आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:इस्रायलमध्ये 8 पक्षांचे सरकार सत्तेवर येणार, पंतप्रधानपदाच्या 2 टर्म ठरल्या

जेरुसलेम18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मध्यपूर्वेच्या बलाढ्य देशात उलथापालथ, नेतन्याहूंच्या निरोपाचा मार्ग मोकळा

इस्रायलमध्ये आठ विरोधी पक्षांची मोट बांधण्यात आली असून या आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. विरोधी नेते येर लेपिड यांनी याबद्दलची घोषणा केली आहे. त्यामुळे आता पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निरोपाचा मार्ग मोकळा झाला आहे. नेतन्याहू १२ वर्षांपासून पंतप्रधानपदावर आहेत. विरोधी आघाडीत सत्तेबाबत करार झाला आहे. त्यानुसार दोन टर्ममध्ये वेगवेगळ्या व्यक्ती पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळतील. आधी कट्टरवादी यामिना पक्षाचे नेते नेफ्टाली बेनेट (४९) पंतप्रधान होतील. त्यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२३ पर्यंत राहील. त्यानंतर येश एटिड पक्षाचे नेते येर लॅपिड (५७) पंतप्रधान होतील. त्यांचा कार्यकाळ २०२५ पर्यंत राहील. लॅपिड यानिमित्त म्हणाले, नवीन सरकार इस्रायलच्या समाजाला एकजूट करण्याच्या प्रयत्नात आहे. या आघाडीत अरब इस्लामी पार्टी ‘राम’ देखील आहे. या पक्षाचे नेते मन्सूर अब्बास म्हणाले, हा निर्णय घेणे कठीण काम होते. यादरम्यान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सत्तेचे हस्तांतरण सहजपणे होणार नाही, असे संकेत दिले आहेत.

नवीन सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार, अन्यथा पुन्हा निवडणूक
राष्ट्रपती रुवेन रिवलिन यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे असे आदेश दिले आहेत. त्यात नवीन सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल. इस्रायल १२० सदस्यीय आहे. बहुमतासाठी ६१ जागा आवश्यक आहेत. आघाडीला बहुमत सिद्ध करता आले नाही तर पुन्हा निवडणूक होईल. नव्या आघाडीत कट्टरवादी, डावे व मध्यममार्गी पक्षांचा समावेश आहे. परंतु नेतन्याहूंच्या सत्तेचा शेवट करण्यासाठी त्यांची एकजूट झाली आहे. इस्रायलमध्ये दोन वर्षांत चार वेळा निवडणूक झाली आहे. देशात स्थिर सरकार स्थापन होऊ शकलेले नाही.

भारत-इस्रायल एकसमान असल्याचे भावी पंतप्रधान बेनेट यांचे मत
इस्रायलचे भावी पंतप्रधान नेफ्टाली बेनेट यांनी ऑक्टोबर २०१३ मध्ये भारताचा दौरा केला होता. तेव्हा ते अर्थमंत्री होते. त्यांनी या दौऱ्यात आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. आपल्या भाषणात त्यांनी भारतीय व इस्रायली मूल्यांवर भर दिला होता. इस्रायलचे लोक भारतीयांसारखेच आहेत. इस्रायल व भारतीय दोन्ही लोक शिक्षण व कौटुंबिक मूल्यांचा सन्मान करतात. दोन्ही देशांना ‘जुगाड’ चा चांगला वापर ठाऊक आहे.

- दिल्लीत बेनेट यांनी भारतीय उद्योग संघाच्या कार्यक्रमाला संबोधित केले होते. द्विपक्षीय व्यापार दुप्पट करता येईल, असे त्यांनी म्हटले होते. - बेनेट पॅलेस्टाइन राज्याचा विरोध करतात. इस्रायल वेस्ट बँकच्या मालकीचा बहुतांश भाग ताब्यात घेण्यात यावा, असे त्यांना वाटते. ते नेतन्याहू यांचे माजी सहकारी आहेत. ते नेतन्याहू यांच्यापेक्षा जास्त कट्टरवादी आहेत. बेनेट यांच्या नंतर पंतप्रधान होणारे लॅपिड नऊ वर्षांपूर्वी पत्रकारितेतून राजकारणात आले होते.

बातम्या आणखी आहेत...