आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक:इम्रान - बुशरा यांचे 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये नाव, देश सोडता येणार नाही; लष्करप्रमुखांचा इशारा - शहीदांचा अवमान करणाऱ्यांना सोडणार नाही

इस्लामाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाक सरकारने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान व त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांचे नाव 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये टाकले आहे. यामुळे या दाम्पत्याला देशाबाहेर पलायन करता येणार नाही. इम्रान पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) पक्षाचे अध्यक्षही आहेत. दुसरीकडे, लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर गुरुवारी म्हणाले - लष्कराच्या तळांवर हल्ला करणाऱ्यांना आम्ही विसरणार नाही व विसरू देणार नाही.

अल कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान यांना 9 मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर देशात प्रचंड हिंसाचार झाला. त्यात 8 जणांचा मृत्यू झाला. खान यांच्या समर्थकांनी लष्कराच्या तळांवर हल्ले केले. जिना हाऊसही जाळले.

इम्रान यांच्यावर दहशतवादविरोधी कायद्यासह तब्बल 140 गुन्हे दाखल करण्यात आलेत. लष्करही इम्रान यांना 9 मेच्या हिंसाचाराचा सूत्रधार मानत आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात सबळ पुरावे गोळा केले जात आहेत. त्यामुळेच खान व बुशरा यांच्यासह एकूण 600 जणांची नावे नो-फ्लाय लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

सरकारचे मौन, इम्रान एकटे सापडले
इम्रान यांचे नाव नो-फ्लाय लिस्टमध्ये समाविष्ट झाल्याची माहिती 'पाकिस्तान डेली'ने एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिली. पण काही दिवसांपूर्वीच काही वृत्तपत्रांनी या कारवाईचे संकेत दिले होते. पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने अद्याप यावर आपली प्रतिक्रिया दिली नाही.

9 मे च्या हिंसाचारानंतर लष्कर व सरकारने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. परिणामी, इम्रान यांच्या बहुतांश निकटवर्तीयांनी त्यांना व त्यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. उर्वरित एक तर तुरुंगात आहेत किंवा परदेशात पळून गेलेत. 16 बड्या नेत्यांनी इम्रान यांचा पक्ष सोडला आहे. यात शिरीन मजारी, आमिर मेहमूद कियानी, मलिक अमीन अस्लम, मेहमूद मौलवी, आफताब सिद्दीकी, फयाज-उल-हसन चौहान, फवाद चौधरी व आमिर मीर यांचा समावेश आहे.

फवाद चौधरी हे पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे मुख्य प्रवक्ते व खान यांचे अत्यंत विश्वासू होते.
फवाद चौधरी हे पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे मुख्य प्रवक्ते व खान यांचे अत्यंत विश्वासू होते.

फय्याज म्हणाले - हल्ल्यांमागे इम्रान

  • मीडियाशी बोलताना फय्याज-उल-हसन चौहान म्हणाले- 9 मे रोजी लष्कराच्या तळांवर हल्ला झाला. संपूर्ण देश हिंसाचाराच्या आगीत होरपळून निघाला होता. त्यासाठी इम्रान यांनी समर्थकांना प्रशिक्षण दिले होते.
  • चौहान म्हणाले- गतवर्षी मे महिन्यात मी खान यांना एक व्हिडिओ संदेश पाठवला होता. हा संदेश अजूनही काही पाकिस्तानी पत्रकारांकडे आहे. तेव्हा मी खान यांना राजकारणात हिंसा आणू नका असा सल्ला दिला होता. असे झाले तर एक दिवस तुम्ही फसणारच. खान यांना माझा सल्ला आवडला नाही. आज परिस्थिती सर्वांसमोर आहे.
  • चौहान पुढे म्हणाले - काही मुद्द्यांवर आमचे सैन्याशी मतभेद असू शकतात. याचा अर्थ असा नाही की, आपण थेट लष्कराच्या तळांवरच हल्ला केला पाहिजे. 9 मे रोजी जिना हाऊस व लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला करणाऱ्यांना इम्रान यांनी प्रशिक्षण दिले होते.
फय्याज-उल-हसन चौहान यांनी पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
फय्याज-उल-हसन चौहान यांनी पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

पक्षावर बंदीचा धोका

  • 9 मे नंतर इम्रान व पीटीआय कार्यकर्त्यांची भूमिका पाहता पक्षावर बंदी घातली जाईल, अशी भीती राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. लष्कराच्या तळांवर झालेल्या हल्ल्यांनंतर लष्करप्रमुखांनी स्पष्टपणे सांगितले होते - या कृत्यासाठी कुणीही जबाबदार असला, मग तो कुणीही व कितीही शक्तिशाली असला, तरी त्याला अटक केली जाईल, त्यांच्यावर लष्करी न्यायालयात खटला चालवला जाईल.
  • त्यानंतर बुधवारी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ सरकारच्यावतीने हजर झाले. ते म्हणाले- आम्ही राजकीय पक्ष म्हणून पीटीआयवर बंदी घालण्याचा विचार करत आहोत. पीटीआय कार्यकर्त्यांनी व इम्रान यांनी जे केले ते पाकिस्तानच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडले नव्हते.
  • आसिफ म्हणाले - सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार केला जात आहे. दोषींना अशा प्रकारे शिक्षा होईल की, ते उदाहरण बनेल. पंतप्रधान शाहबाज शरीफ व लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी हे अगोदरच स्पष्ट केले आहे.
इम्रान यांच्या प्रमुख सहकारी मलिका बुखारी यांनी गुरुवारी रात्री खान यांच्या पीटीआय पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
इम्रान यांच्या प्रमुख सहकारी मलिका बुखारी यांनी गुरुवारी रात्री खान यांच्या पीटीआय पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

लष्कर - सरकारवर इम्रान यांचे आरोप

  • इम्रान यांनी बुधवारी रात्री युट्यूब चॅनलवर आपल्या समर्थकांना संबोधित केले. मंगळवारी त्यांनी सरकारसोबतच लष्करालाही टोला लगावला. खान म्हणाले होते - आतापर्यंत आम्ही जबरदस्तीच्या लग्नाविषयी ऐकले होते, आता जबरदस्तीने घटस्फोट घेण्यास भाग पाडले जात आहे.
  • खान यांच्या मते, लष्कर व सरकार त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात डांबून पक्ष सोडण्यासाठी दबाव आणत आहेत. आत्तापर्यंत पीटीआयचे 16 मोठे नेते व हजारो समर्थकांनी पक्ष सोडला आहे.
  • खान पुढे म्हणाले - मी पाकिस्तानचा सर्वात लोकप्रिय नेता आहे. असे असूनही मी पुन्हा पंतप्रधान व्हावे आणि माझ्या पक्षाने पुन्हा सत्तेत यावे असे लष्करप्रमुखांना वाटत नाही. अखेरीस का? याचे उत्तर का दिले जात नाही? पाकिस्तानात तर लोकशाही आहे. हिंसाचाराच्या वेळी सुरक्षा दलांनी गोळीबार केला. त्यात आमचे 40 कार्यकर्ते ठार झाल्याचा दावा इम्रान यांनी केला.