जगात कोरोनामुळे आतापर्यंत 3,92,336 प्रकरणे; 17,147 जणांचा मृत्यू, स्पेनमध्ये आढळले वृद्धांचे मृतदेह

कोरोनाचे केंद्र राहिलेल्या चीनच्या वुहान शहरात दोन महिन्यांनंतर मेट्रो रेल्वे पुन्हा सुरू झाल्या. कोरोनाचे केंद्र राहिलेल्या चीनच्या वुहान शहरात दोन महिन्यांनंतर मेट्रो रेल्वे पुन्हा सुरू झाल्या.

  • न्यूयॉर्क सिटीत हजारापैकी एक जण कोरोना विषाणूच्या संकटात

वृत्तसंस्था

Mar 25,2020 08:59:00 AM IST

वॉशिंग्टन / बीजिंग - अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत ४६ हजार २७४ प्रकरणे समोर आली आहेत, तर संसर्गामुळे ५८७ जणांचा मृत्यू झाला. २ हजार ५४० नवीन प्रकरणे समाेर आली. एका दिवसात २९ लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत केवळ २९५ लोक बरे झाले. या दरम्यान अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी सरकारला इशारा दिला आहे. व्हाऊस हाऊसमध्ये कोरोना प्रकरणाचे समन्वयक डॉ. डेबोराह ब्रिक्स म्हणाले, न्यूयॉर्क सिटीमध्ये प्रत्येकी हजारव्या व्यक्तीला कोरोनाचा धोका आहे. इतर शहरांच्या तुलनेत न्यूयॉर्क सिटीमध्ये कोरोनाचा तडाखा ५ पट जास्त आहे.


लोकसंख्येची घनता जास्त असल्याने हा धोका वाढत चालला आहे. या शहराची लोकसंख्या ८४ लाख आहे. प्रती चौरस मैलमध्ये २८ हजार लोकांचा रहिवास आहे. रहिवासी इमारती व रेल्वेमुळे लोक दाटीवाटीने राहतात. त्यामुळेच संसर्गाचा वेग वाढत आहे. सरकारने सर्व रुग्णालयांतील आपली क्षमता ५० टक्क्यांनी वाढवण्याचे आदेश दिले आहेत. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात प्रती चौरस मीलमध्ये ७३ हजार लोक राहतात. जगभरातील १९६ देशांत कोरोनाचा फटका बसला आहे. आतापर्यंत ३ लाख ९२ हजार ३३६ प्रकरणे समोर आली तर १७ हजार १४७ जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे १,०३,३९३ बरे झाले. चीनमध्ये अजूनही सर्वाधिक ८१ हजार १७१ प्रकरणे आहेत. त्यापैकी ९० टक्के बरे झाले.


स्पेन : रिटायरमेंट होम्समध्ये आढळले वृद्धांचे मृतदेह

माद्रिद | स्पेनमध्ये आतापर्यंत ३९,६७३ प्रकरणे समोर आलीत. तर २६९६ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे एका दिवसात ३८५ लोकांचा मृत्यू झाला. लष्कराला रिटायरमेंट होम्समध्ये सॅनिटायझेशन करताना अनेक वृद्धांचे मृतदेह आढळले. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यांचा खरा आकडा सांगण्यात आलेला नाही. वाढत्या घटना बघून मॅड्रिडमधील एका शॉपिंग मॉलच्या आइस रिंकला तात्पुरते शवगृह बनवण्यात आले आहे.


एशिया: नेपाळमध्ये बंद, न ऐकल्यास होणार कारावास

नेपाळमध्ये मंगळवारी आठवडाभरासाठी लॉकडाऊन सुरू झाले. बंदचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपयांचा दंड आणि कैद किंवा दोन्ही होऊ शकते. थायलंडमध्ये एक महिन्यासाठी आणीबाणी लावण्यात आली आहे. पंतप्रधान प्रयुथ चान- ओचा यांनी ही घोषणा केली. येथे १०६ नवे रुग्ण आढळलेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढून ८२७ झाली आहे. पाकिस्तानात आतापर्यंत ९१८ प्रकरणे समोर आली आहेत. सात जणांचा मृत्यू झाला आहे.


इटली : ५६% मृत ८० वर्षांचे, वृद्ध म्हणाले- असा मृत्यू नको

रोम| इटलीत ६३,९२७ प्रकरणे समोर आले आहेत. तर ६०७७ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये जरी सर्वाधिक प्रकरणे समोर आली असली तरी सर्वाधिक मृत्यू इटलीत झालेत. नॅशनल हेल्थ इन्स्टिट्युटच्या नुसार मृतांमध्ये ५६ टक्के जण ८० वर्षापेक्षा जास्त वयाचे. दरम्यान, अनेक वृद्धांनी सांगितले की, लवकर किंवा उशीरा मरू. मात्र या प्रकारचा मृत्यू नको. इटलीत ६५ वर्षापेक्षा जास्त वयाचे २८ टक्के लोक एकटे राहतात.

X
कोरोनाचे केंद्र राहिलेल्या चीनच्या वुहान शहरात दोन महिन्यांनंतर मेट्रो रेल्वे पुन्हा सुरू झाल्या.कोरोनाचे केंद्र राहिलेल्या चीनच्या वुहान शहरात दोन महिन्यांनंतर मेट्रो रेल्वे पुन्हा सुरू झाल्या.