आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • In Turkey, This 'Maximum Of Gandhi'...justice March Like Dandiatra, Also Suffered An Attack; A Challenge To Erdogan

दिव्य मराठी विशेष:तुर्कियेत या ‘गांधींची कमाल’... दांडीयात्रेसारखा जस्टिस मार्च, हल्लाही झेलला; एर्दोगनना आव्हान

अंकारा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुर्कियेत १४ मे रोजी सार्वत्रिक निवडणूक आहे. गेल्या दोन दशकांत पहिल्यांदाच राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दोगन यांचे सिंहासन डळमळीत वाटत आहे. राजकीय जीवनात त्यांना प्रथमच कडवे आव्हान मिळाले आहे. त्यांच्यासमोर आहेत ७४ वर्षांचे माजी नोकरशाह कमाल कलचदारलू. आता कमाल यांची ओळख ‘तुर्कियेची गांधी’ अशी बनली आहे. स्थानिक मीडिया त्यांना ‘गांधी कमाल’ असे संबोधतो. ते महात्मा गांधीजींसारखाच चष्मा घालतात. त्यांची शैलीही अतिशय नम्र आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या रिपब्लिकन पीपल्स पार्टीची (सीएचपी) लोकप्रियता इतकी वाढली आहे की, ६ विरोधी पक्षांनी एर्दोगेन यांच्याविरुद्ध त्यांना आपला उमेदवार निवडले आहे. या आघाडीला ‘टेबल ऑफ सिक्स’ नाव दिले आहे. एर्दोगन यांची झोप उडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाविषयी...

अर्थतज्ज्ञ, उच्च पदे भूषवली, इतके विनम्र की हल्ल्यानंतरही शांत राहिले
१९४८ मध्ये जन्मलेल्या कमाल यांनी अंकारा अकॅडमी ऑफ इकॉनाॅमिक्स अँड कमर्शियल सायन्सेसमधून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यानंतर देशातील वित्तीय संस्थांमध्ये उच्च पदे भूषवली. २००२ मध्ये ते देशातील सर्वात जुन्या सीएचपी या राजकीय पक्षात आले. याची स्थापना आधुनिक तुर्कीचे संस्थापक मुस्तफा कमाल अतातुर्क यांनी केली होती.

टर्निंग पॉइंट : २०१० मध्ये व्हिडिओ लीक झाल्यानंतर सीएचपीचे प्रमुख बायकल यांनी राजीनामा दिला. त्यानंतर इच्छुक नसतानाही कमाल यांना पक्षाची कमान सोपवण्यात आली. नागरी अधिकार, सामाजिक न्याय आणि लोकशाहीसाठी तर ते संघर्ष करतच होते, २०११ मध्ये एर्दोगन पीएम झाल्यानंतर कमाल यांनी अभियानाला वेग दिला.

नवी ओळख : गांधीजींच्या दांडी यात्रेपासून प्रेरणा घेऊन कमाल यांनी २०१७ मध्ये एर्दोगन यांच्या विरोधात अंकारा ते इस्तंबूलपर्यंत (४५० किमी) ‘मार्च फॉर जस्टिस’ ही रॅली काढली होती. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार यात दहा लाखांपेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते. विरोध दडपून टाकण्यासाठी एर्दोगन यांनी दोन लाख लोकांना तुरुंगात डांबले होते. देशातील सर्व ३७२ तुरुंग क्षमतेपेक्षा अधिक भरले होते. कमाल यांची आणखी एक विशेषता ही आहे की ते आक्रमक होत नाहीत.

२०१४ मध्ये संसदेत एका व्यक्तीने त्यांच्या चेहऱ्यावर ठोसे मारले होते. त्यामुळे त्यांचे गाल आणि डोळ्यांवर जखमा झाल्या होत्या. असे असतानाही त्यांनी सहकाऱ्यांना संयम राखण्याचे आवाहन केले होते. २०१६ मध्येही त्यांच्या ताफ्यावर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. २०१७ मध्ये आयएसने बाॅम्बहल्ला केला होता. २०१९ मध्ये एका सैनिकाच्या अंत्यसंस्कारावेळीही त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला होता.

वाढती लोकप्रियता : एर्दोगन यांच्या जस्टिस अँड डेव्हलपमेंट पक्षाच्या तुलनेत कमाल यांच्या पक्षाला २५% पेक्षा अधिक पाठिंबा मिळवता आला नव्हता. मात्र २०१९ च्या महापौर निवडणुकांत ६ मोठ्या प्रांतांत त्यांना विजय मिळाला. सध्या एर्दोगन यांचा सर्वात वाईट काळ आहे, असे मानले जाते. वाढती महागाई, कमकुवत चलनामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. फेब्रुवारीत भूकंपातील बचावकार्याच्या मुद्द्यावरून नागरिकांमध्ये प्रचंड राग आहे.