आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्कॉटलंडची राजधानी एडिनबराच्या साऊथ क्लर्क रस्त्यावर तिबेटी संस्कृतीला प्रोत्साहन देणारा हिमालय कॅफे बंद होण्याच्या मार्गावर आहे. तो वाचवण्यासाठी तिबेटी धर्मगुरू दलाई लामांनी पुढाकार घेतला आहे. या कामासाठी सुरू झालेल्या निधी उभारण्याच्या मोहिमेला त्यांनी पाठिंबा दिला आहे. मसुरीत जन्मलेल्या रेका गावा यांनी दलाई लामांच्या भेटीनंतर हा कॅफे उघडला होता. रेका यांनी भाड्याने घेतलेली ही इमारत आता मालकाला विकायची आहे. ती इमारत खरेदी करण्याची रेका यांची इच्छा आहे, पण आर्थिक अडचणींमुळे त्या असमर्थ आहेत. हा कॅफे महत्त्वाचा का आहे आणि रेका यांनी तो वाचवण्यासाठी कोणते प्रयत्न सुरू केले आहेत ते पाहा...
कॅफेसाठी संसदेची नोकरीही सोडली, कर्ज आणि मित्रांकडून उधार घेऊन वाचवण्याचा प्रयत्न करत आहे : रेका
माझा जन्म मसुरीत झाला होता, बालपण तेथे गेले. मी १३ वर्षांची असताना आमचे कुटुंब डेन्मार्कला आले. वयाच्या २२ व्या वर्षी मला स्कॉटलंडच्या संसदेत केटरिंगचे काम मिळाले. तेथे जॉर्ज रीड यांना रोज कॉफी सर्व्ह करत होते. एकदा त्यांनी विचारले,‘दलाई लामांना ओळखतेस का? भेटण्याची इच्छा आहे का?’ मी नि:शब्द झाले. दुसऱ्या दिवशी मी ‘चुपा’ हा पारंपरिक वेश परिधान करून संसदेत गेले. मी घाबरले होते. आतापर्यंत त्यांना फोटोतच पाहिले होते. लॉबीत दलाई लामांना पाहून डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. अचानक ते माझ्याजवळ आले आणि त्यांनी माझा हात हाती घेतला. पण माझे अश्रू थांबत नव्हते, कारण ते आनंदाश्रू होते. तू कुठून आली आहेस, स्कॉटलंडमध्ये केव्हापासून आहेस, अशी विचारणा त्यांनी केली.
तिबेटी संस्कृतीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असे ते मला म्हणाले. स्कॉटलंडमध्ये राहून तिबेटी आणि भारतीय संस्कृतीला प्रोत्साहन देण्यास माझे प्राधान्य राहील, असे वचन मी त्यांना दिले. तेव्हाच ध्यानधारणा कक्ष असलेला कॅफे सुरू करायचा, असे मी ठरवले. मी संसदेची नोकरी सोडून २००७ मध्ये ‘हिमालय कॅफे’ सुरू केला. मी येथे युवकांना कम्युनिटी बिझनेस चालवण्याचे प्रशिक्षण देते. ‘पे इट फॉरवर्ड’ योजनेअंतर्गत श्रीमंत लोक कॅफेमधून गरीब आणि बेघरांसाठी जेवण खरेदी करतात. कॅफेच्या तळघरात बनवलेल्या ध्यानधारणा कक्षाचा कोणीही मोफत वापर करू शकतो. १४ वर्षांचे नाते संपू नये यासाठी मी ही इमारत खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. बँकेकडून कर्ज, मित्रांकडून उधार रक्कम घेतली आहे. तरीही ४६ लाख रुपयांची गरज आहे. पैसे जमा करण्यासाठी मी मोहीमही सुरू केली आहे. दलाई लामांच्या पाठिंब्यानंतर आशा निर्माण झाली आहे, लोक मदतीसाठी पुढे येत आहेत. तिबेटी संस्कृती जपण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करत आहात हे दलाई लामांना माहीत आहे, असा संदेश उत्तर युरोपमधील लामांचे प्रतिनिधी सोनम फारसी यांनी मला दिला आहे. तुमचा कॅफे सुरू राहील, अशी अपेक्षा दलाई लामांनी व्यक्त केली आहे.’- रेका गावा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.