आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखक सलमान रश्दींवर प्राणघातक हल्ला:न्यूयॉर्कमध्ये भर कार्यक्रमात चाकूने वार, हवाई रुग्णवाहिकेतून रश्दींना रुग्णालयात नेले

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
कार्यक्रमात सलमान रश्दी मुलाखत देत असतानाच स्टेजवर चढून हल्लेखोराने त्यांच्यावर चाकूने वार केले. - Divya Marathi
कार्यक्रमात सलमान रश्दी मुलाखत देत असतानाच स्टेजवर चढून हल्लेखोराने त्यांच्यावर चाकूने वार केले.

भारतीय वंशाचे ब्रिटिश-अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमामध्ये मुलाखत देत असतानाच रश्दींवर हल्ला करण्यात आला.

हल्लेखोराने स्टेजवर चढत रश्दी यांच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यात रश्दी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हवाई रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर, रश्दी यांची मुलाखत घेणाऱ्यावरही हल्लेखोराने वार केले. त्यात तेदेखील जखमी झाल्याची माहिती आहे.

हल्ल्यामुळे रश्दींच्या शरिरातून रक्तस्त्राव होत असल्याची माहिती आहे.
हल्ल्यामुळे रश्दींच्या शरिरातून रक्तस्त्राव होत असल्याची माहिती आहे.

हल्लेखोराला अटक

हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे वय 25 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने हल्ला का केला किंवा कोणाच्या आदेशावर हा हल्ला केला, याबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

रश्दींचा जन्म मुंबईत

रश्दी यांचा जन्म मुंबईत झाला. द सॅटॅनिक व्हर्सेस आणि मिडनाईट चिल्ड्रन यांसारखी पुस्तके लिहून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रश्दी यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे. आपल्या कांदबऱ्या तसेच त्यामुळे निर्माण होणाऱ्या वादामुळे रश्दी नेहमी चर्चेत असतात. दरम्यान, आज त्यांच्यावर हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला. हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

हल्ल्यानंतर रश्दी यांना रुग्णालयात नेताना वैद्यकीय पथक.
हल्ल्यानंतर रश्दी यांना रुग्णालयात नेताना वैद्यकीय पथक.

रश्दींची साहित्य संपदा

रश्दींना 'मिडनाइट्स चिल्ड्रन' या त्यांच्या दुसऱ्या कादंबरीसाठी 1981 मध्ये 'बुकर प्राइज' आणि 1983 मध्ये 'बेस्ट ऑफ द बुकर्स' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रश्दी यांनी 1975 मध्ये ग्राइमस या आपल्या पहिल्या कादंबरीद्वारे लेखक म्हणून पदार्पण केले. 'मिडनाइट्स चिल्ड्रन' या त्यांच्या दुसऱ्या कादंबरीतून रश्दींना ओळख मिळाली. त्यांनी द जग्वार स्माईल, द मूर्स लास्ट साई, द ग्राउंड बीनथ हर फीट आणि शालीमार द क्लाउन यासह अनेक पुस्तके लिहिली, परंतु रश्दी हे त्यांच्या वादग्रस्त पुस्तक द सॅटॅनिक व्हर्सेससाठी सर्वाधिक चर्चेत होते.

भारतासह अनेक देशांत 'द सॅटॅनिक व्हर्सेस'वर बंदी

'द सॅटॅनिक व्हर्सेस' ही सलमान रश्दी यांची चौथी कादंबरी आहे. या कादंबरीवर भारतासह अनेक देशांमध्ये बंदी आहे. ही कादंबरी 1988 मध्ये प्रकाशित झाली होती, ज्यावर बराच वाद झाला. कांदबरीमध्ये रश्दी यांनी प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. या पुस्तकाचे शीर्षक एका विवादित मुस्लिम परंपरेबद्दल आहे. रश्दींनी त्यांच्या पुस्तकात या परंपरेबद्दल खुलेपणाने लिहिले आहे.

अनेक मुस्लिम देशांमध्ये या पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती. त्याच्या प्रकाशनानंतरच रश्दींना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आणि इराणचे धार्मिक नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी त्यांच्यासाठी फतवा काढला. कादंबरीचा जपानी अनुवादक हितोशी इगाराशी यांची हत्या करण्यात आली, तर इटालियन अनुवादक आणि नॉर्वेच्या प्रकाशकावरही हल्ला करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...