आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Cynthia D. Ritchie Rehman Malik Yousaf Raza Gillani | American Blogger Based In Pakistan Levels Rape Allegations Against Former Interior Minister Rehman Malik And Psychically Manhandling Her By PM Yousaf Raza Gillani

आरोप:पाकिस्तानच्या माजी गृहमंत्र्यांवर बलात्काराचे आरोप; माजी पंतप्रधान गिलानींनी सुद्धा गैरवर्तन केल्याचा अमेरिकन महिलेचा दावा

इस्लामाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात राहणाऱ्या एका अमेरिकन ब्लॉगरने पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांसह माजी गृहमंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. माजी गृहमंत्री रहमान मलिक यांनी आपल्यावर बलात्कार केला होता असे सिंथिया डी रिची हिने म्हटले आहे. एवढेच नव्हे तर, माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी आपल्यासोबत शारीरिक गैरवर्तन केले असेही आरोप तिने केले आहेत. सिंथियाने सांगितल्याप्रमाणे, या दोन्ही घटना 2011 च्या आहेत. त्यावेळी बेनझीर भुत्तो यांचा पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) ची सत्ता होती. सध्या या पक्षाचे अध्यक्ष बेनझीर यांचा मुलगा बिलावल भुत्तो आहेत.

इम्रान खान यांच्या सोशल मीडिया टीमच्या सदस्य सिंथिया

सिंथियाने शुक्रवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करून रहमान मलिक आणि गिलानी यांच्यावर आरोप केले. सिंथियाने सांगितले की 2011 मध्ये ती राष्ट्रपती भवनात होती. सिंथियाने काही ट्विट सुद्धा केले. त्यानुसार, मला ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देण्यात आले होते. मी शांत होते, कारण पीपीपीची सत्ता असताना माझी मदत कुणीच केली नसती. आता मला कुणाचीही भीती नाही. मी सर्वांचा सामना करण्यास तयार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, सिंथिया सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सोशल मीडिया टीममध्ये कार्यरत आहे.

दूतावासाला दिली होती माहिती

सिंथियाने सांगितल्याप्रमाणे, त्या घटनेची माहिती तिने पाकिस्तानातील अमेरिकन दूतावासाला दिली होती. पण, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळी अमेरिकेचे पाकिस्तानशी मैत्रीचे संबंध होते. सिंथियाने पीपीपीवर घाणेरड्या राजकारणाचे आरोप केले आहेत. माझा आवाज साऱ्या जगाने ऐकावा असे ती म्हणाली.

सिंथियाने आरोप केल्यानंतर काही ट्विट देखील पोस्ट केले. त्यामध्ये पीपीपीचे सदस्य आणि समर्थक आपल्याविरुद्ध गलिच्छ भाषा वापरत असल्याचे तिने म्हटले आहे. बलात्काराच्या विरोधात सर्व महिलांनी एकत्रित यावे. हे प्रकरण केवळ पीपीपीचे नाही. इतर काही राजकीय पक्षांनी सुद्धा माझे शोषण केले. मी या घटनांची माझ्या कुटुंबियांना सुद्धा माहिती दिली नाही. मी नेहमीच जगात पाकिस्तानची चांगली इमेज बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

माजी पंतप्रधान गिलानी म्हणाले...

पाकिस्तानी मीडिया जियो न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेत माजी पंतप्रधान गिलानी यांनी आपल्यावरील आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले. एखादा पंतप्रधान राष्ट्रपती भवनात असे वर्तन करू शकतो का असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर माजी गृहमंत्री रहमान मलिक यांनी अद्याप यावर आपली प्रतिक्रिया जारी केली नाही. मलिक केवळ गृहमंत्रीच नव्हे, तर पाकिस्तानच्या न्युक्लिअर कमांडचे अध्यक्ष सुद्धा होते.

बातम्या आणखी आहेत...