आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसरी लाट:अमेरिकेत एका दिवसात कोरोनाचे 67 हजार रुग्ण आढळले, जगात सर्वाधिक; दुर्धर कँडिडा ऑरिस फंगसचे संकट

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी ६७,४८५ रुग्ण आढळून आले. तीन महिन्यांतील ही सर्वात मोठी संख्या आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अमेरिकेत आणखी एका जीवघेण्या कँडिडा ऑरिस फंगसचे संकट आले आहे. डलासमधील दोन रुग्णालये व वॉशिंग्टन डीसीमधील एका नर्सिंग होममध्ये या दुर्धर आजाराचे रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

वॉशिंग्टन डीसीमध्ये कँडिडा ऑरिसने बाधित १०१ रुग्ण आढळले. त्यापैकी तीन रुग्णांत औषधांच्या विरोधी प्रतिराेधके आढळून आली होती. डलास क्षेत्रातील दोन रुग्णालयांत असलेल्या कँडिडा ऑरिसच्या २२ प्रकरणांपैकी दोघांत मल्टिड्रग प्रतिरोधके आहेत. हे फंगस रुग्णांत वेगाने पसरते. त्यामुळे हा चिंतेचा विषय ठरला आहे. सीडीसीने हा फंगस जागतिक आरोग्यासाठी गंभीर धोका असल्याचा इशारा दिला आहे.

अमेरिकेच्या आैषध नियंत्रण व प्रतिबंध संबंधी संस्थेने (सीडीसी) कँडिडा ऑरिसबद्दल माहिती दिली आहे. हे फंगस शरीरात प्रवेश करून रक्तवाहिन्यांद्वारे शरीरात पसरते. त्याच्या प्रभावामुळे रुग्णाचा जीव वाचणे कठीण होते. या फंगसवर अँटिफंगल आैषधी निरुपयोगी ठरत आहेत. त्याहून धोकादायक म्हणजे रुग्णाच्या मृत्यूनंतरही हा फंगस जिवंत राहतो. गंभीर आजारी असलेल्या रुग्णांसाठी हे फंगस जास्त धोकादायक आहे. ताप व थंडी वाजणे ही कँडिडा ऑरिस संसर्गाची सामान्य लक्षणे आहेत. संसर्गानंतर रुग्णाला अँटिबायोटिक देऊनही त्याची प्रकृती सुधारत नाही. ही चिंतेची बाब ठरते. कँडिडा ऑरिसचा संसर्ग ओळखणे कठीण असते. हा फंगस सामान्यपणे रुग्णालयाच्या वातावरणात असतो. कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्यांना लक्ष्य करतो. अमेरिकेने आधी लसीकरण मोहिम चांगल्या प्रकारे राबवली होती.

वाढलेल्या संसर्गामुळे फूड चेन ठप्प
ब्रिटनमध्ये काेरोना रुग्णसंख्येत घट झाली. शुक्रवारी येथे ३६३८९ रुग्ण आढळले. हा आकडा ५४ हजारांवर गेला होता. गेल्या चार महिन्यांत वेगाने झालेल्या संसर्गामुळे सर्व प्रकारच्या सुविधांना फटका बसला. कर्मचारी मोठ्या संख्येने बाधित झाले. त्याचा परिणाम फूड चेनच्या पुरवठ्यावरही झाला. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे. सुपरमार्केटमध्ये माल शिल्लक राहिलेला नाही.

बांगलादेशात आतापर्यंत सर्वात कडक लॉकडाऊन, रस्त्यावर सैन्य
बांगलादेशने संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंतच्या सर्वात कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. बांगलादेशात ईदच्या दिवशी नियमांत सवलत दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी २३ जुलैपासून ५ ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या रस्त्यावर पुन्हा एकदा सैन्यातील जवान परतले आहेत. लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

अमेरिकेनंतर सर्वाधिक रुग्णसंख्या असलेला देश ठरला इंडोनेशिया
इंडोनेशियात शुक्रवारी कोरोनाचे ४९०७१ रुग्ण आढळून आले. सोबतच इंडोनेशिया रुग्णसंख्येत दुसरा देश बनला आहे. अमेरिकेनंतर इंडोनेशियाचा क्रमांक लागतो. देशात डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्ण वाढले. म्हणूनच परिस्थिती आणखी वाईट होत गेली. रुग्णालयांत खाटा शिल्लक राहिलेल्या नाहीत. रुग्णांवर पार्किंग व जमिनीवर उपचार करण्याची वेळ आली आहे. स्मशानभूमीत प्रतीक्षा केली जात आहे.

कोरोनाचे १० लाखांहून जास्त रुग्ण असलेल्या देशांत पाक ३० वा देश
पाकिस्तानात कोरोनाबाधितांची संख्या १० लाखांहून जास्त झाली आहे. कोरोनाबाधितांची एवढी संख्या असलेला पाकिस्तान जगातील तिसावा देश ठरला आहे. पाकिस्तानात लोकांनी ईदच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करून नियमांची ऐशीतैशी करून टाकली. त्याचा फटका चोवीस तासांत दिसला. कोविडचे १४२५ रुग्ण आढळले आहेत.

बातम्या आणखी आहेत...