आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अनेक विकसनशील देशांवर कोरोनाबाधितांचे खरे आकडे लपवल्याचा आरोप केला जातो. परंतु हाच आरोप अमेरिकेसारख्या प्रगत देशावर होऊ शकतो. अमेरिकेची सरकारी संस्था सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (सीडीसी) जारी केलेल्या आकडेवारीवरून हा आरोप करण्यास वाव आहे. सीडीसीच्या अहवालानुसार नोव्हेंबरपर्यंत अमेरिकेतील १४.३ टक्के लोकसंख्येत कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक अँटिबॉडी विकसित झाल्या होत्या. म्हणजेच हे सर्व लोक विषाणुबाधित होते. १५ नोव्हेंबरला अमेरिकेने देशातील बाधितांची एकूण संख्या १.१ कोटी सांगितली होती. परंतु तेव्हा वास्तविक आकडा ४.६९ कोटी होता. मग हाच ट्रेंड आताही सुरू असल्यास अमेरिकेत एकूण बाधितांची संख्या ८ कोटींहून जास्त असू शकते. सध्या अधिकृत आकडा मात्र २.१५ कोटी सांगितला जातो. अहवालानुसार सुमारे ३५ टक्के मृत्यूंबाबतची माहिती जाहीर झालेली नाही. ५.६१ लाख लोकांना प्राण गमवावे लागले.
युरोप : लसीकरणाचा वेग मंद, नागरिकांना लवकर दिलासा नाही
युरोपीय संघाने ४५ कोटी लोकांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. परंतु त्याचा वेग कमी आहे. त्यामुळे लोकांना संसर्गापासून लवकर दिलासा मिळण्याची शक्यता धूसर आहे. युरोपात दररोज सुमारे १ लाख नवे बाधित येत आहेत. त्याशिवाय दररोजच्या मृतांची संख्याही अमेरिकेपेक्षा जास्त आहे. अमेरिका व ब्रिटनने आतापर्यंत १ ते २ टक्के लोकसंख्येचे लसीकरण केले. ईयूमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था जर्मनीत आकडा ०.४ टक्के आहे. नेदरलँडमध्ये लसीकरण सुरू नाही.
आज जपानमध्ये आणीबाणीची घोषणा, मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनास मनाई
कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जपान गुरुवारपासून आणीबाणीची घोषणा करू शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या घोषणेचा फटका टोकियो व परिसरातील तीन प्रमुख भागांना बसू शकतो. बार व रेस्तराँच्या माध्यमातून होणारा संसर्ग कमी करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. जपानमध्ये कोरोनाचे १,५९१ रुग्ण समोर आले होते. मोठ्या कार्यक्रमात एक ते दोन हजार लोकांना एकत्र येण्याची मुभा असेल. सध्या ५ हजार संख्येला परवानगी आहे.
चीनच्या कुरापती सुरू : आरोग्य संघटनेच्या टीमला व्हिसा देण्यास नकार
संपूर्ण जगाला कोरोना महामारी देणाऱ्या चीनच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. चीनच्या सरकारने जागतिक आरोग्य संघटनेच्या टीमला व्हिसा नाकारला आहे. ही टीम चीनला भेट देऊन कोरोनाचा उगम शोधणार होती. या काळात चीन टीमच्या हाती काही पुरावा लागणार नाही, याची तयारी करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.