आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ब्रिटनच्या डॉक्टरांनी प्रथमच एका विशेष यंत्राचा वापर करून धडधड बंद झालेल्या हृदयाचे यशस्वी प्रत्यारोपण केले आहे. म्हणजे ते हृदय मृत जाहीर झालेल्या व्यक्तीचे होते. आतापर्यंत ६ मुलांमध्ये अशा हृदयांचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. त्यामुळे या मुलांना जीवदान मिळाले आहे. याआधी फक्त अशा व्यक्तींचेच हृदय प्रत्यारोपण होत होते, ज्यांना ब्रेन डेड घोषित केले जात होते.
ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या (एनएचएस) डॉक्टरांनी हृदय प्रत्यारोपणात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. केंब्रिजशायरच्या रॉयल पेपवर्थ रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ऑर्गन केअर मशीनद्वारे मृत व्यक्तींचे हृदय पुन्हा सुरू करून एक-दोन नव्हे, तर तब्बल ६ मुलांना जीवदान दिले आहे. असे यश मिळवणारा हा डॉक्टरांचा जगातील पहिला चमू ठरला आहे. एनएचएसच्या अवयव दान आणि प्रत्यारोपण विभागाचे संचालक डॉ. जॉन फोर्सिथ यांनी सांगितले,‘आमचे हे तंत्रज्ञान फक्त ब्रिटनसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी मैलाचा दगड ठरेल. या तंत्रज्ञानामुळे १२ ते १६ वर्षे वयाच्या ६ मुलांना नवे जीवन मिळाले आहे. ही मुले गेल्या दोन-तीन वर्षांपासून अवयवदानाच्या रूपात हृदय मिळण्याची प्रतीक्षा करत होती. म्हणजे लोक आता मृत्यूनंतरही जास्त प्रमाणात हृदयदान करू शकतील. आता लोकांना हृदय प्रत्यारोपणासाठी प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.’
मी जास्त शक्तिशाली झाले, पहाड चढू शकते : फ्रेया
या तंत्रज्ञानांतर्गत ज्या दोन जणांना सर्वात आधी हृदय प्रत्यारोपण करण्यात आले त्यात ब्रिस्टलची फ्रेया हमिंग्टन (१४) आणि वॉर्सेस्टरची अॅना हॅडली (१६) यांचा समावेश आहे. अॅना म्हणाली, ‘मी आता पूर्वीप्रमाणे हॉकी खेळू शकते.’ फ्रेया म्हणाली,‘मी तर आता जास्त शक्तिशाली झाली आहे. पहाडही चढू शकते.’
आॅर्गन केअर सिस्टिम : यंत्रामध्ये दात्याचे हृदय २४ तास ठेवून पुन्हा सुरू केले जाते
एनएचएसच्या डॉक्टरांनी ‘ऑर्गन केअर सिस्टिम’ यंत्र तयार केले आहे. मृत्यू झाल्याला दुजोरा मिळताच दात्याचे हृदय त्वरित काढून या यंत्रात ठेवून १२ तास ते तपासतात आणि त्यानंतरच प्रत्यारोपण केले जाते. दात्याकडून मिळालेले हृदय ज्या रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित करायचे आहे, त्याच्या शरीराच्या गरजेनुसार ऑक्सिजन, पोषक तत्त्वे आणि त्याच्या गटाचे रक्त या यंत्रात ठेवलेल्या हृदयात २४ तास प्रवाहित केले जाते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.