आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद वार्ता:युरोप एका वर्षानंतर पर्यटकांच्या स्वागतास तयार, 20 देश होत अाहेत अनलॉक

पॅरिस/ब्रुसेल्स6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संसर्ग कमी होणे व लसीकरणामुळे अमेरिकेसह जगासाठी खुला होतोय युरोप

कोरोनाने पर्यटकांमुळे बंद असलेला युराेप आता हळूहळू उघडत आहे. सुमारे एक वर्षानंतर युरोपात अमेरिका व इतर देशांच्या पर्यटकांसाठी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, पर्यटकांना काही नियमांची काळजी घ्यावी लागेल. युरोप गेल्या वर्षी कोरोनाचा हॉटस्पॉट होता. लसीकरणाने वेग घेतल्याबरोबर महामारी पसरण्याचा वेग कमी होत आहे. अनेक देशांनी हिंडण्या-फिरण्यावरील प्रतिबंध हटवले आहेत किंवा हटवत आहेत. इंग्लंड तर बहुतांश लोकांच्या लसीकरणानंतर पूर्णपणे अनलॉकच्या स्थितीत आला आहे. २१ जूनपासून ब्रिटनला पूर्णपणे अनलॉक करण्याची सरकारची योजना आहे. युरोपातील ३० पैकी २० देश अनलॉक होत आहेत. कोरोनाचा सर्वाधिक मारा झेलणाऱ्या इटली, स्पेन आणि फ्रान्समध्ये हॉटेल, रेस्टराँ, पर्यटनस्थळ आणि आंतरराष्ट्रीय प्रवास काही नियमांसह खुले केले जात आहेत. एका आठवड्यात बहुतांशी देशात मुख्य व्यवहार सुरू होण्याची अपेक्षा आहे. मार्च २०२० मध्ये पहिल्यांदा युरोपीय संघाचे दरवाजे कोरोनामुळे बंद करण्यात आले होते.

ग्रीस : लसीकरण प्रमाणपत्र, निगेटिव्ह अहवाल गरजेचा
पर्यटनावर अवलंबून ग्रीसने एप्रिलमध्ये अमेरिकी प्रवाशांसाठी सीमा खुल्या करणे सुरू केले होते. आता चीन, ब्रिटन व २० इतर देशांतील लोकांना परवानगी दिली आहे. सर्वांना लसीकरण प्रमाणपत्र किंवा आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल देण्याचा नियम आहे. मात्र हे निर्देश १४ जूनला समाप्त होत आहेत, ते वाढवले जाऊ शकतात.

ईयू : डिजिटल ट्रॅव्हल प्रमाणपत्रावर काम सुरू, काही देशांत होतोय वापर
युरोपीय संघाचे कोणतेही कोविड पर्यटन नाही. मात्र ज्यांचे लसीकरण झाले आहे त्या लोकांसाठी एक संयुक्त डिजिटल प्रवास प्रमाणपत्रावर काम सुरू आहे. स्पेन, जर्मनी, ग्रीस, बुल्गारिया, क्रोएशिया, चेक गणराज्य, डेन्मार्क, पोलंडने संयुक्त डिजिटल प्रवास प्रमाणपत्र प्रणालीचा वापर सुरू केला आहे.

इटली : कोरोना चाचणी व १० दिवस क्वॉरंटाइन आवश्यक
अमेरिकींसाठी इटली मे मध्यातच उघडला आहे. मात्र येथे आल्यावर १० दिवसांसाठी क्वॉरंटाइन राहण्याचा नियम आहे. येथे येण्याआधी त्यांची कोरोना चाचणी आवश्यक आहे. इटलीने गेल्या महिन्यात ब्रिटन व इस्रायलच्या पर्यटकांनाही परवानगी देणे सुरू केले. त्यांना ४८ तासांच्या आतील कोरोना निगेटिव्ह अहवाल सादर करण्याची अट आहे.

ब्रिटन : १० दिवस विलगीकरण आवश्यक, उड्डाणांवर चर्चा
सध्या ब्रिटनमध्ये मोजके अमेरिकी पर्यटक आहेत. येणाऱ्यांना १० दिवसांचे विलगीकरण आवश्यक आहे. अमेरिकेशी उड्डाणसेवा सुरू करण्यासाठी चर्चा सुरू आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी जी-७ बैठकीत चर्चा करू शकतात. मात्र कोरोनाच्या डेल्टा स्वरूपामुळे काळजी घेतली जात आहे.

फ्रान्स : मंजूर केलेली लस घेतलेल्यांना येण्याची परवानगी
फ्रान्सने भारत, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलसह १६ देशांच्या पर्यटकांवर बंदी घातली आहे, तर लस घेतलेल्यांना परवानगी दिली आहे. मात्र, युरोपीय संघाने (ईयू) मंजुरी दिलेली लस असावी. फ्रान्सच्या सीमा बुधवारी पुन्हा उघडल्या आहेत. युरोपाबाहेर आणि इतर देशांतील लोकांना आरटीपीसीआरच्या निगेटिव्ह अहवालासह येण्याची परवानगी आहे.

स्पेन : लस घेतलेल्या लोकांना प्रवेश, भारतीयांना मात्र बंदी
सोमवारी अमेरिका व बहुतांश देशातील लस घेतलेल्या लोकांना येण्याची परवानगी दिली. डब्ल्यूएचओकडून मंजूर व चीनच्या दोन लसी घेतलेल्यांनाही येण्याची परवानगी दिली. भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्यांवर अजूनही बंदी लागू आहे. कमी जोखमेच्या देशातील पर्यटकांनाही येण्याची सूट दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...