आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेत आणीबाणी:राष्ट्रपती राजपक्षेंनी 4 नव्या मंत्र्यांना दिली शपथ, अली साबरी देशाचे नवे अर्थमंत्री, बंधू बासिल यांची केली हकालपट्टी

कोलंबो4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंकेतील वाढत्या आर्थिकि संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी सोमवारी 4 नव्या मंत्र्यांना शपथ दिली. यात त्यांनी अली साबरी यांची देशाच्या अर्थमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. तर जी.एल. पेइरिस यांची परराष्ट्र, दिनेश गुणवर्धने यांची शिक्षण, तर जॉन्स्टन फर्नांडो यांच्याकडे महामार्ग मंत्रीपद सोपवले आहे.

तत्पूर्वी, राष्ट्रपतींनी आपले धाकटे बंधू बासिल राजपक्षे यांची अर्थमंत्रीपदावरुन हकालपट्टी केली होती. सोबतच विरोधकांनाही संयुक्त आघाडी सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. 'संसदेतील सर्वच राजकीय पक्षांनी मंत्रीपद स्विकारुन विद्यमान राष्ट्रीय संकटावर तोडगा काढण्यासाठी मदत करावी', असे ते म्हणाले होते.

संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा

देशात आणीबाणी लागू असतानाच लंकेच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने रविवारी रात्री उशिरा आपला राजीनामा दिला. देशाचे शिक्षण मंत्री आणि सभागृह नेते दिनेश गुणवर्धने यांनी याबाबतची माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे वगळता सर्व 26 मंत्र्यांनी आपले राजीनामे श्रीलंकेच्या पंतप्रधानांना दिले आहेत. मात्र, त्यांनी मंत्रिमंडळाच्या या सामूहिक राजीनाम्याचे कोणतेही कारण दिलेले नाही.

श्रीलंकेच्या केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरचाही राजीनामा

श्रीलंकेच्या केंद्रीय बँकेचे गव्हर्नर अजित निवार्ड काबराल यांनी सोमवारी राजीनामा दिला. हा राजीनामा सर्व कॅबिनेट मंत्र्यांच्या राजीनाम्याशी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले. काबराल यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.

पंतप्रधानांच्या मुलाने सर्वप्रथम दिला राजीनामा

मंत्रिमंडळाचा राजीनामा देण्यापूर्वी देशाचे क्रीडा मंत्री आणि पंतप्रधान राजपक्षे यांचे सुपुत्र नमल राजपक्षे यांनी आपल्या सर्व खात्यांचा राजीनामा दिला होता. सुमारे तासाभरानंतर इतर मंत्र्यांनी राजीनामे दिले. मंत्रिमंडळाच्या राजीनाम्याचे पत्र सध्या पंतप्रधानांकडे आहे, जे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्याकडे सुपूर्द केले जाईल. येत्या काही दिवसांत नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

650 हून अधिक लोकांना अटक

राजधानी कोलंबोमध्ये रविवारी सरकारच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या 650 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली. आर्थिक संकटाच्या निषेधार्थ कर्फ्यू मोडून हे लोक सरकारविरोधात मोर्चा काढत होते.

सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आउट ऑफ सर्विस

श्रीलंकेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही बंदी घालण्यात आली आहे. यानंतर रविवारी देशभरात फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सेवा बंद झाली. इंटरनेट मॉनिटरिंग संस्था नेटब्लॉक्सने ही माहिती दिली. दुसरीकडे, राजधानी कोलंबोतील प्रत्येक कोपऱ्यात लष्कर आणि पोलिसांचे जवान पहारा देत आहेत, जेणेकरून वातावरण बिघडू नये.

भारताकडून श्रीलंकेला मदतीचा हात

भारत श्रीलंकेला 40 हजार टन तांदळाची खेप पाठवण्याच्या तयारीत आहे. त्याचवेळी, 2022 मध्ये भारत श्रीलंकेला किमान 3,00,000 टन तांदूळ पाठवणार आहे.
भारत श्रीलंकेला 40 हजार टन तांदळाची खेप पाठवण्याच्या तयारीत आहे. त्याचवेळी, 2022 मध्ये भारत श्रीलंकेला किमान 3,00,000 टन तांदूळ पाठवणार आहे.

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेला भारत मदत करत आहे. इंधन संकटाशी लढा देत श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारताने एक तेल टँकर पाठवला होता, जो शनिवारी श्रीलंकेत पोहोचला. आता भारत श्रीलंकेला 40 हजार टन तांदळाची खेप पाठवण्याच्या तयारीत आहे. 2022 मध्ये भारत श्रीलंकेला किमान 3,00,000 टन तांदूळ पाठवणार आहे. यामुळे श्रीलंकेतील पुरवठा वाढेल, ज्यामुळे देशातील किमती कमी होऊ शकतील.

राष्ट्रपतींनी केली होती आणीबाणी जाहीर

श्रीलंकेतील आर्थिक समस्या वाढत असताना राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी आणीबाणीची घोषणा केली. सरकारने शनिवारी संध्याकाळी 6 ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत 36 तासांचा कर्फ्यू लागू केला.

देशाच्या सुरक्षेसाठी आणि अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले होते. यानंतर देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली. शनिवारी राजधानी कोलंबोमध्ये लष्कराच्या तैनातीदरम्यान दुकाने उघडण्यात आली, जेणेकरून लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येतील.

बातम्या आणखी आहेत...