आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Imran Khan And Bangladesh Pm Sheikh Hasina Phone Talks Today News Updates: Pakistan Prime Ministers Raises Kashmir Issue

इमरान, हसीना चर्चा:30 लाख बांग्लादेशी मारले, हजारो महिलांवर केला होता बलात्कार; पाकिस्तानचा अत्याचार कधीच विसरणार नाही, बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्र्यांचे विधान

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन्ही देशांत काश्मीरवर चर्चा झालीच नाही-बांग्लादेश; पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडले

पाकिस्तानने 30 लाख बांग्लादेशींची कत्तल केली, तसेच हजारो बांग्ला महिलांवर बलात्कार केला होता. पाकिस्तानचे हे सैतानी कृत्य आम्ही कधीच विसरणार नाही असे बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात झालेल्या चर्चेच्या पाचव्या दिवशी ही प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानने या चर्चेमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावर बातचीत झाली असा दावा सुद्धा केला होता. परंतु, बांग्लादेश सरकारने पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावला आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये पूर परिस्थितीवर चर्चा झाली होती. चर्चेतील इतर विषय केवळ सौजन्यातील होते असेही स्पष्ट करण्यात आला आहे.

पाकिस्तान आणि बांग्लादेशचे नेते केवळ आंतरराष्ट्रीय मंचावरच एकमेकांशी चर्चा करत असतात. परंतु, इम्रान खान यांनी शेख हसीना यांना फोन करून चर्चा केल्याने या चर्चेकडे भारताचे लक्ष वेधले होते. काही तज्ज्ञांनी या चर्चेत चीनचा हात असेल असाही तर्क लावला होता. चीनच्या सांगण्यावरूनच पाकिस्तानने बांग्लादेशसोबत चर्चा केली असावी असे सांगितले जात आहे. यातच पाकिस्तानने काश्मीरवर चर्चा केल्याचा दावा केला होता. परंतु, बांग्लादेशच्या प्रतिक्रियेनंतर पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने नेमके काय म्हटले?

पाकिस्तान आणि बांग्लादेशच्या पंतप्रधानांनी फोनवर चर्चा केल्यानंतर पाकिस्तानी माध्यमांनी हा मुद्दा लावून धरला. यावरून पाकच्या राजकीय नेत्यांकडून सुद्धा उलट-सुलट दावे करण्यात आले. त्यावरच बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया देणेच उचित मानले. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री उबेद मोमिन म्हणाले, “फोन इम्रान खान यांनी केला होता. यामध्ये दोन्ही देशातील कोरोना परिस्थिती आणि पूर परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. ही चर्चा अगदी सामान्य होती. यात विशेष काहीच नाही. पाकिस्तान बांग्लादेशसोबत संबंध सुधारण्यास इच्छुक असेल तर ही चांगलीच बाब आहे.

मोमिन पुढे म्हणाले, “पाकिस्तानने 1971 च्या बांग्लादेश स्वातंत्र्य लढ्यात आमच्या 30 लाख लोकांची कत्तल केली. हजारो महिलांवर बलात्कार केले. बांग्लादेश हे कधीच विसरणार नाही. पाकिस्तानने आतापर्यंत या सैतानी कृत्याची माफी मागितलेली नाही."

बांग्लादेशसोबत संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. परंतु, प्रत्यक्ष परिस्थिती पाहता हे खूप कठीण आहे. 1971 च्या युद्धात पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना बांग्लादेशात फाशी देण्यात आली आहे. पाकिस्तानकडून या शिक्षेला नेहमीच विरोध केला जातो. एवढेच नव्हे, तर अजुनही पाकिस्तान बांग्लादेशच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करतो असे आरोप बांग्लादेशकडून केले जातात.