आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:शिक्षिकेने हिसकावून घेतला मोबाइल, 14 वर्षीय विद्यार्थिनीने थेट पेटवून दिली शाळा; 20 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकाने मोबाइल हिसकावून घेतल्यामुळे एका 14 वर्षीय शाळकरी मुलीने अख्खी शाळाच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तब्बल 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या घटनेपूर्वी सदर विद्यार्थिने आपण जाळपोळ करण्याचा इशारा दिला होता, असेही सांगण्यात येत आहे. दक्षिण अमेरिकेतील गयानात ही थक्क करणारी घटना घडली आहे.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री महदिया माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहाला आग लागली. काही वेळातच आगीने शाळेचा मोठा भाग व्यापला. त्यात अनेक विद्यार्थिनी व कर्मचारी अडकले. तत्काळ अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पण आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला.

राजधानी जॉर्ज टाऊनपासून 200 मैलांवर असणाऱ्या सेंट्रल गयाना मायनिंग टाऊनमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी झालेल्या तपासात आग लावणारी व्यक्ती दुसरी - तिसरी कोणी नसून शाळेतीलच विद्यार्थिनी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या विद्यार्थिनीचा मोबाइल तिच्या शिक्षिकेने जप्त केला होता. यामुळे ती संतप्त झाली होती. रागाच्या भरात तिने हे भीषण पाऊल उचलले. या आगीत आरोपी मुलगी स्वतःही होरपळली होती.

पोलिसांचा धक्कादायक खुलासा

पोलिसांच्या माहितीनुसार, शालेय प्रशासनाने मोबाइल हिसकावून घेतल्यामुळे आरोपी विद्यार्थिनीने शाळा पेटवून दिली. वास्तविक, आरोपी विद्यार्थिनी एका वृद्ध व्यक्तीच्या संपर्कात असल्याची माहिती शालेय प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर तिचा मोबाइल जप्त करण्याची ही कारवाई करण्यात आली. गयानाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार गेराल्ड गौविया यांनी सांगितले की, आरोपी मुलगी अवघ्या 14 वर्षांची आहे. फोन हिसकावून घेतल्यानंतर तिने मुलींचे वसतिगृह पेटवून देण्याची धमकी दिली होती.

आरोपी तरुणी होरपळली

या घटनेत आरोपी मुलगी होरपळली असून, तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिला ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल. या प्रकरणी रुग्णालयात दाखल इतर 9 पैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

या हृदयद्रावक घटनेविषयी अमेरिकेसारख्या इतर देशांनी गयानाला मदत देऊ केली आहे. या देशांनी डीएनए ओळखण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञ पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. कारण, आगीत होरपळल्यामुळे अनेक मृतदेहांची ओळख पटवणे अवघड झाले आहे.

मृतांमध्ये बहुतांश 12 ते 18 वयोगटातील मुलींचा समावेश आहे. शाळेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा 5 वर्षीय मुलगाही या घटनेचा बळी ठरला. अग्निशमन दलाने भिंतीला भगदाड पाडून काही जणांना वाचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.