आहे. एका बचाव कर्मचाऱ्याने सांगितले की, पावसामुळे सगळीकडे चिखल साचला असून यामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत. अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. दुसरीकडे एका डॉक्टरांनी सांगितले की, त्यांची टीम दोन दिवसांपासून अखंडितपणे नागरिकांची मदत करत आहे.
रवांडातही पूर
कांगोच्या शेजारील रवांडातही पुराने थैमान घालत जनजीवन उध्वस्त केले आहे. 2 मेपासून सुरू झालेल्या पावसामुळे इथे महापूर आला आहे. रवांडातही पुराने आतापर्यंत 130 जणांचा बळी घेतला आहे. तर 5 हजारहून अधिक घरे उध्वस्त झाली आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.