आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना लस:ब्रिटनमध्ये उद्यापासून लसीकरण, समोर आला व्हॅक्सिन फ्रिजर्सचा फोटो; यूएस प्राधान्यक्रम ठर‌वण्यात व्यग्र

लंडन/न्यूयॉर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीन : 140 कोटी नागरिकांसाठी राबवणार लसीकरण अभियान

कोरोना महामारी विरोधातील जगभराचे युद्ध आता निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. ब्रिटनमध्ये मंगळवारपासून लसीकरण सुरू होत आहे. अमेरिकेकडूनही याबाबत लवकरच परवानगी मिळू शकते. भारत, चीनसह आशियाई देशांतही मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झाली आहे. दरम्यान लस आधी कोणाला दिली जाईल, यावर अमेरिकेत चर्चा सुरू आहे. वृद्ध आणि कोरोना महामारीत सेवा बजावणाऱ्यांना ही लस आधी दिली जाऊ शकते. याशिवाय सुमारे ७०० महामारी तज्ञांच्या सर्वेक्षणानुसार, जोपर्यंत ७० टक्के लोकसंख्येला लस टोचली जात नाही तोपर्यंत मास्क, सॅनिटायझेशनसारखे बचावात्मक उपाय सुरू ठेवणे गरजेचे असणार आहे.

अमेरिका : लसीकरणासाठी वयाप्रमाणेच सामाजिक न्यायाचाही केला जावा विचार
फायझरने ब्रिटनप्रमाणे अमेरिकेतही कोरोना लसीच्या आपातकालीन वापराची परवानगी मागितली आहे. दरम्यान, लस कोणाला आधी देण्यात यावी, यावर देशात विचार सुरू आहे. अमेरिकेने लसीसाठी केलेल्या करारांनुसार अभियान राबवले गेल्यास संपूर्ण देशभरात जुलै-ऑगस्टपर्यंत लसीकरण पूर्ण होईल. यामुळे सर्वांनाच सुरुवातीच्या टप्प्यात लस देणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर प्राध्यानक्रमाबाबत वादविवाद सुरू झाला आहे. यात वृद्ध आणि गंभीर आजारांचा सामना करणाऱ्या लोकांना आधी लस देण्यात यावी, असा युक्तिवाद सुरू आहे. दुसरीकडे, अत्यावश्यक सेवेतील लोकांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगत त्यांना सर्वप्रथम लस देण्यात यावी, असे म्हटले जात आहे. कोरोनामुळे वाढलेल्या आर्थिक असमानतेवरही लक्ष देण्याची मागणी होत आहे. गरीब आणि कृष्णवर्णीयांना महामारीचा सर्वाधिक फटका बसला आहे. परिणामी त्यांना प्राधान्य देण्यात यावे, असे म्हटले जात आहे. अमेरिकेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनेचे प्रमुख विलियम जे बार्बर म्हणाले, लस कोणाला आधी देण्यात यावी, हे ठरवावे लागणे दु:खद आहे. प्राधान्यक्रमात गरीब आणि कमी उत्पन्न असणाऱ्यांचा क्रमांक सर्वात अखेरीस येऊ नये, याबाबत काळजी घेण्यात यावी.

क्रमांक आल्यावर घेईन लस : फायझर यूके प्रमुख
ब्रिटनमध्ये फायझरचे सीईओ बेन ओस्बॉर्न म्हणाले की, लस सुरक्षित आहे. तत्काळही घेता येईल. मात्र सरकारच्या नियमांनुसार आमचा क्रमांक आल्यावरच मी आणि माझे कुटुंबीय लस घेणार आहोत. मात्र आईला लवकर डोस देण्यात यावा, अशी इच्छा बेन ओस्बॉर्न यांनी व्यक्त केली आहे.

चीन : 140 कोटी नागरिकांसाठी राबवणार लसीकरण अभियान
ब्रिटन नंतर आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश चीनमध्ये लसीकरणाची तयारी मोठ्याप्रमाणात सुरू आहे. तेथील स्थानिक सरकारे स्वदेशी कोरोना लस मागवण्यासाठी करार करत आहे. मात्र देशातील १४० कोटी नागरिकांना लस कशी देण्यात येईल याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलेले नाही. चीनमध्ये विकसित होणाऱ्या ५ पैकी ४ लस निर्मात्यांनी रशिया, इजिप्त आणि मेक्सिकोसह एक डझन देशांत चाचणी सुरू केली आहे.

पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत आयुष्य पुन्हा रुळावर येऊ शकेल : तज्ज्ञ
न्यूयॉर्क टाइम्सने देशातील ७०० महामारी तज्ज्ञांवर एक अनौपचारीक सर्वेक्षण केले. ज्यात ३० टक्के म्हणाले, लस घेतल्यानंतरच आपल्या सवयीत बदल होईल. त्यांच्यानुसार, प्रभावी लसीचे वितरण व्यापक स्वरूपात केेले गेल्यास अमेरिकी नागरिक आगामी काळात निश्चिंत राहू शकतील. मिशिगन विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक कॅली स्ट्रज्झ यांच्यानुसार, लसीकरणामुळे पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत आपले आयुष्य पुन्हा रुळावर येईल, अशी मला आशा आहे.

ब्रिटन : बॉक्स उघडण्यासाठी परवाना असणे गरजेचे, सध्या बेल्जियमहून आलेल्या लसीची तपासणी सुरू
ब्रिटनमध्ये मंगळवारी लसीकरण सुरू होईल. सुमारे ९५ टक्के प्रभावी असणाऱ्या फायझर लसीच्या वापरास परवानगी देणारा ब्रिटन पहिला देश आहे. दरम्यान, रविवारी प्रथमच कोरोना प्रतिबंधक लस ठेवलेल्या फ्रिजर्सचे छायाचित्र समोर आले. या लसी कुठे ठेवण्यात आलेल्या आहेत हे सार्वजनिक करण्यात आलेले नाही. पब्लिक हेल्थ इंग्लडने हे छायाचित्र जारी केले आहे. मात्र, फ्रिझरमध्ये ठेवलेल्या व्हॅक्सिन वॉइलचे छायाचित्र समोर आलेले नाही. ही फ्रिझर्स लस उणे ७० ते उणे ८० अंश तापमानात ठेवण्यात सक्षम आहे. लसीची सध्या पोस्ट डिलिव्हरी क्वालिटी चेक (मिळाल्यानंतरची सुरक्षा तपासणी) सुरू आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser