आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Hamid Karzai Will Play A Major Role In The Taliban Government, Under The Auspices Of The UAE; News And Live Updates

अफगाणिस्तानात दहशतीचे राज्य:तालिबान सरकारमध्ये हमीद करझाई मोठी भूमिका बजावणार, गनी यूएईच्या आश्रयाला

काबूल/नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूएईची स्पष्टोक्ती : गनी व त्यांचे कुटंुब माणुसकीच्या आधारे आमच्या देशात

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने जागतिक मान्यतेसाठी राजकीय प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच सरकार स्थापण्याची घोषणा होऊ शकते. बुधवारी तालिबानी नेते माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई व अब्दुल्ला अब्दुल्लांना भेटले. दोह्यात झालेल्या बैठकीचे नेतृत्व हक्कानी नेटवर्कचा नेता अनस हक्कानीने केले. करझाई २००२ ते २०१४ पर्यंत राष्ट्राध्यक्ष, तर अब्दुल्ला सीईओ होते. दरम्यान, देश सोडून पळून गेलेले राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनींनी यूएईत आश्रय घेतला आहे.

बुधवारी रात्री व्हिडिओ जारी करून गनी म्हणाले, मी पळालेलो नाही. ज्यांना माझ्याबद्दल माहिती नाही, त्यांनी निकाल सुनावू नये. तत्पूर्वी, गनी आणि त्यांच्या कुटुंबाला माणुसकीच्या दृष्टिकोनातून आश्रय दिल्याचे स्पष्टीकरण यूएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिले. दरम्यान, तालिबानला एकतर्फी मान्यता देऊ नका, असे ब्रिटिश पीएम बोरिस जॉन्सन यांनी पाकिस्तानला बजावले.

पंजशीरमध्ये तालिबानविरुद्ध सशस्त्र बंडासाठी आघाडी
अफगाणिस्तानात आता तालिबानला कडवे आव्हान दिले जात आहे. काबूलपासून ३ तासांच्या अंतरावर असलेला पंजशीर प्रांत अजून स्वतंत्र आहे. १.७३ लाख लोकसंख्येच्या या राज्यात ७ जिल्हे, ५४२ गावे आहेत. येथे तालिबानींचा कडवा शत्रू दिवंगत नेता अहमद शहा मसूद याचा मुलगा अहमद मसूद याचा प्रभाव आहे. पंजशीरचा शेर म्हणून त्याची ओळख आहे. एका व्हिडिओ संदेशात त्याने दावा केला आहे की, पंजशीरमध्ये तो समर्थकांसह सज्ज आहे.

गनी सरकारमध्ये उपरराष्ट्रपती राहिलेले अमरुल्ला सालेह यांनीही पंजशीरमधूनच तालिबानला आव्हान देत स्वत:ला राष्ट्रपती घोषित केले होते, असे मानले जाते. अफगाण सैनिक मोठ्या संख्येने पंजशीरमध्ये दाखल झाले आहेत. सालेह यांना नेमका किती पाठिंबा मिळेल हे इतक्यात स्पष्ट होत नसले तरी काबूलस्थित पत्रकार अनुसूर रहमान सांगतात, की तालिबानविरुद्ध बंड सुरू झाले आहे. आता देशाला अत्यंत वाईट दिवस पाहावे लागतील. पंजशीरमध्ये ताझिक सैनिकांचीही सशस्त्र फौज आहे.

चर्चेतून मार्ग निघाला नाही तर तालिबानविरुद्ध तंुबळ युद्ध पेटू शकते. दरम्यान, हा संघर्ष टाळण्यासाठी तालिबान सालेह आणि अहमद मसूद यांच्याशी चर्चा करून त्यांना सरकारमध्ये सहभागी करून घेण्यावर विचार करत आहे. न्यूयॉर्क टाइम्सचे काबूलस्थित अभ्यासक शरीफ हसन यांच्यानुसार दिवंगत शहा यांनी सोव्हियत संघ आणि तालिबान या दोघांचाही पराभव केला होता. या प्रांताने आजवर कधीच हार मानलेली नाही. मात्र, आता पंजशीरच्या लोकांनी आत्मसमर्पणापेक्षा लढण्याची तयारी केली तर त्यांचा पराभव होऊ शकतो. कारण, १९९०च्या दशकाच्या तुलनेत आता तालिबान अधिक सशक्त झाले आहेत. मसूद यांनी आत्मसमर्पण केले तर त्यांची प्रतिष्ठा ते घालवू शकतात. चर्चेतून मार्ग निघाला नाहीच तर अफगाणमधील बहुसंख्य पश्तून वगळता उर्वरित ताझिक, हजारा आणि उझबेक लोक तालिबानविरुद्ध संयुक्त आघाडी उघडू शकतात.

तालिबानशी लढणाऱ्या गव्हर्नरला अटक
तालिबानविरुद्ध आवाज बुलंद करणाऱ्या अफगाणिस्तानच्या तीन महिला गव्हर्नरपैकी एक सलिमा माजारी यांना बुधवारी अटक करण्यात आली. तालिबानला बल्ख प्रांतावर कब्जा करण्यास सर्वात जास्त प्रयत्न करावे लागले होते. सलिमा यांनी स्वत:ची फौजही तयार केली होती.

हवाई खजिन्याचे काय होईल?
या साठ्यात स्काय सेंटिनल ड्रोनही आहे. तालिबानकडे ते उडवण्यासाठी लोक नाहीत. अफगाणी लष्कराच्या वैमानिकांकडून जबरदस्तीने काम करून घेतले तरीही त्यांचे सुटे भाग कंपन्यांकडून मिळणे कठीण आहे. त्यामुळे देखभाल आणि मदतीच्या नावाखाली पाकिस्तान ते घेऊ शकते. रशिया अफगाणिस्तानमधून बाहेर पडला तेव्हाही शस्त्रास्त्रांची अशीच वाटणी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...