आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पेशावर येथून दै. दिव्य मराठीसाठी शाह जमाल
पाकिस्तानातील पेशावरचा किस्सा ख्वानी बाजार बॉलीवूडशी असलेल्या नात्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. या भागात अवघ्या ८०० मीटरच्या परिघात प्रख्यात अभिनेते राज कपूर, दिलीपकुमार व शाहरुख खान यांची वडिलोपार्जित घरे आहेत. राज्य सरकारने राज कपूर व दिलीपकुमार यांची शंभर वर्षांपूर्वीची घरे खरेदी करून ती संरक्षित करण्याचे वचन दिले होते. मात्र आता ही घरे जर्जर झाली आहेत.
आम्ही दिलीपकुमार यांच्या घरी गेलो. माेडकळीस आलेल्या या घरात लोक चक्क कचरा फेकत असल्याचे दिसले. मालकांनीही या घराकडे लक्ष देणे बंद केले आहे. राज कपूर यांच्या वडिलोपार्जित कपूर हवेलीची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. ४० ते ५० खोल्या असलेल्या या ५ मजली इमारतीच्या वरच्या व चौथ्या मजल्याची पडझड झाली आहे. इमारतही खिळखिळी झाली आहे. २०१४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या घरांना राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले होते. पण त्याचे संरक्षण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. इतकेच नाही तर २०१८ मध्येही राज्य सरकारने ही दोन्ही घरे खरेदी करून त्यांचे संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी निधी देण्याचे जाहीर केले होते. पण किंमत ठरवण्यासाठी या घरांच्या विद्यमान मालकांशी साधा संपर्कही केला नाही.
कपूर हवेलीचे मालक हाजी इसरार शाह म्हणाले की, राज कपूर यांच्या हवेलीचे मालक असल्याचा मला अभिमान आहे. सरकारने हे घर खरेदी करून संग्रहालय बनवले तर मला खूप आनंद होईल. पण हे शक्य झाले नाही तर मी या जागी बहुमजली सिनेमागृह उभारेन. हवेलीशेजारी राहणारे व माजी महापौर अब्दुल हकिम सफी म्हणतात, ही हवेली १२ वर्षांपासून भूतबंगला झाली आहे. ही हवेली मोठ्या दुर्घटनेस कारणीभूत न ठरो अशी भीती लोकांना आहे. दिलीपकुमार यांच्या घराच्या मालकाने सरकारकडे २०० कोटींची मागणी केली आहे. या घरांची किंमत निश्चित करण्याचे काम आम्ही करत आहोत असे शहराचे उपायुक्त सांगतात. या ऐतिहासिक घरांना संरक्षित करण्यासाठी ४०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. घर खरेदीचे काम लवकरच पूर्ण होईल.
सोहळ्यांसाठी कपूर हवेली ६ महिने वेटिंगवर असायची
लग्नाच्या पार्टीसाठी या हवेलीला लोकांची पहिली पसंती असायची. नियाज शहा म्हणाले, हवेलीत बुकिंग मिळाले नाही तर मुलीचे लग्न ६ महिने लांबणीवर टाकले जात. २००५ च्या भूकंपात हवेलीचे नुकसान झाले आणि हे सर्व कार्यक्रम बंद झाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.