आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला दिला जाणारा निधी थांबवत असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांनी आरोप केला, की आरोग्य संघटना डब्लूएचओने कोविड-19 ला गांभीर्याने घेतले नाही. चीनमध्ये या व्हायरसचा फैलाव होत असतानाही माहिती लपविली. जागतिक आरोग्य संघटनेने प्राथमिक स्तरावरच काम केले असते तर कोरोना व्हायरसचा जगभरात फैलाव होऊन इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले नसते. असेही ट्रम्प म्हणाले आहेत. ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेतूनच घोषणा करताना प्रशासनाला डब्लूएचओचा निधी थांबवण्याचे आदेश दिले.
अमेरिकेकडून दरवर्षी दिले जातात 50 कोटी डॉलर, यापूर्वीच दिला होता बंद करण्याचा इशारा
संयुक्त राष्ट्राची जागतिक आरोग्य संघटना डब्लूएचओला अमेरिकेतून सर्वात जास्त निधी दिला जातो. यानंतर निधीसंदर्भात काय केले जाईल याचा विचार अमेरिका करणार आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अमेरिकेकडून डब्लूएचओला दरवर्षी 40-50 कोटी अमेरिकन डॉलर (जवळपास 3 हजार कोटी रुपये) एवढा निधी दिला जातो. तर चीनकडून या संघटनेला 4 कोटी अमेरिकन डॉलर अर्थात जवळपास 300 कोटी रुपयांचा निधी दिला जातो. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये कोरोना व्हायरसचा उल्लेख चायना व्हायरस केला. तसेच डब्लूएचओने यावर व्यवस्थित काम केले नसल्याचे आरोप करताना निधी थांबवण्याची धमकी दिली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना, या मुद्द्यावर राजकारण केल्याने केवळ मृत्यूचा आकडा वाढेल असे डब्लूएचओचे महासंचालक टेड्रोस गेब्रेसस यांनी म्हटले होते.
ट्रम्प यांनी नेमके कोणते आरोप केले?
ट्रम्प म्हणाले, कोरोना संदर्भात डब्लूएचओ आपली जबाबदारी निभावण्यात अपयशी ठरले. चीनमध्ये हा व्हायरस पसरत असतानाही यूएनच्या या संस्थेने माहिती लपविण्याचा प्रयत्न केला. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेलाच जबाबदार धरायला हवे. यापूर्वी ट्रम्प यांनी संघटनेवर चीनची बाजू घेण्याचा आरोप केला होता. ट्रम्प यांनी सांगितल्याप्रमाणे, "चीनच्या वुहानमध्ये जेव्हा कोरोना व्हायरसची प्रकरणे समोर आली. तेव्हा डब्लूएचओ त्याचे आकलन करू शकले नाही. ही महामारी चीनच्या वुहानपर्यंतच नियंत्रित ठेवली जाऊ शकली असती. असे केल्यास खूप कमी लोकांचा जीव गेला असता. सोबतच जागतिक अर्थव्यवस्थेला एवढा मोठा फटका देखील बसला नसता."
संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी केला निषेध
संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरस यांनी ट्रम्प यांचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटना किंवा इतर मानवीय मदत करणाऱ्या संघटनांची फंडिंग कमी करण्याची ही वेळच योग्य नाही. उलट कोरोना विरोधात लढत असताना डब्लूएचओला मदत करण्याची गरज आहे असे गुटेरस यांनी म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.