आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानी समाज सामान्यतः जुन्या रुढींनुसार चालतो असे म्हटले जाते. याठिकाणी स्त्रियांना साक्षर करून मुख्य प्रवाहात आणणे अवघड आहे. मात्र सिंध प्रांतातील मनीषा रुपेता यांनी पोलीस अधिकारी (डीएसपी) बनून एक नवा इतिहास या समाजात रचला आहे. विशेष म्हणजे मनीषा या पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समुदायातून समोर आल्या आहेत.
सिंधमध्येच दरवर्षी हजारो हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जाते. अशा परिस्थितीत हिंदू मुलीचे डीएसपी होणे ही मोठी गोष्ट मानली जाते. जगभरातील प्रसारमाध्यमांनी या बातमीला वि्शेष असे महत्त्व दिले आहे.
मनीषा रुपेतांना बदलायची आहे पाकिस्तानबद्दलची धारणा
चांगल्या कुटुंबातील महिला पोलिस स्टेशन आणि कोर्टात जात नाहीत, असा पाकिस्तानमध्ये सर्वसामान्य समज आहे. मनिषाला पाकिस्तानची ही विचारसरणी बदलायची आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, मनीषा म्हणाली, 'लहानपणापासूनच महिलांसाठी कोणते प्रोफेशन योग्य आहे आणि कोणते नाही हे सांगण्यात येते. त्यामुळे पोलिस होऊन मला हा समज बदलायचा होता.
मनीषा यांना आधी डॉक्टर व्हायचे होते, मात्र एका नंबरने त्यांना प्रवेश मिळू शकला नाही. त्यानंतर त्यांनी सिंध प्रांताच्या लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. ज्यामध्ये त्यांनी 16 वे स्थान मिळविले.
या भागात दरवर्षी हजारो हिंदू, शीख मुलींचे अपहरण होते
पाकिस्तानातील सिंध प्रांतात दरवर्षी हजारो अल्पसंख्याक मुलींचे अपहरण करून जबरदस्तीने लग्न लावले जाते. यातील काही मुली अवघ्या 10 ते 12 वर्षांच्या आहेत. जर्मनीच्या राज्य प्रसारक डॉयचे वेलेच्या एका अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये दरवर्षी एक हजाराहून अधिक अल्पसंख्याक मुलींचे अपहरण केले जाते आणि वयाने अधिक असणाऱ्या मुस्लिम पुरुषांशी जबरदस्तीने लग्न लावले जाते.
सिंधमधील जाकुबाबाद येथील रहिवासी असलेल्या मनीषा यांनी वडिलांच्या निधनानंतरही कठीण परिस्थितीतही आपला अभ्यास सुरू ठेवला आणि आता डीएसपी बनून इतिहास रचला आहे.
सुमन बेदानी बनल्या पहिल्या हिंदू न्यायाधीश
2019 मध्ये, सिंधमधील शारदादकोट येथील रहिवासी सुमन बेदानी दिवाणी न्यायाधीश बनल्या. इथपर्यंत पोहोचणाऱ्या सुमन या पाकिस्तानातील पहिल्या हिंदू महिला आहेत. सिंध विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतलेल्या सुमन यांनी न्यायिक सेवा परीक्षेत 54 वा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर त्यांना न्यायदंडाधिकारी बनवण्यात आले.
मजुराची मुलगी झाली सिनेटर
2018 मध्ये, कृष्णा कोहली यांनी सिनेटसाठी उमेदवारी दाखल केली. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या पक्ष पीपीपीने त्यांना सर्वसाधारण जागेवरून उमेदवारी दिली होती. थारपारकर या वाळवंटी भागातील रहिवासी असलेल्या कृष्णा कोहली यांनी निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. कृष्णा यांचे वडील मजुरीचे काम करायचे. लहानपणी, कृष्णा या वडिलांसोबत रोजंदारीवर काम करत असत. आता कृष्णा या सदनात पाकिस्तानी महिलांचा आवाज बनून पुढे येत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.