आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय नाट्यात एका पत्राची सर्वाधिक चर्चा होत आहे. हे पत्र अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाला पाठवल्याचा दावा केला जात आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी या पत्राद्वारे अमेरिकेने आपल्याला पदावरून दूर करण्याचा मनोदय व्यक्त केल्याचा आरोप केला आहे. तसेच अमेरिकेच्या इशाऱ्यानुसारच आपल्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
पाकिस्तानी माध्यमांच्या मते, हे पत्र राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीच्या बैठकीत सादर करण्यात आले. ते काही पत्रकारांनीही पाहिले. पण, ते मंत्रिमंडळ बैठक किंवा संसदेत का सादर करण्यात आले नाही? हा सर्वात मोठा अनुत्तरित प्रश्न आहे. हा प्रश्न यासाठी रास्त आहे की, हे पत्र संसद किंवा मंत्रिमंडळापुढे सादर करुन अमेरिकेला त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी मजबूर करता आले असते. तर चला, आपण याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया...
काय आहे पत्रात?
सर्वप्रथम इम्रान दाखवत असलेल्या पत्रात काय आहे? हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. पाकचे ज्येष्ठ पत्रकार रिझवान रझी म्हणतात -हे कागद नाटकाशिवाय दुसरे काहीच नाही. काही महिन्यांपूर्वी असद माजीद हे पाकचे अमेरिकेतील राजदूत होते. ते इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक ए इंसाफ या पक्षाचे सदस्य व इम्रान यांचे खास मित्र आहेत, हे येथे लक्षात घेणे फार महत्वाचे आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इम्रान यांना कसेही करून फोन करावा, या विशेष मोहिमेवर इम्रान यांनी माजीद यांना पाठवले होते. असे झाले नाही. त्यानंतर इम्रान यांनी त्यांना बायडेन प्रशासन इम्रान सरकार व पाकविषयी काय विचार करते? हे जाणून घेण्याचा सल्ला दिला. प्रत्युत्तरादाखल माजीद यांनी एक अवास्तव इंटरनल मेमो पाठवला. त्यात त्यांनी इम्रान सत्तेत असेपर्यंत अमेरिकेचे पाकसोबतचे संबंध सुधारणार नाहीत, असे व्हाईट हाऊसला वाटत असल्याचा दावा केला.
मग याला पत्र म्हणावे की अन्य काही...
पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन विधिज्ञ व राजकीय विश्लेषक साजिद तराड यांच्यानुसार -प्रथम म्हणजे हे अधिकृत कम्युनिकेशन नाही. हा एका राजदूताने आपल्या परराष्ट्र मंत्रालयाला लिहिलेला इंटरनल मेमो आहे. त्याला कायदेशीर किंवा राजनैतिकदृष्ट्या कोणतेही महत्व नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे, अमेरिकेला आता पाकिस्तानची कोणतीही गरज नाही. असेल तरी ते इम्रानची मंजुरी का मागतील? ते थेट लष्कराशी चर्चा करतील. तुम्ही त्याला इंटरनल मेमो, इंटरनल केबल, वायर किंवा डिप्लोमॅटीक नोट म्हणून शकता. ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. इम्रान त्याचा बागुलबुवा करुन स्वतःचा स्वार्थ साधत आहेत.
तारीखही चुकीची सांगत आहेत इम्रान
पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार हामीद मीर म्हणाले -असद माजीद गत नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ते 7 किंवा 8 मार्चला इंटरनल मेमो कसे काय पाठवू शकतात? अमेरिकेने खरेच इम्रान सरकार पाडण्याचा कट रचला असेल तर तुम्ही त्याला ओआयसी परिषदेत पाहुणे म्हणून का बोलावले? डिप्लोमसीच्या प्रत्येक गोष्टीचे मोठे अर्थ असतात. पण, कदाचित खान साहेब यालाही क्रिकेट समजण्याची चूक करत आहेत.
धमकी मिळाली असे मानले, तर कारवाई काय केली?
पाकचे अन्य एक ज्येष्ठ पत्रकार इम्रान शफकत म्हणाले -इम्रान यांना अमेरिका किंवा अन्य एखाद्या देशाकडून धमकी मिळाल्याचे मानले तरी त्यांनी हे पत्र का दाबून ठेवले? हा प्रश्न या प्रकरणात अत्यंत महत्वाचा आहे. इम्रान यांनी डिप्लोमॅटीक मार्गाने त्या देशाशी संवाद का साधला नाही? प्रदिर्घ काळापासून पाकिस्तानात अमेरिकेचा व अमेरिकेत पाकचा स्थायी राजदूत नाही. पण, दुतावास प्रभारी आहेत. त्यांना या प्रकरणी पाचारण का करण्यात आले नाही?
प्रभारी राजदूतांना बोलावून त्यांना डिमार्शे (एखाद्या राजकीय मुद्यावर हरकत नोंदवण्याचा सर्वात सोपा मार्ग) का सोपवला नाही? वस्तुस्थिती ही आहे की इम्रान व त्यांचे मंत्री निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यामुळे ते स्वतःला राजकीय शहीद घोषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. इम्रान यांनी जाऊन संसदेत हे पत्र सादर करावे. त्यानंतर या प्रकरणी काय ते स्पष्ट होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.