आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेत कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, आपत्कालीन कर्मचारी आणि वृद्धांना लस दिली जाणार आहे. मात्र अनेक केंद्रांवरील रांगांमध्ये पहिल्या टप्प्यात समाविष्ट नसलेले सामान्य लोकही घुसखोरी करू लागल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे संसर्गाची जोखीम वाढू शकते. त्यावरून आरोग्य कर्मचाऱ्यांत संतापाची भावना आहे. न्यूयॉर्कच्या सर्वात प्रतिष्ठित रुग्णालयांपैकी एक मॉर्गन स्टेन्ली चिल्ड्रन रुग्णालयात नवव्या मजल्यावरील रांगेत सहभागी लाेकांची निगराणी केली जात नसल्याची अफवा पसरली. त्यानंतर रांगेत कोणीही शिरून लसीकरण करून घेत आहे. अशा प्रकारच्या घटना अमेरिकेतील इतर केंद्रांवरदेखील घडत असल्याची चर्चा आहे. वास्तविक नियमानुसार सर्वाधिक धोका असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आधी लस देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याची ऐेशीतैशी झाली आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली.
नोकरीवरून काढण्याची धमकी
न्यूयॉर्क टाइम्सने या प्रकरणात अनेक रुग्णालयांतील डॉक्टर व परिचारिकांशी चर्चा केली. त्यापैकी अनेकांनी लस वितरण व लसीकरणाच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला. परंतु त्याबाबत आपले नाव सार्वजनिक करण्याची त्यांची इच्छा नाही. सूत्रांच्या मते या घटनेबद्दल वाच्यता करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा रुग्णालयांनी दिला आहे. नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचारी गप्प आहेत. आमच्या अनेक सहकाऱ्यांनी लसीकरणाच्या रांगेत लाभ घेऊन आपले छायाचित्र पोस्ट केल्याने आम्हाला ही गोष्ट लक्षात आल्याचे काहींनी नमूद केले.
बाधितांची संख्या ८ कोटींहून जास्त
जगभरात कोरोनाबाधितांची संख्या ८ कोटींहून जास्त होणार आहे. सध्या २.२ कोटी लोक सक्रिय आहेत. म्हणजेच हे प्रमाण २७ टक्के आहे. ७५ लाखांहून जास्त सक्रिय रुग्ण तर अमेरिकेत आहेत. भारतात सक्रिय रुग्ण २.८२ लाखांवर आहेत. फ्रान्समध्ये सुमारे २५ लाख बाधितांपैकी २२ लाख सक्रिय आहेत. अमेरिकेत गुरुवारी १.९३ लाख रुग्ण समोर आले आहेत, तर २,८३६ जणांनी प्राण गमावले. युरोपात ४,६८० जणांनी प्राण गमावले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.