आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​जेफ बेजोस यांनी दिली यशाची 2 सूत्रे; म्हणाले- उपभोगापेक्षा जास्त निर्माण करणे शिका, 21 व्या शतकात वेळ हीच मोठी संपत्ती असेल

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मूल्यांविना कुठलाही व्यवसाय यशस्वी होत नाही, आपल्यासाठी ग्राहक व त्याचे समाधान यालाच प्राधान्य
  • बेजोस यांनी ॲमेझॉन सीईओ म्हणून शेअरधारकांना लिहिले शेवटचे पत्र, अँडी जेसी नवे सीईओ

जर तुम्हाला व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर उपभोगापेक्षा जास्त निर्माण करणे शिकावे लागेल. ज्यांच्याशी आपला रोजचा संबंध असतो त्या सर्वांसाठी मूल्य निर्मिती करणे हे तुमचे उद्दिष्ट असावे. जो व्यवसाय मूल्य निर्मिती करत नाही, तो भलेही यशस्वी होत असल्याचे दिसत असले तरी तो दीर्घकाळ टिकू शकत नाही. आपल्यासाठी आपले ग्राहकच सर्वोच्च आहेत. आपण त्यांना कमी किंमत, निवडीसाठी मोठी साखळी देतो आणि वेगाने पुरवठा करतो. पण त्यांचा वेळ कसा वाचवायचा याकडेही आपल्याला लक्ष द्यावे लागेल. ग्राहकांबाबत बोलायचे तर आपल्याला काळाच्या पुढे चालावे लागेल. अॅमेझॉनवर ग्राहक आपली २८% खरेदी ३ मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळेत पूर्ण करतो आणि संपूर्ण खरेदीचा अर्धा भाग १५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत संपतो.

त्याची तुलना आपण पारंपरिक स्टोअरवर खरेदीशी केली तर ड्रायव्हिंग करत स्टोअरपर्यंत जाणे, पार्किंगची जागा मिळवणे, स्टोअरमध्ये खरेदीनंतर चेकआऊट लाइनसाठी प्रतीक्षा करणे आणि अखेर आपली कार शोधून पुन्हा घरी परतणे. म्हणजे ग्राहकाला किती वेळ खर्च करावा लागतो हे समजून घ्या. २१ व्या शतकात वेळ हीच सर्वात मोठी संपत्ती असेल. वेळेची बचत ग्राहकांसाठी मूल्यात परिवर्तित करणे हे आपल्याला शिकावे लागेल. ग्राहक आणि त्याचे समाधान यालाच आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. कर्मचाऱ्यांबाबत बोलायचे तर मला आपल्या १३ लाख सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांचे परिश्रम आणि समर्पण यामुळेच जगातील सर्वात मोठी कंपनी आणि कामासाठी सर्वात सुरक्षित जागा अशी ओळख आपण निर्माण करू शकलो.

आपल्याकडे कामाचा दबाव जास्त असतो, असा आरोप आपल्यावर होत आला आहे, पण खरी परीक्षा दबावातच होते हे मला सांगावेसे वाटते. आपले कर्मचारी अनेक तास सेवा देतात, आपल्याला त्यांचा अभिमान आहे. अँडी जेसींनाही (नवे सीईओ)हे माहीत आहे.’

अॅमेझॉनचे संस्थापक ५७ वर्षीय जेफ बेजोस यांनी गुरुवारी सीईओचे पद सोडण्यापूर्वी शेअरधारकांना शेवटचे पत्र लिहिले. २०२० मध्ये दर सेकंदाला १.८१ लाख रुपये कमावणाऱ्या बेजोस यांनी पत्रात कंपनीचे व्हिजन सांगताना भविष्यात आपल्या १३ लाख कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि हवामान बदलाच्या मुद्द्यावर साथ देण्याचा संकल्प व्यक्त केला. ते अॅमेझॉनला कशा प्रकारे १२० लाख कोटी रुपयांची कंपनी बनवणार आहेत हेही त्यांनी सांगितले. शेअरधारकांना लिहिलेल्या पत्रातील हा संपादित भाग...

बातम्या आणखी आहेत...