आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कुटुंबाचे भले किंवा कंपनी यातून एकाची निवड करण्यास बाध्य करू नका... अॅपलने कार्यालयात बोलावले अन् कर्मचाऱ्यांचा चढला पारा

न्यूयॉर्क13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत बोलावण्यासाठी जगभरातील कंपन्यांना झुंजावे लागतेय

लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरू असल्याने अनेक देशांत स्थिती सुरळीत होत आहे. त्यामुळे कंपन्या हळूहळू कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावत आहेत, पण कर्मचारी त्यासाठी सध्या तयार नाहीत. कर्मचाऱ्यांच्या अशाच विरोधाचे संकट जगातील सर्वात मोठी कंपनी अॅपलसमोर आहे. ‘द व्हर्ज’ च्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी कर्मचाऱ्यांना मेल पाठवून त्यांना सप्टेंबरपासून आठवड्यात तीन दिवस (सोमवार, मंगळवार आणि गुरुवार) कार्यालयात काम करण्यास सांगितले आहे. कर्मचारी आठवड्यात दोन दिवस आणि वर्षात दोन आठवडे बाहेरून काम करू शकतात, पण त्यासाठी मॅनेजरची परवानगी घ्यावी लागेल.

या पत्राच्या उत्तरात २८०० कर्मचाऱ्यांच्या ‘रिमोट वर्क अॅडव्होकेट्स’ या समूहाने कुक यांना पत्र लिहिले आहे. ८० कर्मचाऱ्यांनी हे पत्र तयार केले आहे. त्यांनी लिहिले,‘सध्याचे धोरण आमच्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाही, असे आम्हाला वाटते. या नव्या धोरणाने आमच्या अनेक सहकाऱ्यांना नोकरी सोडण्यासाठी बाध्य केले आहे. आम्ही कार्यालयात न येता आमच्या गुणवत्तापूर्ण सेवा देण्यास तयार आहोत. गेले वर्ष आमच्या कंपनीसाठी एक अभूतपूर्व आव्हान घेऊन आले होते. त्यामुळे आम्ही बाहेर राहून अॅपलसारख्या उत्पादनासाठी उच्च गुणवत्तापूर्ण सेवा देणे शिकलो आणि ते करून दाखवलेही.

लवचिक कार्यसंस्कृतीच्या मुद्द्यावर एक्झिक्युटिव्ह टीम व दूरच्या भागांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विचारांत ताळमेळ नाही, असे वाटत आहे. लवचिक धोरण नसल्याने आमच्यापैकी बहुतेकांना असे वाटत आहे की, आम्हाला आमच्या कुटुंबांत ताळमेळ ठेवणे, आमचे भले पाहणे आणि आपले सर्वश्रेष्ठ काम करणे किंवा अॅपलचा भाग होऊन राहणे यापैकी एकाची निवड करावी लागेल. अॅपलचे जगभरात १.४७ लाखांपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. कंपनीच्या कॅलिफोर्निया येथील मुख्यालयातच १२ हजार कर्मचारी काम करतात. मुख्यालयात एका कर्मचाऱ्याचे सरासरी वेतन जवळपास ९१ लाख रुपये आहे.

विरोधानंतर गुगलने २०% कर्मचाऱ्यांना पर्मनंट वर्क फ्रॉम होम दिले आहे
कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावल्याने गुगललाही असाच विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर कंपनीचे २०% कर्मचारी कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम करतील, अशी घोषणा मेमध्ये गुगलने केली होती. दुसरीकडे, वर्क फ्रॉम होम हे भविष्य असल्याची टिप्पणी फेसबुकच्या मार्क झुकेरबर्ग यांनी केली आहे. कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम घेऊ शकता, त्यासाठी त्यांना आपल्या मॅनेजरची परवानगी घ्यावी लागेल, असे त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. ट्विटरनेही अशीच घोषणा केली आहे.

बातम्या आणखी आहेत...